Features

रवीन्द्रनाथः आधुनिक चित्रकलेचे प्रणेता

पल्लवी पंडित (चित्रकार आणि कला इतिहास अभ्यासक)

रवीन्द्रनाथांनी आयुष्याच्या उत्तरार्धात वयाच्या ६५ व्या वर्षी चित्र साकारण्यासाठी कुंचला हाती घेतला. त्याआधी काव्य,नाट्य,संगीत, नृत्य अशा विविध कलांच्या माध्यमातून शब्दसुरांच्या सान्निध्यात अविरत मुशाफिरी केली.पण हे सारे करूनही अजून व्यक्त होणे राहून गेल्याच्या भावनेतून ते चित्रकलेकडे वळले. रवीन्द्रनाथ कलाकृतीतील घटकांना वेळ, ऋतु, हवामान, छायाप्रकाश यांच्या तोलामोलाचे महत्त्व प्रदान करीत प्रेक्षकाला त्या वातावरणाची अनुभूती प्राप्त करुन देतात. मर्यादित रंगांच्या वापरातून, उत्स्फूर्तपणे पण वास्तविक बारकावे आणि रंगलेपन करता बहुतांश वेळा मानवाकृती रहित साकारलेल्या या कलाकृती टागोरांच्या उत्कृष्ठ कलेचा नमुना आहेत.

चित्रकार आणि कला इतिहासाच्या अभ्यासक पल्लवी पंडितलिखित *रवीन्द्रनाथ टागोर :एक बहुआयामी कला प्रवास* या लेखमालिकेतले दोन भाग तुम्ही वाचलेत. याच लेखमालेतील रवींन्द्रनाथांमधील चित्रकार उलगडून दाखवणारा हा तिसरा आणि अंतिम भाग. ‘तत्रैवया द्वैमासिकाच्या सौजन्याने ‘Chinha Art News’ च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत.

 शब्दांचा अवाढव्य प्रपंच केलेल्या रवीन्द्रनाथांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात चित्रकलेला सुरुवात केली. साहित्य ,संगीत, अभिनय, नृत्य अशा माध्यमांद्वारे त्यांनी आत्माविष्कार समर्थपणे प्रकट केला होता. पण आपल्याला जाणवणारे अबोध,अस्पष्ट ,गहन असे काहीतरी आहे जे आपण कोणत्याही माध्यमातून व्यक्त करू शकलो नाही अशी भावना त्यांना तीव्रतेने जाणवू लागली होती . याच कालावधीत म्हणजे साधारणतः वयाच्या पासष्टाव्या वर्षी (1924 दरम्यान) ते नकळत चित्रकलेकडे ओढले गेले. कविता लिहिता लिहिता तिच्यातले शब्द तर कधी ओळीच्या ओळी ते खोडून काढत. पण ही खाडाखोड ते नकळत अशा प्रकारे करू लागले की त्यातून आपोआप लक्षवेधी आकृत्या निर्माण होऊ लागल्या. पण एक मात्र नक्की की रेघांवर रेघा ओढण्याच्या कृतीतून लिहिताना मधेच लांबविलेल्या, कधी ओघवत्या तर कधी तुटक अक्षरांच्या फर्राट्यावर कलात्मक संस्करण करून या रचनांमध्ये रवीन्द्रनाथांनी ताल आणि लयबद्धता साधलेली दिसते. त्याबाबत रवीन्द्रनाथ स्वतः स्पष्टीकरण देतात ते असे ते म्हणतात

‘‘मला तालाचे उपजत ज्ञान असावे असे वाटते. लहानपणापासून मी कुठले शिक्षण घेतले असेल तर ते तालाचे, लयीचे. विचारातील लय, आवाजातील लय! विस्कळीत आणि असमर्थतेला लय वास्तवता प्रदान करते. जेव्हा कधी माझ्या हस्तलिखितातील रेखाटने मुक्तीसाठी अपराध्याप्रमाणे आक्रोश करतात आणि जेव्हा त्यांच्या असंबद्धपणाची कुरूपता माझ्या डोळ्यांवर आघात करते, तेव्हा त्यांची सुटका करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या शेवटापर्यंत पोहोचविण्यासाठी मी लयीचा, तालाचा आधार घेतो.”

स्वतःला शब्दांच्या माध्यमातून समर्थ आणि प्रभावीपणे व्यक्त करीत असताना का म्हणून रवीन्द्रनाथ आयुष्याच्या उत्तरार्धात चित्रकलेकडे आकर्षित झाले? खरेतर त्यांच्या कवितांचा अभ्यास केला असता आपल्या असे लक्षात येते की त्यांच्या कवितांमधील कल्पनाविलास हा चित्रमय आहे. त्यांच्या कविता रसिकाला दृष्यानुभव देऊन जातात. मग आपल्या साहित्यातून रंगांची उधळण करणारे टागोर चित्रकलेकडे वळले त्यात नवल ते काय? बंगाली कवी सुधीन्द्रनाथ दत्ता यांना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात :

शब्द मला संतुष्ट करीत नाही त्यांचे नियम कडक असतात. माझ्या रेषा मात्र त्यांच्या मनाप्रमाणे हसतात. त्या मला सीमित करीत नाही.”

