Features

नितीन चंद्रकांत देसाई आणि त्यांचे चित्रपट – भाग २

नितीन देसाई यांच्या कारकिर्दीवर आधारित दीर्घ लेखाच्या या दुसऱ्या भागात वाचूया नितीन देसाई यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल. नितीन देसाई कुठलाही चित्रपट अगदी पूर्ण तयारीनिशी करायचे. बालगंधर्व या चित्रपटाची निर्मिती आणि अजिंठा या चित्रपटाचं दिग्दर्शन यामध्ये परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न नितीन देसाई यांनी केला. भव्य स्टुडिओमध्ये देसाई यांचं ऑफिस हे काचेचं पारदर्शक असे. या पारदर्शक ऑफिसप्रमाणे त्यांनी जे काही केलं ते खुलेपणाने कुठलाही आडपडदा न ठेवता केलं. त्यांनी लपवल्या त्या फक्त चिंता.

नितीन देसाई यांनी जवळपास २०० हुन अधिक चित्रपटांसाठी, साधारणपणे दहा हजारांहून अधिक एपिसोडसाठी काम केलं. कोणाचाही विश्वास बसणार नाही, पण त्यांच्याकडे सर्व रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलेलं आहे. मंदार जोशीने ‘नितीन चंद्रकांत देसाई- आधुनिक युगाचा विश्वकर्मा’ नावाचा एक देखणा ग्रंथ सिद्ध केलाय. त्यामध्ये ते बहुतेक सारं आलंय

एकेका चित्रपटासाठी त्यांनी केलेलं संशोधन, त्यांनी केलेल्या रेकी, त्यासाठी केलेलं रेखाटन, हे जपून ठेवलं आहे. त्यांच्या स्टुडिओत एक आख्खा कारखाना होता. या कारखान्यात त्यांना आवश्यक असलेला प्रत्येक घटक बनत असे- खांब, खुर्च्या, भिंती, खिडक्या, कपडे…. सारं काही. त्यासाठी कित्येक कारागीर काम करत असत. त्या कारखान्यात जाऊन त्यांचं काम बघत बसणं हा माझा आनंदाचा भाग होता. प्रत्येक सेटसाठी वेगळं डिझाईन, त्यासाठी वेगळी कारागिरी, वेगळी मेहनत… हे सर्व मग त्यांच्या स्टॉकमध्ये जमा होई. एखाद्या निर्मात्याच्या आर्थिक अडचणी असतील तर त्याला ते उपयोही पडे. दादा तसे महागडे कला दिग्दर्शक होते, पण त्यांचे नाव आलं की त्या कलाकृतीची किंमत वाढत असे. मग निर्मातेही त्यांना तसे पैसे देत. त्यांनी अफाट पैसा कमावला असेल, पण तो त्यांनी छानछोकित उधळला का? खात्रीने सांगतो- नाही! जे कमावलं ते स्टुडिओत ओतलं.

त्यांचा ‘बालगंधर्व’ चित्रपट चालला. सुबोध, दादा व महेश लिमये यांचे दृश्यरूप, अभिराम भडकमकर यांचं लेखन व कौशल, आदित्य ओक यांची श्राव्य कामगिरी! तरुणांच्या आयपॉडमध्ये नाट्य संगीत आलं. त्यानंतर दादांनी त्यांचं स्वप्न असलेला ‘अजिंठा’ करायला घेतला. एका बैठकीत दादा अजिंठाच्या शॉट टेकिंग वगैरेबद्दल असं काहीं सांगत होते की, नंतर त्यांना सुचवलं, तुम्ही दिग्दर्शन का नाही करत? आधी सहाय्यक कला दिग्दर्शक, मग मुख्य कलादिग्दर्शक, निर्मिती आरेखनकार (प्रोडक्शन डिझायनर), निर्माता यानंतरचा स्वाभाविक टप्पा होता दिग्दर्शक होण्याचा. त्यांनी तसं ठरवलं. तयारी सुरू झाली व मी घरगुती कामासाठी अमेरीकेला गेलो. महिन्याभराने परतलो. एक दोन दिवसांनी संध्याकाळी पनवेलहून कर्जतला जाताना त्यांचा फोन आला, “कुठे आहेस?” “हा काय स्टुडिओवरून चाललोय.” “मला दिसतंय, तुझी गाडी आत्ताच गेली, मी मागे आहे.” “स्टुडिओत ये.” “दादा, घरच्या लोकांना सोडून येतो.” कर्जतला जाऊन परतलो. ऑफिसमध्ये गेलो, त्यांनी गाडी काढली, मला घेऊन स्टुडिओच्या पार दुसऱ्या टोकाला गेले. रायगड (ही स्टुडिओची खास भाषा) ओलांडला व त्याच्या बरोबर मागे ‘अजिंठा’चा व्हर्जिन सेट उभा होता. मला म्हणाले, “आजच पूर्ण झालाय. पवईच्या ऑफिसमध्ये जाऊन आलो. येताना तुझी गाडी दिसली. म्हणून मग तुला बोलावलं. 

हॅलो जय हिंद चित्रपटात नितीन देसाई यांनी पोलिसांची भूमिका केली होती.

