No products in the cart.
आर्ट कलेक्टर्सना संधी देणारं प्रदर्शन !
जगभरात अनेक चित्रं प्रदर्शनं आयोजित केली जातात. अनेक नवोदित कलाकारांना त्यामधून संधीही मिळते. पण निपोन आर्ट गॅलरीमध्ये सध्या सुरु असणारे ‘थूक लगाना मना है’ हे चित्र प्रदर्शन जे कला संग्रह करू पाहात आहेत अशांना संधी देणारे ठरू शकतं. या प्रदर्शनात जोगेन चौधरी, दिलीप रानडे, वृन्दावन सोळंकी यांच्यासारख्या मोठ्या चित्रकारांची चित्रे प्रदर्शित झाली आहेतच त्याचबरोबर सीबी सॅम्युएल, सागर कांबळे यांच्यासारख्या नवोदित चित्रकारांची चित्रेही समाविष्ट आहेत. चित्रांचा आकार हा मुघल मिनिएचर शैलीप्रमाणे लहान आहे ( 2.5 X 3 इंच ) त्यामुळे ही चित्रे नक्कीच ज्यांना कला संग्रह करायचा आहे ते घेऊ शकतील. त्यामुळेच हे प्रदर्शन ज्यांना नव्यानेच कला संग्रह करायचा आहे त्यांना संधी देणारं ठरेल.
हिंदीमध्ये ‘थूक लगाना’ हा वाक्प्रचार सर्रास वापरला जातो. याचा मराठीतला अर्थ म्हणजे पाट्या टाकणे. जगण्याचा काहींच्या काही वाढलेला वेग आणि स्पर्धा माणसाला या पाट्या टाकण्यास मजबूर करते आहे. त्यामुळे समाजातील सर्वच अंगांचा जसं की राजकारण, शिक्षण, कला, वागणूक दर्जा खालावला आहे. ‘थूक लगाना मना है’ हे प्रदर्शन या पाट्या टाकण्याच्या प्रवृत्तीला दिलेलं एक उत्तर आहे असं म्हणता येईल. प्रदर्शनाचे संयोजक नीलेश किंकळे यांनी जगभरातील चित्रकारांना प्रस्तुत संकल्पना दिली आणि ही छोट्या आकारातील ही चित्रं या प्रवृत्तीला उत्तर म्हणून प्रदर्शित झाली आहेत असं म्हणता येईल. प्रदर्शनातील बहुसंख्य चित्रकारांनी अनेक वर्षाच्या तपश्चर्येनंतर तयार झालेली त्यांची कला शैली या छोट्या अवकाशावर उतरवली आहे. तपशिलांमधील बारीक काम हे इतक्या छोट्या आकाराच्या कॅनव्हासवर साकार करणं तुलनेनं अवघड आहे. पण हे चित्रकार त्यात यशस्वी होतात असं दिसतं.
सध्या महाराष्ट्रात खोके हा शब्द खूप गाजतोय. या ‘खोके आणि ओके’ या संकल्पनेवर आधारित एक आकारानं अत्यंत लहान इन्स्टॉलेशनही रसिकांना प्रदर्शनात पाहायला मिळेल. या इन्स्टॉलेशवर आधारित एक कविताही चक्क मराठीत वाचायला मिळते. प्रदर्शनाच्या तुलनेनं इंग्रजाळलेल्या वातावरणात ही मराठी कविता रसिकांना सुखद धक्का देते. त्यामुळे मराठी रसिकांनी तर हे प्रदर्शन अवर्जून पाहावं असं आहे.
हे प्रदर्शन दि 20 मे 2023 पर्यंत निपोन आर्ट गॅलरीमध्ये रसिकांना पाहता येईल. प्रदर्शनाची वेळ दुपारी 03 ते संध्याकाळी 07 वाजेपर्यंत आहे याची नोंद कला रसिकांनी घ्यावी.
******
– कनक वाईकर,
चिन्ह आर्ट न्यूज
Related
Please login to join discussion