तर राणी चंदा या बहुआयामी बंगाली लेखिकेने लिहिलेल्या पुस्तकात रवीन्द्रनाथांनी उद्गारलेले काही संदर्भ आढळतात. त्यात ते म्हणतात :

मला वाटते, मला इतर सर्व गोष्टींपासून मुक्तता मिळून केवळ चित्रनिर्मिती करता आली असती तर! आज मनापासून मला चित्र निर्मितीची ऊर्मी जाणवते आहे. “

या त्यांच्या वक्तव्यावरून असे वाटते की, शब्दांद्वारे व्यक्त होताना येणारी बंधने, मर्यादा त्यांना जाणवत असावी आणि ही अपुरेपणाची आणि असमाधानाची भावनाच कदाचित त्यांना चित्रकलेकडे घेऊन आली. बालपणानंतर मधल्या काळात चित्रकलेशी त्यांचा थेट संबंध आला नसला तरी ते तिच्याविषयी उदासीन होते असे मात्र नव्हे. ‘‘माझी पहाट फुलांनी डवरली होती, माझे मावळते दिवस रंगांनी बहरून  निघावे,’’ असे ते एकदा म्हणाले होते. अर्थात चित्रकलेचे विलोभन त्यांना होतेच. त्यांच्या गगनेन्द्रनाथ आणि अवनीन्द्रनाथ या पुतण्यांनी अजिण्ठा,मोगल आणि राजपूत या चित्रपद्धतीची वळणे आणि जपानी रंगलेपन पद्धती यांच्या संयोगाने भारतीय चित्रकलेच्या पुनरूज्जीवनाचा प्रयत्न चालविला त्यावेळी रवीन्द्रनाथांनी त्यांना पाठिंबा दिला आणि पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाने लुळ्या झालेल्या भारतीय रसिकतेला त्यांनी हात दिल्याबद्दल त्यांची पाठ थोपटली. या दोघांच्याही चित्रांचे ते आस्थेने रसग्रहण करीत आणि वेळोवेळी त्यांना मौलिक सूचनाही करीत. पणबंगाल स्कूलया नावाने सुरू झालेली ही पुनरूज्जीवनाची चळवळ पाच वर्षे झाली तरी नीट जीव धरीत नाही, जुनेच कित्ते सारखे गिरवित राहते, असे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा आपल्या ऋणानुबंधातील तरुण चित्रकारांना भारतीय चित्रकलेची खरी आकांक्षा आणि दिशा कोणती असली पाहिजे हे जरा धारेच्या आवाजात ते बजावू लागले.मुकुल डे या त्यांच्या लोभातल्या तरुण चित्रकाराला 1913 मध्ये लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात :

‘‘ सौंदर्य म्हणजे भ्रम नव्हे, चेटूक नव्हे किंवा नजरबंदी नव्हे, सौंदर्य म्हणजे सत्य. तुमच्याभोवती असंख्य क्षुद्र आणि कुरूप वस्तू असतात, पण तुमच्या ध्यानामुळे त्याच्यातले सौंदर्य तुम्हाला पहाता आले पाहिजे.’’ 

त्यांनाच लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात :

‘‘आपल्या भोवतालचे जग नीट बघा आणि तुम्हाला असे आढळून येईल की ते बळकट आहे, भक्कम आहे आणि दृढ आहे. जगाचे विराट सौंदर्य आपली विरूपता लीलया आणि निःसंकोचपणे पेलू शकते. तुमचा कुंचला असा नसावा की जो एखाद्या भ्रामक सरस्वतीच्या पावलांना अळिता(अलतालावण्यातच गर्क राहील.’’

जपान  दौऱ्यादरम्यान अवनीन्द्रनाथ व गगनेन्द्रनाथ या पुतण्यांना रवीन्द्रनाथांनी लिहिलेली पत्रे तत्कालिन  शैलीबाबत त्यांची मते  स्पष्ट  दर्शवितात. 8  ऑगस्ट  1916 रोजी गगनेन्द्रनाथांना जपान येथून लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात : 

‘‘गगन, घरातून बाहेर पडून कधी तू आजूबाजूचे जग पाहणार आहेस? तुझे नाव तू सार्थक केले पाहिजे. पण तुमच्या मागे लागणं व्यर्थ आहेमी याविषयी बराच विचार केला. बाहेरून मिळणारा झटका हाच चेतना जागृतीचा उत्तम मार्ग आहे…..’’ 

तर, अवनीन्द्रनाथांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात

‘‘अवन….मी जितका येथे जपानमध्ये फिरतो आहे तेवढ्या तीव्रतेने मला असे वाटते की, तू येथे असावयाला हवे होते. जपानच्या जिवंत कलेला जाणून घेणे हे किती महत्त्वाचे आहे, जेणे करून आपलीही कला पुनरूज्जीवित होऊन बहरेल. मात्र हे तुला तुझ्या दक्षिणेकडील वर्‍हांड्यात निव्वळ बसून कधीही कळणार नाही. तू येथे असता तर तुझ्या  डोळ्यांवरील जाड पट्टी गळून पडली असती आणि तुझ्यातील कलादेवतेला तिची योग्य भेट मिळाली असती. येथे जपानला आल्यावर मला जाणीव झाली की, कशाप्रकारे तुमची कला अपयशी ठरली आहे. पण मी काय करू शकतो? तुमच्यापैकी कुणीही त्यातून बाहेर पडणार नाही…..’’