स्टुडिओमध्ये पाहिलं तर हुबेहूब लेणी उभी राहिली होती. एक झोपडी उभी केली होती. झोपडीच्या आत सर्व सोयी. तिथं झाडाला एक दो-यांचा झुला टांगलेला. दीड महिन्यापूर्वी तिथं एक खळगा होता, त्या खळग्याचं तळ्यात रूपांतर झालेलं होतं. कमळं सोडलेली. बदकं फिरत होती. संध्याकाळ होत चाललेली. सोनेरी किरणं त्या परिसरावर आपली जादू पसरत होती. अष्टमीचा चंद्र उदेला होता. दादा, श्रीकांतकाका, सोनाली कुलकर्णी, बॉब (चित्रपटाचा नायक) असे पुढे निघाले. दादांनी तिथं काही आरसे उभे केले होते. त्या आरशांचा एक छोटासा कोन त्यांनी साधायला सांगितला, आणि झळझळीत प्रकाश त्यांनी तयार केलेल्या लेण्यांत गेला आणि मन थरारलं. मी अजिंठ्याला आजवर गेलेलो नाही. पण चित्रांतून तो पाहिलेला. दादांनी असा काही सेट उभारला होता की आपण थेट अजिंठ्यात आहोत असं वाटावं. गुंफातलं कोरीव काम, तिथली चित्रं, त्या चित्रांतलं अस्वस्थ पुरातन ताजेपण, रंगांच्या सर्व छटा. विस्मित नेत्रांनी आम्ही ते पित होतो, डोळ्यांत साठवीत होतो. बाजूच्या मोकळ्या माळरानावर दीडेकशे वर्षं जुनं खेडं उभं केलं होतं. आदिवासी जमातीचं गाव, त्यांची दैवतं, त्या दैवतांचे विक्राळ डोळे आणि त्या विक्राळपणांतूनही दिसणारं आपलेपण, तिथं पहिल्यापासून असलेल्या झाडीचा केलेला सौंदर्यपूर्ण वापर, सारं काही अफाट होतं, जादुई होतं, याआधी जिथं मराठी पाऊल पडते पुढे या मालिकेचा सेट त्यांनी उभा केला होता, तिथंच मोठा कडा उभारला होता, त्यावरून धबधबा कोसळत होता. सारं मनोहर, नयनरम्य होतं. त्या सर्व सृष्टीचा निर्माता ती सृष्टी स्वत: दाखवत होता. त्या दाखवण्यात कोणत्याही प्रकारचा अभिमान नव्हता, अहंकार नव्हता. आम्ही त्यांच्या ऑफिसमधे गेलो. संपूर्ण काचेचं ऑफिस. सारं कसं, पादर्शक. काही लपवायचं नाहीच. अफाट कर्जही कधी लपवलं नाही. लपवली ती त्याबद्दलची चिंता. असो. त्या ऑफिसच्या काचेच्या भिंतींवर अजिंठ्याचा ज्ञात असलेला इतिहास, स्टोरी बोर्ड, आणि खूप काही. दादांनी शेवटी विचारलं, “यात काही सुचवायचं का?” मी कपाळावर हात मारला. दादांना म्हणालो, “काय हे? कोणाला विचारताय? मी दगड आहे.” ते मोठ्याने हसून म्हणाले, “दगड आहेस म्हणूनच तुला विचारतोय. दगडाला आवडला म्हणजे सर्वांना आवडला.” विनोद सोडून देऊ. ‘अजिंठा’ चांगला बनला होता, देखणा होता, क्लासिक नक्कीच नव्हता, पण टाकाऊही नव्हता. पण तो जोरदार पडला. दादांना काही कोटींचं नुकसान झालं. पण, त्यातूनही तो माणूस हिंमतीनं वर आला.

काही दिवसांनी मी सहज म्हणून स्टुडिओत गेलो. आणि थक्क झालो. रायगडाकडे जाताना समोर एक मोठी सपाट जागा होती, त्या जागेवर एक आख्खा महाल उभा राहिला होता व त्या महालासमोरची सजावट करण्याचं काम सुरू होतं. दादा नव्हते, श्रीकांतकाका म्हणाले, सलमानचा नवा चित्रपट येतोय, प्रेम रतन धन पायो,’ त्याचा हा सेट आहे. पंधरा दिवसांत शूटिंग सुरू होतंय.” मग, त्यांनी त्याचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन दाखवला. मी म्हणालो, “हे पंधरा दिवसांत पूर्ण होणे शक्यच नाही.” काका- “अरे, तो नितीन आहे. बघा तुम्ही.” आणि खरंच तो सारा सेट पूर्ण झाला होता. अफाट श्रीमंत घर, त्या घरातली प्रत्येक गोष्ट, भव्यता, त्यामागील सारी अचूक मापं, जिन्याच्या पाय-यासुद्धा मापात! कुठेही काहीही कमी नाही. त्यातला तो आरसे महालाचा अफलातून सेट. भौमितिक आकारांचा व मापांचा असा काही वापर केला होता दादांनी की ज्याचं नाव ते. संगणकावर जेव्हा त्याचं पर्स्पेक्टिव्ह तयार होत होतं, त्याहीवेळी गोंधळल्यासारखं व्हायचं, चित्रपटामध्ये गोंधळल्यासारखं होतं, पण प्रत्यक्षातही तो गोंधळ व्हायचा. खाली जमिनीवर मार्किंग केलेलं असायचं. त्याच्या आधारावर कलाकार चालत जायचे. तो सेट मला कधीही पाहाता आला नाही. दादांनी दोन तीन वेळा निरोप दिलेला. पण कॉलेजमधून फुरसत मिळायची नाही. अखेर, तो सेट पाडायच्या वेळी जाता आलं. तेव्हा ‘खंडहर बताते हैं, इमारत कितनी बुलंद थी’ याचा प्रत्यय आला.

*******
नीतिन दत्तात्रेय आरेकर

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.