FeaturesNews

प्रभाकर बरवे यांचं चित्र गायब झालं ?

एनजीएमए मधल्या एअर इंडियाच्या प्रदर्शनात प्रवेश केल्याबरोबर मला दिसलं ते गायतोंडे यांचं काहीसं ऑरेंज कलर मधलं पेंटिंग. मग हुसैन, रझा, आरा यांचीही पेंटिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या मजल्यावर गायतोंडे यांचं आणखीन एक अप्रतिम पेंटिंग मी पाहिलं. पण त्याच वेळी माझी नजर शोध घेत होती ती प्रभाकर बरवे यांच्या पेंटिंगची. पण ते पेंटिंग मला काही शेवटपर्यंत दिसलंच नाही. अगदी शेवटच्या मजल्यावरच्या दालनात देखील नव्हतं. कुणाला विचारावं ते देखील कळेना. एनजीएमएचा सर्वच स्टाफ उदघाटनाच्या कार्यक्रमातच अडकलेला. त्यातच कॅटलॉगच्या अगदी मर्यादित प्रती उद्घाटनासाठीच आलेल्या. त्यामुळे त्यातूनही काही माहिती मिळेना. एवढं मोठं एअर इंडियाचं कलेक्शन आणि त्यात बरवे यांच्या सारख्या भारतातल्या सर्व श्रेष्ठ चित्रकाराचं चित्रच नाही म्हणजे काय ? मला तो प्रश्न सतत अस्वस्थ करीत राहिला.

घरी आलो तोवर खूपच उशीर झालेला. त्यातच मधेच पाऊस सुरू झालेला त्यामुळेच शोधायचा थोडासा कंटाळाच केला होता. पण दुसऱ्या दिवशी मात्र संध्याकाळी तो संदर्भ मला सापडलाच. २००४ सालचं एअर इंडियाचं कॅलेंडर होतं ते. आणि त्यात रझा, लक्ष्मण श्रेष्ठ, आरा, शक्ती बर्मन, अच्युतन कुडलूर, अर्पणा कौर, अंजली इला मेनन, जितिष कलट, एन कृष्णा रेड्डी,  गायतोंडे आणि प्रभाकर बरवे यांची चित्रं होती. खरं तर अशी एअर इंडियाची खूपच कॅलेंडर मी जमवून ठेवली होती. पण मध्यंतरी या साऱ्याचा इतका कंटाळा आला की मी ती सारी काढून टाकली.

गायतोंडे आणि बरवे यांच्यावर काम करायचं होतं म्हणून मी २००४ सालचं कॅलेंडर मात्र मी जपून ठेवलं होतं. त्यात वर उल्लेखलेलं गायतोंडे यांचं ऑरेंज पेंटिंग होतं. त्याच बरोबर बरवे यांचं देखील. याचा अर्थ असा की एअर इंडियाच्या संग्रहात प्रभाकर बरवे यांचं चित्र हे होतं. या चित्राखाली जी कॅप्शन लिहिली आहे त्यात ‘Commissioned by Air-India’ असा उल्लेख केलेला आढळला. प्रभाकर बरवे यांनी कधीही कमिशनची कामं केली नाहीत. मग हा असा उल्लेख कॅलेंडरवर का केला गेला. आणि समजा केला गेला असेल तर ते पेंटिंग गेलं कुठं ? हा प्रश्न येतोच की.

ज्यांनी कुणी हे प्रदर्शन क्युरेट केलं आहे त्यांनी एअर इंडियानं प्रकाशित केलेली आजवरची कॅलेंडर्स पाहिली नाहीत का ? पाहिली नसतील तर का नाही पाहिली ? हे त्यांचं काम नव्हतं का ? ती त्यांनी पाहिली असती तर त्यांना प्रभाकर बरवे यांचं हे पेंटिंग कुठं आहे याचा शोध घ्यावा लागला नसता का ? इतक्या मोठ्या भारतीय चित्रकाराचं पेंटिंग एअर इंडियाच्या संग्रहात नाही याचं त्यांना का नाही आश्चर्य वाटलं ?

बरवे यांचं एअर इंडियाच्या कॅलेंडर वर छापलेलं चित्र.

कलाविश्वात गेली अनेक वर्ष एअर इंडियाच्या संग्रहाविषयी कुजबुज ऐकू येत होती. म्हणजे उदाहरणार्थ त्यातली काही पेंटिंग आपोआप ‘नाहीशी’ झाली आहेत. ‘गायब’ झाली आहेत. ‘नष्ट’ झाली आहेत वगैरे वगैरे वगैरे. बरवे यांच्या चित्राबाबत देखील असेच काही घडले असेल का ? बरवे यांची चित्रं अलीकडे लिलावात कोट्यवधी रुपयांना विकली गेली आहेत. त्यामुळे असे विचार कुणाच्याही मनात निश्चितपणे येऊ शकतात.

पण या प्रश्नांची उत्तरं आता विचारायची तरी कुणाला ? सरकारकडून पुन्हा एअर इंडिया टाटांकडे आल्या दरम्यानच्या काळात हे घडले असेल का ? याची कुठं तरी निश्चितपणे नोंद असणार. ती नोंद आता संबंधितांनी शोधायलाच हवी कारण बरवे काय किंवा अन्य कलावंत काय साऱ्यांच्याच कलाकृती हा अत्यंत मौल्यवान राष्ट्रीय ठेवा आहे.

********
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’

Related Posts

1 of 148

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.