चित्रकलेत अनेक पध्दती असतील, त्यातून  शिकण्यासारखेही पुष्कळ असेल. त्यांच्यात ही नवीन ही जुनी असे वर्गीकरण करणे आवश्यक नाही. आपल्या परंपरेतील शाश्वत मूल्यांचा वारसा सांभाळावा आणि जीवनाला सन्मुख राहून तो समृध्द करावा  अशी कोणत्याही क्षेत्रातील पुनरूज्जीवनाबाबतची रवीन्द्रनाथांची भूमिका होती. ती  लक्षात घेता जुनी, नवी जी जी चित्रकला त्यांना पहायला मिळाली ती त्यांनी खचितच डोळेभरून पाहिली असली पाहिजे आणि तिचे रहस्य समजून घेण्याचाही प्रयत्न केला असला पाहिजे. पण स्वतःच या क्षेत्रात काही करावे असे काही त्यांच्या मनात आले नव्हते. मात्र 1924 मध्ये रवीन्द्रनाथ दक्षिण अमेरिकेच्या  दौऱ्यावर असताना बुएनॉस आयरेस (Buenos Aires)या  शहरात आजारी पडले. ते आजारातून पूर्ववत व्हावे म्हणून त्यांची परमभक्त असलेली तेथील प्रसिध्द स्पॅनिश कवयित्री आणि लेखिका व्हिक्टोरिया उकाम्पु(Victoria Ocampo) ही त्यांना तेथून वीस मैलांवरच्या आपल्या सॅन इसिड्रो (San Isidro) येथील सुंदर व प्रसन्न उद्यानगृहात मोठ्या आग्रहाने घेऊन गेली. व्हिक्टोरिया ही एक लोकोत्तर विदुशी होती. या मुक्कामादरम्यान व्हिक्टोरियाने  रवीन्द्रनाथांमधील चित्रकाराचे गुण हेरले. तिने दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते खऱ्या अर्थाने चित्रकलेकडे वळले. 1925 मध्ये प्रसिध्द झालेल्यापूरबीया कविता संग्रहातील बहुतेक कविता त्यांनी सॅन इसिड्रो येथील मुक्कामात लिहिल्या होत्या. रवीन्द्रनाथांना कविता आणि गिरगिट चित्रे या दोन्हींवर काम करतानाचे वर्णन व्हिक्टोरिया करते ते असे:

ते अशा रेषांची निर्मिती करीत ज्या अचानक जिवंत होत आणि त्यांच्या या खेळातून प्राचीन हिंस्त्र श्वापदे, पक्षी,चेहरे आकाराला येत.” 

पूरबीच्या या हस्तलिखितातील गिरगिट चित्रे (चित्र क्र.1,2) निव्वळ आकृत्या नसून ताल व लयीचे नियम सांभाळत रूप (फॉर्म) व कल्पना यांचा मेळ सांभाळून निर्माण झालेल्या अर्थपूर्ण रचना आहेत. लक्षवेधक डोळे, चोच अथवा अणकुचिदार दात, चेष्टेखोर मानवी चेहरे, वक्राकारवळवळणारे सापपक्षी आणि मानवांचे कोनात्मक चेहरे साधारणतः अशा पध्दतीच्या या कलाकृती आहेत. ‘पूरबीचे हे हस्तलिखित म्हणजे जणू रवीन्द्रनाथांच्या कल्पनाविष्काराचे द्योतकच आहे. या रचनांमधील पक्षी प्राण्यांच्या प्रजाती ओळखणे कठीण असून रवीन्द्रनाथांच्या जणू स्वनिर्मित प्राणिशास्त्रातील या प्रजाती आहेत. या रचनांविषयी रवीन्द्रनाथ म्हणतात :

‘‘हे प्राणी म्हणजे ज्यांना या जगातील अस्तित्वच नाकारले आहे त्यांचे नेमस्त अतिशयोक्तिपूर्ण चित्रण असून या रचनांमधील पक्षी म्हणजे केवळ तुमच्याआमच्या स्वप्नात येऊन आपली झोप उडविणारे भयंकर असे जीव आहेत, ज्यांना त्यांचे घरटे आपण अगत्याने बहाल केलेल्या रेषांद्वारे केवळ आपल्या कॅनव्हासवर प्राप्त होईल.’’

या आकृत्यांचा संबंध रवीन्द्रनाथांच्या बालपणीच्या आठवणींशी असावा असे त्यांनी लिहून ठेवलेल्या आठवणींमधून प्रतीत होते. या संदर्भात ते लिहितात :

त्या काळी प्रत्येक व्यक्तीच्या मनावर भूतं आणि आत्मा यांचा जबरदस्त पगडा होता. संपूर्ण वातावरण भूतांच्या गोष्टींनी व्यापलेले असायचे. या सगळ्याचा माझ्यावर इतका परिणाम झाला होता की अंधारात मेजावरून पाय न थरथरता खाली ठेवणे म्हणजे केवळ अशक्यच होते.”

त्याकाळी कुठेही पाणी पुरवठा करणारे नळ अथवा वीज देखील नव्हती. टागोरांच्या वाड्यात खालच्या खोलीत वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याची तरतूद म्हणून मोठमोठी अवाढव्य भांडी भरून ठेवलेली असत. या संदर्भातील रवीन्द्रनाथांची आठवण नमूद करण्यासारखी आहे. ते म्हणतात

‘‘त्या कुबट, घाणेरड्या आणि संधिप्रकाशाने आच्छादलेल्या खोल्या म्हणजे गूढ वस्तूंचे घर होते….त्यांची आऽवासलेली तोंडे, छातीवरील डोळे, सुपासारखे मोठे कान आणि उलटे पाय असे त्यांचे स्वरूप भासत असे. या अशा राक्षसी आकारांना पाहून माझे हृदय धडधडत असे आणि हातपाय कापत यात नवल ते काय?’’

