News

९२ लाख ते ४८ कोटी एक प्रवास…

बघता बघता गायतोंडे यांची पेंटिंग्ज ४८ कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहेत. २००१ साली गायतोंडे यांचं निधन झालं. त्या आधी त्यांची चित्रं दोन चार लाखाच्याच घरात विकली जातं असत. पण त्यांचं निधन झाल्यानंरत मात्र त्यांच्या चित्रांच्या किंमती भराभर वेगाने वर जाऊ लागल्या. २००५ सालच्या फेब्रुवारीमध्ये त्यांचं चित्र मुंबईतल्या एका लिलावात ९२ लाखाला विकलं गेलं. ही कलाविश्वाच्या दृष्टीनं खूपच मोठी बातमी होती. अगदी मराठी वृत्तपत्रांना देखील या बातमीची दखल अगदी ठळकपणे घ्यावी लागली. इतकी ती बातमी त्या काळी महत्वाची ठरली. या साऱ्या क्रांतिकारी घटनेचं श्रेय ‘ओसीआन्स’च्या नेव्हिल टुली यांना द्यायला हवं.

तिथून मात्र सारंच चक्र फिरलं. गायतोंडे यांची लिलावात येणारी चित्र चर्चेचा विषय ठरु लागली. इतकंच नाहीतर वृत्तपत्रांच्या बातम्यांचा देखील विषय ठरु लागली. मराठी, हिंदी वृत्तपत्रांना देखील या विषयाची दखल घ्यावी लागली. त्यावेळचा एक किस्सा मुद्दाम इथं सांगावासा वाटतो. मी त्यावेळी नव्यानं घेतलेल्या स्टुडिओत इंटेरियरच काम संपताच रंग काम सुरु झालं होतं. रंग करणारे अर्थातच उत्तर भारतीय होते. त्यातल्या दोन कामगारांची आपापसात चर्चा चालू होती. एक कामगार दुसऱ्याला विचारात होता ‘साब क्या करते है ?’ तर दुसरा कामगार त्याला सांगत होता ‘साब पेंटिंग करते है !’ तर तो ऐकणारा कामगार त्याच्यावर उखडला. म्हणाला ‘क्या बात करते हो. साब थोडी अपने जैसे है !’ तो जवळ जवळ त्या माणसावर चिडलाच. म्हणाला ‘अरे बाबा अपने जैसे नाही, ओ तो चित्रकार है. परसो नवभारत मै तुमने पढा ना, कोई गायतोंडे नाम का चित्रकार है उसके चित्र करोडो रुपयो मे बिक गये, वैसा काम साब करते है !’ ही सारी चर्चा अर्थातच माझ्याबद्दल चालली होती. आणि किचनमध्ये बसून चहा करत करत मी ती ऐकत होतो. या लिलावांमुळे चित्रकलेचा किती मोठा प्रसार झाला आहे ते या एकाच उदाहरणावरुन दिसून यावे.

या पोस्ट सोबत त्या बातमीचं कात्रण मुद्दाम देत आहे. ते २००५ सालातलं आहे. आता २०२३ साल चाललंय. आणि गायतोंडे यांच्या चित्रांची किंमत १८ वर्षात पन्नास कोटीच्या घरात पोहोचली आहे. दोन वर्ष लॉकडाउनमुळे वाया गेली नसती तर त्यांच्या चित्रांच्या किंमती ७५ कोटींच्या घरात पोहोचल्या असत्या. अर्थातच हे लिलावाचं जग आहे. सारे पैशाचे खेळ आहेत. सर्व सामान्य माणसांची मती कुंठित करून टाकणाऱ्या घटना इथं वारंवार घडत असतात. कुणी सांगावं गायतोंडे यांच्या २ नोव्हेंबर २०२३ पासून सुरु होणाऱ्या जन्मशताब्दी वर्षात गायतोंडे यांच्या चित्रांची किंमत १०० कोटींच्या वर गेली तरी आश्चर्य वाटू नये.

या घटनेच्या निमित्तानं ‘चिन्ह’नं आपल्या यु ट्यूब चॅनेलवर एक विशेष व्हिडीओ प्रसारित केला आहे. ज्यात सहभागी झाले आहेत गोव्याचे अमूर्त चित्रकार सुहास शिलकर. हा व्हिडीओ अवश्य पाहा आणि गायतोंडे यांच्या विषयी अधिक जाणून घ्यायचं असेल तर ‘चिन्ह’नं प्रकाशित केलेला ‘गायतोंडे’ ग्रंथ वाचायला विसरु नका. त्या संबंधीचे माहिती पत्रक फोटोंमध्ये दिले आहे. शिवाय फेसबुकच्या गायतोंडे पेज वर सर्व माहिती उपलब्ध आहेच.

*****

– सतीश नाईक
संपादक, चिन्ह आर्ट न्यूज

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.