No products in the cart.
जेजेत डीन ऐवजी साऱ्यांचीच हजेरी !
चिन्ह आर्ट न्यूज हे आमचं पोर्टल सुरू झालं आणि दिलेल्या पहिल्याच बातमीनं जे जे स्कूल ऑफ आर्टचा परिसर अक्षरश: हडबडून गेला आहे. १६५ वर्ष वयाच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट सारख्या शिक्षणसंस्थेचा अधिष्ठाताच मस्टरवर सही करत नाही, चार्ज न देताच रजेवर जातो , या बातमीनं शिक्षणखात्यात देखील धमाल उडाली . पण अजगरासारखा सुस्त पडलेलं हे कार्यालय आता चक्क काम करू लागलं आहे . बातमी आली आणि अवघ्या आठवड्याभरातच जेजेमध्ये बायोमेट्रिक मशीन बसवली गेली . इतकंच नाही तर अत्यंत अद्ययावतअसे कॅमेरे देखील लावले गेले . एका विद्यार्थ्याला सांगितलं की अरे बाबा जरा त्या कॅमेऱ्यांचा फोटो काढून पाठव . तर तो म्हणाला , सर तेव्हडं सोडून बोला , तिकडे जायला देखील भीती वाटते ! लय भारी कॅमेरे बसवलेत
तो विद्यार्थी सांगत होता , या मशीन्स इतक्या पावरफुल आहे की रेटिना देखील स्कँन होतो , यावरून ‘चिन्ह ‘ च्या बातमीमुळे परिसराला किती मोठा हादरा बसला आहे याची कल्पना यावी. हे फक्त जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये झालं आहे असं नाही तर तिच्या परिसरातील सर्वच महाविद्यालयांवर म्हणजे अप्लाइड आर्टला देखील बायोमेट्रिक मशीन बसवलं आहे. इतकंच नाही तर प्रत्यक्ष कला संचालकांच्या कार्यालयात देखील बायोमेट्रिक मशीन बसवलं आहे .दीडशे वर्षाचं स्वातंत्र्य गेल्यामुळे फाईन आर्टच्या अधिष्ठातांच्या नावे आता कॅम्पसमधले सारेजण कडाकडा बोटं मोडतायत .
परिसरातले सारेच हल्ली वेळेवर येतात आणि वेळेवर जातात. मध्यंतरी काही शिक्षक सह्या करून लगेचच बाहेर निघून जात त्यावर देखील आता बंदी आली आहे. काही शिक्षक तर आपापल्या गाड्या जेजेत पार्क करायचे आणि भाड्याची गाडी करुन खाजगी कामं मिळवायला बाहेर पडायचे ,तेही आता बंद झालं आहे . एक कंत्राटी शिक्षक तर मास्टरवर सही करायचा आणि मंत्रालयात जायला बाहेर पडायचा तेही आता थांबलं आहे . ‘ चिन्ह’च्या एका बातमीची ही छोटीशी झलक होती. ‘ चिन्ह ‘जेव्हा एक एक मोठ्या मोठ्या भानगडी बाहेर काढील तेव्हा काय काय होऊ शकेल ते आता लवकरच दिसेल .
Related
Please login to join discussion