व्हिक्टोरिया उकाम्पु हिला जरी रवीन्द्रनाथांमधील चित्रकार शोधण्याचे श्रेय जात असले तरी कलेच्या संदर्भात विचार केला असता रवीन्द्रनाथांच्या  आयुष्याला कलाटणी मिळाली ती प्रामुख्याने 1921  मध्ये असे म्हणता येईल. मात्र चित्रकार म्हणून ते बहरले ते नंतरच. टागोरांमध्ये कोणातही न बघावयास मिळणारी  अशी प्रचंड उत्सुकता होती. त्यांचा लौकिक व विभिन्न संस्कृतीतील आघाडीच्या व्यक्तिमत्वांशी त्यांची असलेली मैत्री यामुळे विविध देश, त्यांची संस्कृती, कला यांच्याशी ते परिचित होते व त्याचा आस्वादही घेत होते. 1921 च्या जर्मनीच्या दौऱ्यादरम्यान त्यांचा परिचय जर्मन संस्कृती, मॉडर्निझम, आविष्कारवाद शिवाय विमर येथीलबाहाऊसयांच्याशी झाला. याचीच परिणती म्हणजे 1922 मध्ये कलकत्ता येथे आयोजित केलेले आधुनिक जर्मन चित्रकारांचे प्रदर्शन ज्यात बहुतांश चित्रकार बाहाऊसचे होते. इतर युरोपीयन कलांचा अनुभवही रवीन्द्रनाथांनी आपल्या  युरोप दौऱ्यामध्ये घेतला होता. आपल्या पॅरिसच्या मुक्कमात कलादालनांना दिलेल्या भेटींचा उल्लेख रवीन्द्रनाथांनी केला असून या भेटी त्यांचे फ्रेंच मित्र अॅंड्री कार्पेलस या चित्रकाराने आयोजित केल्या होत्या. रवीन्द्रनाथांनी उत्साहाने व्हॅन गॉगच्या कलाकृतींचा उल्लेख मुख्यत्वे त्यात मुख्यत्वाने केलेला आढळतो. त्यामुळे रवीन्द्रनाथांनी जेव्हा चित्रकलेला सुरुवात केली तेव्हा तांत्रिक दृष्ट्या जरी ते या माध्यमात नवखे होते तरी त्या काळातील इतर कुठल्याही भारतीय चित्रकारापेक्षा आधुनिक कलेच्या दृष्यानुभवाबाबत ते अधिक समृद्ध होते.

रवीन्द्रनाथांच्या चित्र आराधनेच्या सुरूवातीच्या कालखंडातील गिरगिट चित्रे (चित्र क्र.1, 2)आणि पेंटीग्ज यांचे स्त्रोत वा प्रेरणास्थान काय बरे असावे? उत्स्फूर्तता आणि अबोध मनातील विचारांच्या आविष्कारासोबतच या कलाकृती अमेरिकन रेड इंडियन आणि पूर्वार्धातील कोलंबियन कलेशी शिवाय ज्याला प्राचीन कला म्हणता येईल अशा कलांशी विलक्षण साम्य दर्शवितात. उदाहरण घ्यायचे झाल्यास,‘पूरबीच्या हस्तलिखितातील रेखाटलेली प्राण्यांची शीर्षे (चित्र क्र.1)इस्टर आयलंड या पॅसिफिक समुद्रात असलेल्या बेटावरील मासोळीप्रमाणे शीर्ष असलेल्या कलाकृतींशी  साधर्म्य दर्शवितात तररक्त करबी’(1923) च्या हस्तलिखितातील एक रेखाटन (चित्र क्र.3)हे ब्रिटीश कोलंबियन शिल्पाची आठवण करून देते. शिवायपूरबीच्या हस्तलिखितातील मोठ्या चोचींचे आणि वाटोळ्या डोळ्यांचे पक्षीहैदाया मूलतः उत्तर अमेरिकेतील रहिवासी असलेल्या जमातीतील कलेतील चित्रित पक्षी आणि लाकडात कोरलेल्या पक्ष्यांपासून प्रेरित असावे असे वाटते, तर अणकुचिदार पक्ष्यांची रेखाटने पॅसिफिक सागराच्या वायव्य किनारपट्टीजवळील जमातीच्या विविध लाकडी वस्तूंशी साधर्म्य दर्शवितात. टागोरांनी केलेल्या गिरगिट तंत्रपद्धतीतील पात्रांची रेखाटने पेरुव्हियन (दक्षिण अमेरिकेतील पेरू देशातील स्थानिक कला.)पद्धतीने सुशोभिकरण केलेल्या पात्रांची आठवण करून देतात. अशी पात्रे मुख्यत्वे पेरू येथे विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने टागोरांच्या रेखाटनांचे या पात्रांशी साधर्म्य साधणे हा निव्वळ योगायोग असणे शक्य नाही. शिवाय येथील वस्त्रांवर चित्रित केलेल्या पक्षांच्या रचनाही टागोरांच्या रचनांशी असणारे आपले नाते सरळ स्पष्ट करतात.

चित्र क्र. १,२
चित्र क्र. ३

येथे एक गोष्ट मात्र आपल्याला लक्षात घ्यावी लागेल ती म्हणजे रवीन्द्रनाथांनी आपल्या लिखाणात मात्र कोठेही त्यांची कला ही अशा प्रकारच्या प्राचीन किंवा पाश्चात्त्य देशातील विविध जमातींच्या कलांपासून प्रेरित होती याचा उल्लेख केलेला आढळत नाही. मात्र कलेवरील विविध प्रभावांसंदर्भात बोलताना एके ठिकाणी ते म्हणतात :

 ‘‘एखाद्या कुशल, कुशाग्र व्यक्तिची स्वतःच्याही नकळत इतर गोष्टींचा प्रभाव ग्रहण करण्याची अचाट क्षमता म्हणजे त्या व्यक्तीचे अतुल्य असे गुणविशेष होत.’’

या त्यांच्या विधानाचा विचार करता टागोरांच्या परदेशवारीत त्यांनी विविध देशांना व तेथील संग्रहालयांना दिलेल्या भेटी व त्या भेटी आधी त्या देशांची संस्कृती, कला, इतिहास जाणून घेण्यासाठी त्या संदर्भात त्यांनी केलेले वाचन याद्वारा विविध देशांच्या कलांशी, संस्कृतींशी त्यांचा परिचय झाला होता असे आपण निश्चितच म्हणू शकतो.

