No products in the cart.
मीना नाईक यांच्या पुस्तकाची नववी आवृत्ती
सगळीकडे वाचन संस्कृती लोप पावत आहे अशी ओरड सुरु आहे. याचवेळी जेजेच्या माजी विद्यार्थिनी मीना नाईक यांच्या ‘अ हँडबुक ऑफ पपेट्री’ या इंगजीतील पुस्तकाची नववी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. तर याच पुस्तकाच्या ‘कळसूत्री बाहुल्या मार्गदर्शिका’ या मराठी अनुवादाची तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली आहे.या पुस्तकात पारंपारिक कळसूत्री बाहुल्यांची माहिती आणि रेखाचित्रं दिली असून आधुनिक सर्जनशील बाहुल्या टाकाऊ वस्तुंपासुन कशा बनवाव्यात हेही सचित्र दाखवलं आहे. या पुस्तकात शिक्षणामध्ये या बाहुल्यांचा कसा उपयोग करावा हेसुध्दा विस्तृत स्वरुपात सांगितलं आहे. सामाजिक समस्या, भाषा विकास या सर्वांसाठी बाहुल्यांचा कसा समर्पक उपयोग करुन घेता येतो हे नाटुकल्यांची लिखीतं देऊन सांगितलं आहे. मीना नाईक यांनी स्वत:च बाल लैंगिक शोषण, बालव्यापार, बाल मजुरी, एड्स जागृती, स्वच्छता अभियान, पाॅक्सो कायदा, एल् पी जी सिलिंडरची सुरक्षा, डेंगी, लेप्टोस्पायरोसिस अशा अनेक सामाजिक समस्यांवर विविध बाहुल्यांच्या सहाय्याने जनमानसात जागृती निर्माण केली आहे.
नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. आंध्रप्रदेशने समग्र शिक्षा अभियानांतर्गत सर्व शाळांमध्ये यांचे वाटप केले आहे. प्रथम हे पुस्तक मराठीत १९९९ साली मीना नाईक क्रिएटीव वर्कशाॅपने प्रकाशित केले. त्या वेळचे शिक्षणमंत्री रामकृष्ण मोरे यांच्या हस्ते कळसूत्री बाहुल्या मार्गदर्शिका या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यानंतर गिरीश कर्नाड यांनी या पुस्तकाची शिफारस नॅशनल बुक ट्रस्टकडे केली. २००४ मध्ये याचा हिंदी आणि इंग्रजी अऩुवाद प्रसिध्द झाला.
****
Related
Please login to join discussion