News

चित्रकला मुख्य प्रवाहाच्या शिक्षणात

आजपर्यंत कला शिक्षणाकडे शासन, समाज यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. महाराष्ट्रच काय भारतभरातील सर्वच शाळांमध्ये थोड्या फार फरकाने चित्रकला शिक्षणाला दुर्लक्षितच केले जाते. पण जर चित्रकलेला विचारपूर्वक अभ्यासक्रमात आणले तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा मोठा फायदा होऊ शकतो, असे अभ्यासक सांगतात. एक काळ होता जेव्हा परीक्षेत मिळणारे मार्क्स विद्यार्थ्यांचं भवितव्य ठरवायचे पण आज जेव्हा तंत्रज्ञान प्रचंड पुढे गेले आहे तेव्हा विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी सॉफ्ट स्किल्स खूप महत्वाचे ठरत आहेत. कला माणसाला संवेदनशील बनवते आणि सॉफ्ट स्किल्स अंगी मुरवण्याचा हा एक राजमार्ग आहे.

हिंदुस्थान टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार शासन आता उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये कलागुरूंची नेमणूक करण्याच्या विचारात आहे. युजीसीने या प्रकल्पाची मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. सध्याची शैक्षणिक प्रणाली ही तांत्रिक पद्धतीने काम करते त्यामुळे भाव आणि भावनांना (ज्यांना आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो ) केवळ अभ्यासेतर उपक्रमात जागा मिळते. अगदी कलेचे विद्यार्थी (दृश्यकला आणि नृत्य, नाट्य, संगीत ई कला) यांनाही खऱ्या स्वरूपाचे प्रत्यक्ष शिक्षण न मिळता पुस्तकी अभ्यासक्रमात विद्यार्थी अडकून राहतात.

त्यामुळेच कला क्षेत्रात काम करणारे तज्ञ जे प्रचलित शिक्षण व्यवस्थेत पूर्णवेळ शिक्षक म्हणून काम करू शकत नाहीत, पण ज्यांचा अनुभव आणि अभ्यास विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक ठरू शकेल अशा कलागुरूंची नेमणूक युजीसी करणार आहे. या योजनेचा विद्यार्थ्यांना तर लाभ मिळेलच सोबत कलेला एका नव्या दृष्टीकोनातून बघण्याचा विचार समाजात रुजेल हे महत्वाचे आहे.

या नवीन धोरणानुसार विद्यापीठाचे वेगवेगळे विभाग अर्ज मागवून कमिटीच्या माध्यमातून ‘कलागुरूं’ची निवड करेल. कलेवर आधारित कार्यशाळा घेणे, विषयावर आधारित व्याख्यान देणे, प्रात्यक्षिकांचे आयोजन अशा स्वरुपाचे काम कलागुरु करतील. परमेष्टी गुरु. परम गुरु आणि गुरु अशा तीन पदांवर गुरुंची नेमणूक करण्यात येईल. निवडीचे निकष हे या तीन पदांवर आधारित असतील. परमेष्ठी गुरु हा पद्मभूषण पुरस्कार प्राप्त केलेला कलाकार असेल. त्यांना कमीतकमी २० वर्ष कला क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असेल. परम गुरु हा १० वर्ष कला क्षेत्रात काम करणारा कलाकार असेल राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले असतील. कलागुरु पातळीवरचा गुरु हा कमीत कमी पाच वर्ष अनुभव असलेला असेल.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी युजीसी आणि शासन यांचे हे महत्वाचं पाऊल आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे केवळ पुस्तकी रोबोट तयार न होता मानवी मूल्यांचा विकास विद्यार्थ्यांमध्ये होईल. सोबतच कलेला मोठ्या प्रमाणात समाजात प्रतिष्ठा मिळेल हे निश्चित. आजपर्यंत पद्मविभूषण, पद्म यासारखे पुरस्कार मिळवणारे आणि आयुष्यभर कलेला वाहून घेणारे कलाकार काहीसे विस्मृतीच्या गर्तेतच राहिले. यात कितीतरी चित्रकार, शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत यासारख्या क्षेत्रात काम करणारे कलाकार आहेत. एका विशिष्ट परिघातच त्यांचा परिचय राहिला. सर्वसामान्य समाज विशेषतः तरुणाई मात्र केवळ बॉलिवूडमध्ये अडकून राहिली. या नव्या धोरणामुळे मात्र पारंपरिक भारतीय कला यांना मोठ्या प्रमाणात समाजाशी जोडण्याचे काम होईल हे निश्चित.

****

– कनक वाईकर

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.