 शिवाय 1879  मध्ये इंग्लंड भेटीदरम्यान ते वारंवार ब्रिटीश म्युझियमला भेट देत. या संग्रहालयात अफ्रिका व अमेरिकेतील प्राचीन कलांचे अनेक नमुने संग्रहित केले आहेत. त्यामुळे निश्चितच या प्राचीन कलेशी टागोरांची ओळख होती असे  म्हणता येते. शिवाय 1921 च्या युरोप भेटीदरम्यान जर्मनीतील अनेक शहरांना त्यांनी भेट दिली होती. त्यातील बर्लिन येथील संग्रहालयातील अफ्रिकन कला आणि दक्षिण समुद्रातील बेटांवरील कलेचे नमुने विशेष प्रसिद्ध आहेत आणि टागोरांच्या मुखवट्याप्रमाणे भासणाऱ्या कलाकृतींवर बर्लिन संग्रहालयातील मुखवट्यांचा प्रभाव जाणवतोच. शिवाय 1926  मध्ये एपस्टाईन (Epstine) या इंग्रज शिल्पकाराने टागोरांचे शिल्पांकन केले होते. तेव्हा एपस्टाईनच्या संग्रही असलेल्या उत्कृष्ठ प्राचीन कलेच्या नमुन्यांची पाहणी टागोरांनी निश्चितच केली असेल.थोडक्यात सांगायचे झाले तर टागोर हे विविध देशातील पारंपरिक व  प्राचीन कलांशी चांगलेच परिचित होते. त्यांच्या कलाकृतीत जाणवणारे वैचित्र्यपूर्ण कल्पनाविलास आणि असुंदरता यांची प्रेरणा कदाचित या प्राचीन कलेच्या नमुन्यांमध्ये दडलेली असावी.

आपल्या चित्रातीलकुरूपताआणिअसुंदर’  या विषयी बोलताना रवीन्द्रनाथ म्हणतात

‘‘या महाकाय पशूंना पाहणे मला आवडते. त्यांची अवाढव्य शरीरे, प्रचंड ताकद, अक्राळविक्राळता पण इजा न पोहचविणारी वृत्ती मला भावते. त्यांचा अवाढव्य आकार आणि ओंगळवाणे रूप यामुळे मला त्यांच्याबद्दल कणव वाटते. त्यांच्या बोजडपणात मला निरागसता दिसते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे मन आणि हृदय विशाल आहे. जेव्हा ते चिडतात तेव्हा ते हिंसक होतात मात्र शांत झाले की जणू ते शांततेचे प्रतीक होतात. त्यांच्या भव्य रूपाने त्यांना प्राप्त झालेली कुरूपता बघणाऱ्याला त्यांच्यापासून दूर न नेता आकर्षित करते.”

 प्राचीन कलेचे गुणधर्म हेरून तिचे ग्रहण करून कलाकृती निर्माण करणारे कदाचित रवीन्द्रनाथ पहिलेच भारतीय कलाकार असावेत. भारतीय चित्रकलेच्या दृष्टीने त्यांचे हे कार्य महत्त्वाचे ठरते.आपल्या हस्तलिखिताच्या पानांवरून रवीन्द्रनाथ जेव्हा चित्रनिर्मितीसाठी कोऱ्या कागदाला सामोरे गेले तेव्हा त्यांची कलाकृती म्हणजे कोऱ्या पृष्ठभागावर चितारलेली एकच आकृती असे. या प्रकारच्या कलाकृती निर्मितीचा कालखंड साधारणतः 1928-1929 हा होता. या निर्मितीसाठी माध्यम म्हणून मुख्यत्वे काळ्या शाईचा वापर रवीन्द्रनाथांनी केलाया सुरूवातीच्या काळातील आकृत्यांचा अभ्यास केला असता त्या सरळ, साध्या, उभ्या अवस्थेत दर्शविल्या असून त्यांचे हात उंचावलेले व पाय बाहेरील बाजूस वळलेले दर्शविले आहेत. त्या आकृत्यांमधून आपल्याला कुठलाही विशिष्ट असा भावनाविष्कार साधल्याचे जाणवत नाही. कदाचित वेगवेगळ्या हालचाली दर्शविण्याचा तो केवळ प्रयत्न असावा असे वाटते. याच्या पुढची पायरी म्हणजे रवीन्द्रनाथांनी वेगवेगळ्या क्रियांमध्ये मग्न घोळक्यांचे केलेले चित्रण. यातील आकृत्या वाकलेल्या,बसलेल्या,उभ्या, वर बघणाऱ्या अशा विविध अवस्थेत चित्रित केल्या आहेत. जणू काही त्या रंगमंचावर नाटकातील दृष्य सादर करीत आहेत.

साधारणतः 1930 च्या दरम्यान त्यांनी रंगांचा उपयोग आपल्या कलाकृतीत केलेला आढळतो. चित्रकार म्हणून स्वतःला घडवत असताना गुरुदेवांनी अनेक प्रयोग केले. सुरुवातीचा काळा रंग जाऊन ते इतरही रंग वापरू लागले. रेषेवरील पकड मजबूत होत गेली. रंग हाताळण्यातला नवखेपणा जाऊन त्यात सहजता आली. तंत्रहाताळणी, माध्यमांवरील तसेच अवकाश विभाजनावरील प्रभुत्व वाढीस लागले. चित्रकार म्हणून प्रगल्भतेकडे पोहोचलेल्या गुरुदेवांनी रंगीत पेन्सिली,क्रेयॉन्स व त्यासोबत रंग यांचे समायोजन करून अनेक चित्रणे केली. ही चित्रणे त्यांच्यातील परिपक्व होणाऱ्या चित्रकाराची ओळख पटवितात. त्यात गुढता नाट्यमयता, अद्भुत, दुःख, कारुण्य आणि घाबरलेले असे अनेक भाव त्यांच्या या चित्रणात आपल्याला दिसतात. त्यापैकी काही कलाकृतींचा आढावा येथे आपण घेऊया .

