No products in the cart.
तब्बल चाळीस बेचाळीस वर्षानंतर…
सहसा मी प्रदर्शनांच्या उदघाटन समारंभांना किंवा त्या निमित्तानं होणाऱ्या पार्ट्याना जात नाही. याचं कारण हल्ली प्रवास नको वाटतो, गर्दी देखील नकोशी वाटते हे नाही तर चारचौघात मिसळणं काहीसं तापदायक वाटतं आणि मुख्य म्हणजे मिसळण्याचा प्रयत्न केला तरी आपण सतत एकटेच असतो असंच वाटत राहतं. हे मला खूप आधी जाणवलं हेच असावं. थिएटर सोडण्यामागे हेच मुख्य कारण होतं.
चित्रकला क्षेत्रात प्रवेश केल्या नंतर मात्र प्रदर्शनाच्या उदघाटनाच्या पार्ट्या हा या क्षेत्राचा अविभाज्य घटक आहे हे देखील माझ्या तेव्हाच लक्षात आलं. त्यामुळे अशा पार्ट्यांपासून मी पहिल्यापासूनच दूर राहिलो. याला अपवाद ठरली ती मात्र अगदी जवळच्या मित्रांची प्रदर्शनं.
कालचं प्रदर्शन देखील असंच होतं. शकू कुलकर्णी ही काही माझी जवळची मैत्रीण नव्हे. पण तिचं काम किंवा तिची प्रचंड धडपड मात्र मी प्रारंभापासून पहात आलो आहे. तिच्या स्वभावातला एक प्रकारचा छानसा ‘इंनोसन्स’ मला नेहमीच भावत आला आहे. जेजेमधले माझे परममित्र विनोद आणि प्रमोद गुरुजी यांची ती वर्ग मैत्रीण. विनोद आणि प्रमोद जे काही करायचे त्याला माझा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे त्यांच्यात माझी उठबस असायची. साहजिकच त्यामुळे शकुशी देखील चांगलाच परिचय झाला. त्या परिचयाला मी प्रायोगिक रंगभूमी चळवळीशी संबंधित होतो हे देखील एक कारण असावं.
कॉलेजच्या काळातच मी प्रायोगिक रंगभूमीकडे वळलो. उन्मेषच्या आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेमुळं अल्पावधीतच मी उन्मेषमध्ये शिरलो. तेव्हा उन्मेषचं अच्युत वझे लिखित ‘षड्ज’ आणि नंतर वृंदावन दंडवते लिखित ‘बूटपॉलिश’ ही नाटकं गाजली होती. उन्मेषची नंतरची निर्मिती होती ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’. अमोलनं ते बसवलं होतं. त्या नाटकानं मराठी रंगभूमीवर एक धमालच उडवून दिली होती. त्यात शकू आणि चित्राची धाकटी बहीण अरुंधती ही नायिकेचं काम करायची. शकू, अरुंधती आणि चित्रा या तिघीही मुर्डेश्वर भगिनी त्या काळात भलत्याच फॉर्मात होत्या.
‘चल रे भोपळ्या’ला मी बॅकस्टेज करायचो. साहजिकच या तिघींशी छान जानपेहेचान झाली होती. हार्निमन सर्कल जवळच्या कॉफी हाऊसमध्ये आम्हा प्रायोगिक नाटक वाल्यांचा अड्डा असायचा. बहुसंख्य नाटकवाले बँकेत नोकऱ्या करत होते. ते ऑफिसमध्ये सह्या करायचे आणि नंतर कॉफी हाऊसमध्ये यायचे आणि मग दिवसभर प्रचंड गप्पाच गप्पा. चित्रा आणि अनेक वेळा अरुंधती देखील तिथे यायची. त्यामुळे भरपूर गप्पा व्हायच्या. शकू मात्र तिथं कमीच यायची पण तिचा नवरा रवी कुलकर्णी मात्र तिथं दररोजच भेटायचा. शकू जेजेची आणि मी देखील जेजेचा हा धागा देखील त्यात होताच.
पुढं मी थिएटर सोडलं. एकदा पाठ वळवली की मागे वळून बघायचंच नाही खाक्या असल्यामुळं नंतर या तिघींशी एकत्रित गाठभेट अशी झालीच नाही. शकू मात्र जहांगीर किंवा प्रदर्शनाच्या वेळी किंवा अनेक वेळा बरवे, इमारते, रानडे यांच्या समवेत भेटत राहिली. ती अतिशय गंभीरपणे चित्र काढत होती. त्यामुळे साहजिकच तिच्या कामा विषयी अतिशय कुतूहल कामात असायचं. वेताचा वापर करुन तिनं जे काम केलं होतं ते खरोखरच अद्भुत होतं. त्यामुळे तिचा एक स्लाईड शो देखील मी ठाण्यात आयोजित केला होता. तिनं गच्चीवरील गप्पांमध्ये यावं असा माझा आग्रह होता पण कशातनं कशात ती सतत व्यग्र असल्यामुळं ते काही जमून आलं नाही. पण आता मात्र लवकरच कदाचित या प्रदर्शनाच्या काळात तिच्या सोबत लाईव्ह गप्पा मारिन म्हणतोय.
या सगळ्या गोष्टींमुळेच तिनं मला तिच्या प्रदर्शनाचं आग्रहानं निमंत्रण पाठवलं होतं. पाठोपाठ तिचा माझा कॉमन मित्र माधव इमारते याचंही आग्रहाचं निमंत्रण. साहजिकच नेहमीचा खाक्या सोडून उदघाटनाच्या कार्यक्रमाला जाणं भागच पडलं. जवळजवळ चाळीस बेचाळीस वर्षानंतर चित्रा, शकू आणि अरुंधती यांना एकत्रित भेटत होतो. तो प्रसंगच वेगळा होता. खूप जुन्या आठवणी आठवून देणारा. म्हणूनच मी खास त्या प्रसंगाचे फोटो देखील काढले. जेजेतली खूप जुनी मित्र मंडळ भेटली. उदाहरणार्थ; विनोद गुरुजी वगैरे. प्रमोदची अनुपस्थिती प्रचंड जाणवली. माधव इमारते, दिलीप रानडे, संदीप वैद्य, सुहास बहुळकर, श्रीकांत जाधव, उषा आणि सुनील गावडे, विशाखा आपटे, प्रकाश वाघमारे, नियती आणि दीपक शिंदे, प्राजक्ता पालव, सतीश वावरे, स्विटी आणि संजय सावंत, नितीन कुलकर्णी ( आणि त्याची लेक ), सुधीर पटवर्धन अशी भरपूर जुनी मित्र मंडळी भेटली. एक संध्याकाळ प्रसन्न करून गेली.
( शकूचं हे प्रदर्शन फोर्टमधल्या तळवळकर मार्गावरच्या क्वीन्स मॅन्शनमधल्या तिसऱ्या मजल्यावरच्या केमोल्ड प्रिस्कॉ ट रोड गॅलरीत ३० एप्रिल पर्यंत चालणार आहे. अवश्य पहावं असं हे प्रदर्शन आहे.) *****
Related
Please login to join discussion