व्यक्तिचित्रण 

रवीन्द्रनाथांच्या चित्रनिर्मितीबद्दल बोलत असताना त्यांनी केलेली विविध व्यक्तिचित्रणे अतिशय महत्त्वाची ठरतात. वेगवेगळा चेहरामोहरा असणारे आणि विरूपता दर्शविणारी ही व्यक्तिचित्रणे काहीशी व्यंगचित्रांप्रमाणे भासतात. सुरुवातीच्या काळात चेहऱ्यातील हे वैविध्य आणि विरूपता पेन अथवा ब्रशच्या उत्स्फूर्त हाताळणीतून, फराट्यातून अथवा नाजूक वळणांद्वारे आपोआप साकार होतअसे, ज्याद्वारे त्या चित्रणातून कधी नाक लक्षवेधी ठरत असे तर कधी आऽवासलेले तोंड दिसत असे. परंतु पुढे पुढे असे चेहरेपट्टीतील वैविध्य साकारणे व विविध भाव चित्रित करणे हा जणू टागोरांना छंदच जडला होता. जरी सुरुवातीच्या काळात सुदंर चित्रण करणे त्यांना त्यांच्या मर्यादांमुळे सहज शक्य नसले तरी नंतर  त्यांच्या शांत व स्थितप्रज्ञ वृत्तीमुळे त्यांना ते सहज शक्य झालेही असते. परंतु त्यांची एकूणच कला निर्मिती पाहिल्यास त्यांचा कल सौंदर्याप्रति नसून वैचित्र्यlकडे होता हे लक्षात येते. येथे एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे टागोर हेप्रतिमावादीहोते. ही प्रतिमा उत्फूर्त तर आहेच शिवाय काहीतरी  सांगणारी देखील आहे. या प्रतिमेचा बघणाऱ्याला जाणवणारा अर्थ आणि प्रभाव त्या प्रतिमेत मूलतः असणाऱ्या शक्तीने, दृष्य परिणामांनीआणि संमोहित करणाऱ्या प्रभावी अस्तित्वाने साकारल्या जातो. निसर्गातील कुठल्याही वस्तूशी ती सादृष्यत्व साधत नसल्याने ती प्रतिकृती देखील ठरत नाही. ती वस्तूंमधील संबंध तर दर्शविते शिवाय वस्तू आणि भावना यांच्यातील संबंधही अधोरेखित करते. टागोरांची प्रतिमा म्हणजेमानसिक प्रक्रियेची अनुभूतीठरते. आता रवींद्रनाथांनी साकारलेल्या काही व्यक्तिचित्रांचा येथे आढावा घेऊ.

रवींद्रनाथांनी साधारणतः 1929 च्या अखेरीस केलेले हे पहिले स्त्री चित्रण(चित्र क्र.4) असावे अशी नोंद आपल्याला आढळते. यातील  स्त्रीचा अंडाकृती चेहरा केसांनी व साडीच्या पदराने वेढलेला असून त्याच आकारात त्याच्या मागील बाजूस आडव्या रेषेत रंग लेपन केले आहे . हे लेपन ब्लेडने केले असावे असे वाटते.ठाशीव रेषांनी साकारलेले हे चित्रण आहे. चित्र क्र.5 हे 1930 च्या प्रदर्शनात प्रदर्शित केलेले स्त्री चित्रण आहे. पुढील चित्र साकारताना रंगीत पेन्सिलींचा उपयोग केला असून साडी साठी रंगीत क्रेयॉन्स वापरले आहेत.(चित्र क्र.6)तर चौथे चित्र हे साधारण 1940  मध्ये साकारले आहे. (चित्र क्र.7) हे चित्र कोणा एका व्यक्तीला समोर बसवून चित्रण केले असावे असे वाटते. या कलाकृतीत चेहऱ्यावरील भाव तीव्रतेने दर्शवण्यात प्रकाशाचा मोठा वाटा आहे. या चित्रांचा अभ्यास केला असता पहिल्या दोन चित्रात चमकत्या डोळ्यांच्या,ऐन तारुण्यात पदार्पण केलेल्या षोडशे पासून ते अवखळ तरुणीचा प्रवास आपल्याला दिसतो. तिसऱ्या चित्रात प्रगल्भता असलेली स्त्री जाणवते तर चौथ्या चित्रात मध्यम वयाची, जीवनाचा अनुभव घेतलेली आणि तो आपल्या चर्येतून दर्शवणारी स्त्री दिसते

चित्र क्रम अनुक्रमे  ४, ५, ६ आणि ७

कालपरत्वे चित्रकार म्हणून प्रगल्भ व अनुभवी झालेले गुरुदेव या कलाकृतींद्वारा आपल्यासमोर येतात. गुरुदेवांच्या या आणि इतरही स्त्री चित्रणांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, त्या एक प्रकारच्या अंतर्भावनेने ओथंबलेल्या आहेत. सावळाकाळा रंग, गडद छायेत लपलेला चेहरा ,करूणेने ओथंबलेले डोळे,थेट समोर न बघता डोळ्यांच्या  कडांतून बघणारेघाबरलेले डोळे असे चित्रण यांनी केले आहे. गुरुदेवांनी सावळ्या रंगाच्या हरिणीसारखे डोळे असणाऱ्या मुलींवर लिहिलेल्या कविता प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नाटकाच्या नायिकाही सावळ्याच आहेत. पण त्यांचे चित्रण त्यांनी आशा आणि प्रेरणा देणाऱ्या नवीन युगातील स्त्रियांच्या स्वरूपात केले आहे. परंतु टागोरांच्या चित्रातील स्त्रिया या त्यांच्या साहित्यातील नायिकांशी फारकत घेताना दिसतात. गुरुदेवांनी आपल्या चित्रात रेखाटलेल्या स्त्रिया या त्यांच्या अनुभवावर आधारित होत्या. पारंपरिक बंगाली स्त्रीचे चित्रणच गुरुदेवांनी येथे केले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांचे उदास डोळे आणि पार्श्वभूमितील मोठ्या गडद सावल्या जणू त्यांच्या असमर्थतेचे करूण रूदन करतात. या स्त्रिया रसिक  प्रेक्षकांना पावसाळ्यातील बरसून थकलेल्या व ओझ्याने झुकलेल्या ढगांची आठवण करून देतात. या कलाकृतींमधील रंग त्या भावनांना पोषक वातावरण निर्माण करतात. भारतीय समाजातील स्त्रियांची एकूण परिस्थिती त्यांनी अनुभवली होती तीच त्यांच्या कलाकृतीतून समोर येते. स्त्रीचे समाजातील दुय्यम स्थान, तिच्यावर होणारे अत्याचार, कुचंबणा गुरुदेवांच्या संवेदनशील मनाला भिडली.त्यामुळे तिचे दुःख त्यांना जाणवले आणि अशा दुःख सोसणाऱ्या करूण,अगतिक स्त्रियांचे चित्रण त्यांनी केले

अशाच प्रकारच्या भारतीय स्त्रियांचे चित्रण पुढे आपल्याला अमृता शेरगील आणि एम. एफ. हुसेन यांच्या चित्रात बघावयास मिळते. या कलाकारांनी चेहऱ्याचे चित्रण करीत असताना पूर्वापार चालत आलेल्या रेखाप्रधान शैलीला किंवा प्रचलित प्रमाणबद्धतेला डावलले होते. चित्रणाची ही पद्धत रूढ करण्याचे श्रेय जाते ते अर्थातच रवीन्द्रनाथांना. या कलाकारांच्या कलाकृतींमधील व्यक्ती त्यांच्या आजूबाजूला वावरणाऱ्या, त्यांनी बघितलेल्या आणि अनुभवलेल्या अशा स्त्रिया होत्या. शिवाय इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची ठरते ती म्हणजे राजा रवी वर्मा यांनी स्त्रीची जी नखरेल आणि उपभोग्य वस्तू म्हणून प्रतिमा निर्माण केली होती, त्याला टागोरांच्या स्त्रियांनी तडा दिला आणि नाकारले.

रवीन्द्रनाथांनी केलेल्या पुरुष चित्रणाचा आवाका पहिल्यास मिश्किल,खट्याळ चेहरे ते शोकमग्न भाव दर्शविणारे चेहरे अशा विभिन्न भावभावनांना प्रदर्शित करणारी मालिका त्यांनी साकारलेली दिसते. (चित्र क्र.8,9) रवींद्रनाथ यांनी स्वतःचे केलेले व्यक्तीचित्रण(क्र.10)  व रोथेनस्टाइन यांनी त्यांचे  संताप्रमाणे भासणारे केलेले व्यक्तिचित्रण (चित्र क्र.11)  म्हणजे जणू जगाला व इतरांना दिसणारे भासणारे रवींद्रनाथ व स्वतःच स्वतःला पारखणारे रवींद्रनाथ यांच्यातील विरोधाभास होय

 या व्यक्तीचित्रांवरून असा प्रश्न पडतो की ही चित्रे त्यांच्या अबोध मनातून समोर आली असावीत का? खोलवर दडलेल्या भीतीची आणि अकांक्षांची ही स्पंदने असावीत ज्याची धार त्यांनी आपल्या कवितांमध्ये तोल सांभाळून, तार्किकता व अध्यात्मिकता बाळगून, मनुष्याचे उदात्तीकरण करून कमी केली होती . खरे म्हणजे असे म्हणायला हरकत नाही, रवींद्रनाथांची व्यक्तीचित्रे ही स्वअभीव्यक्तीचे किंवा अंतःप्रवासाचे जणू एक माध्यमच होते !

चित्र क्र. ८, ९
चित्र क्र. १०, ११

निसर्गचित्रण:-

रवीन्द्रनाथांनी निर्माण केलेल्या चित्रसंपदेत निसर्गचित्रणाचा महत्त्वाचा वाटा आहे. अतिशय रोचक, भावनाप्रधान, परिष्कृत आणि परिपक्व अशा रचना टागोरांनी या कलाप्रकारात साकारल्या आहेत. साधारणतः 1929 ते 1939 हा कालखंड या कलाकृतींचा निर्मिती काळ असला तरी त्यातील बहुतांश कलाकृती टागोरांनी 1930 च्या दशकाच्या दुसऱ्या  पर्वात साकारल्या आहेत. विविध तंत्रांचा वापर करत साकारलेल्या या रचनांमधून आपल्याला रवीन्द्रनांथामधील घडत जाणाऱ्या  आणि परिपक्व होणाऱ्या  कलाकाराचा प्रवास दिसून येतो. या कलाकृतीमंधून रवीन्द्रनाथांची समृद्ध होणारी निव्वळ शैलीच दिसत नाही तर रचनाचित्रांप्रती त्यांची वाढत जाणारी संवेदनक्षमता, रंगाचीआणि रंगछटांची, पोत आणि सौंदर्याची वाढती जाण, रेषांची लय आणि वातावरण निर्मितीसाठी केलेला त्यांचा समर्पक उपयोग आणि निसर्गाचे रहस्य व त्याच्या चित्तवृत्ती यांना समजून घेण्याची त्यांची तहान प्रतीत होते. (चित्र क्र.12,13)   

 रवीन्द्रनाथांनी केलेले हे फुलांचे अथवा निसर्गाचे चित्रण, निसर्गाचे अभ्यास चित्रण नसून त्यांनी अनुभवलेल्या निसर्गाचे जणू ते प्रतिबिंब आहे. त्यांनी चित्रित केलेली फुले, पाने आपल्याला या निसर्गात आढळणारही नाहीत. कारण निसर्ग चित्रित करताना एकूण वातावरण निर्मिती करणे हा त्यांचा प्रमुख हेतू असे. मुळात ही चित्रे टागोरांनी कुठल्या विशिष्ट स्थळी बसून किंवा समोर जसे दृष्य दिसते तसे बघून साकारली नसून विशेषतः शांतीनिकेतनच्या भोवताली जंगलसदृष्य भासणाऱ्या रसरशीत निसर्गाकडून प्रेरणा घेऊन साकारली आहेत. टागोरांची सुरुवातीच्या काळातील निसर्गचित्रणे उत्स्फूर्त आणि असुसंगत अशा ब्रशच्या फटकाऱ्यांद्वारे आणि रेखाटनाद्वारे काळ्या शाईत साकारली असून मुख्य कल्पनेला महत्त्व देत ती एकरंगसंगतीत घडविली आहेत. सुरुवातीच्या या चित्रणात काळ्यापांढऱ्याचा ताळमेळ साधणे आणि वातावरणाला समजून घेत निसर्गातील काल्पनिक एकसंघता चित्रित करण्याचा प्रयत्न करणे या बाबींवर टागोरांनी भर दिलेला दिसतो. माध्यमांच्या हाताळणीवर जम बसल्यावरच टागोरांनी चित्राच्याप्रकाशया घटकाकडे पुढे विशेष लक्ष दिल्याचे आपणास दिसून येते.

चित्र क्र. १२

चित्र क्र. १३

पुढे विविध रंग,त्यांच्या छटा, त्यांची घनता आणि पारदर्शीपणा, त्या रंगांची चकाकी किंवा निस्तेजता त्यांच्याद्वारे टागोरांनी त्या कलाकृतीत बारकाव्याने साधलेले छाया प्रकाशाचे वैविध्य आणि त्यातील घटकांचे आणि अवकाशाचे गुणधर्म कायम ठेवत साधलेला एकत्रित परिणाम लक्षवेधी ठरतो. रवीन्द्रनाथ कलाकृतीतील घटकांना वेळ, ऋतु, हवामान, छायाप्रकाश यांच्या तोलामोलाचे महत्त्व प्रदान करीत प्रेक्षकाला त्या वातावरणाची अनुभूती प्राप्त करुन देतात. मर्यादित रंगांच्या वापरातून, उत्स्फूर्तपणे पण वास्तविक बारकावे आणि रंगलेपन न करता बहुतांश वेळा मानवाकृती रहित साकारलेल्या या कलाकृती टागोरांच्या उत्कृष्ठ कलेचा नमुना आहेत.

एकूणच  काय तर  परंपरागत चालत आलेल्या विचारधारणेला छेद देण्याचे कार्य रवीन्द्रनाथांच्या कलाकृतींनी केले. चित्रकलेचे परंपरागत शिक्षण नसणे आणि चित्रकार म्हणून त्यातील नवखेपणा हे खरे म्हणजे रवीन्द्रनाथांसाठी वरदानच ठरले. त्यामुळे एखाद्या विशिष्ट शैलीचा पगडा असणे अथवा विशिष्ट शैलीतच काम करणे अशी बंधने त्यांच्यावर नव्हती. चित्रकलेचे तंत्र आत्मसात करताना त्यांनी विविध माध्यमे विविध प्रकारे हाताळली, त्यात असंख्य प्रयोग करून पाहिले. त्यामुळे विशिष्ट पद्धतीच्या माध्यमात किंवा तंत्रात न अडकून राहता विविध शक्यतांचा विचार टागोरांना करता आला आणि कालपरत्वे चित्रकलेचे तंत्र असंख्य अशा अनुभवांनी समृद्ध असलेल्या शक्यतांसह आत्मसात केले. उत्स्फूर्तता या नवीन गुणविशेषाची ओळख टागोरांनी भारतीय चित्रकलेला करून दिली असली तरी पोताद्वारे भावनिर्मिती, लय आणि रंग एकरूपता हे त्यांच्या कलाकृतीतील गुण पुन्हा आपल्याला त्यांच्यातील भारतीयत्वाची आठवण करुन देतात. टागोरांची अंतःप्रेरणा आणि सर्जनाची ओढ ही त्यांची या निर्मिती प्रक्रियेची खरी मार्गदर्शक होती. बेनेडेट्टो क्रोचे या इटालियन तत्त्चवेत्त्याच्या म्हणण्याप्रमाणे, ‘‘प्रत्येक खरी अंतःप्रज्ञा म्हणजे अभिव्यक्ति होय.’’ (म्हणजेच खरी अंतःप्रज्ञा कलाकाराला योग्य अशा तंत्रावर प्रभुत्व मिळविण्यास मार्गदर्शन करते.) त्यांचे हे विचार रवीन्द्रनाथांना पुरेपूर लागू पडतात.

समाप्त.

लेखाचा भाग एक वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा:

रवीन्द्रनाथ टागोर :एक बहुआयामी कला प्रवास : भाग-१

लेखाचा भाग दोन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा:

रवीन्द्रनाथ टागोर :एक बहुआयामी कला प्रवास : भाग-२

Related Posts

1 of 66

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.