No products in the cart.
वेरूळ इथे चित्रकारांना बंदी?
वेरूळ कलेचं आद्य केंद्र. तर छत्रपती संभाजीनगर ही महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. अजिंठा वेरूळच्या या परिसरात शासकीय कला महाविद्यालयाने कलेचं शिक्षण देण्याचं काम इमानेइतबारे (?) केलं. इथले अनेक विद्यार्थी वेरूळ, अजिंठा इथे निसर्गचित्रण आणि स्केचिंगसाठी जातात. अनेक कलाप्रेमी देखील तिथे अभ्यासासाठी जातात. अजिंठा, वेरूळ येथील कला मंदिरं ही कला विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोठा ठेवाच आहेत. इथे अभ्यास करून कितीतरी विद्यार्थी घडले पण हल्ली तिथे चित्रकारांना रेखाटने किंवा निसर्गचित्रण करण्यापासून रोखण्याचे प्रकार वारंवार घडू लागले आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेनुसार दि 09 एप्रिल 2023 रोजी शासकीय कला महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगरचे माजी विद्यार्थी जयकुमार कुरकुटे आपल्या तीन कलाध्यायी मित्रांसोबत वेरूळ इथे निसर्गचित्रणासाठी गेले असता तिथल्या शिपायाने त्यांना तिथे निसर्गचित्रण करण्यापासून रोखले. एवढेच नाही तर असे चित्रण करण्याची तुम्हाला परवानगी आहे का असा प्रश्नही विचारला. आणि अर्ध्यातून काम थांबवून कुरकुटे यांना चित्र पूर्ण न करताच परत पाठवलं.
कुरकुटे यांच्या इथे एक बाब निर्दर्शनास आली ती म्हणजे लेणी क्र. २७ च्या बाहेर फरशी बसवण्याचे काम सुरु आहे. अनेक कामगार तिथेच फरशीसाठी दगड फोडण्याचे काम करत आहेत. या दगड फोडण्यामुळे प्रचंड धूळ तयार होऊन ती थेट लेणीमध्ये वाऱ्याने जात आहे. या अशा प्रकारांना शासन किंवा पुरातत्व खाते रोखत नाही मात्र चित्रकारांना त्यांचे काम करण्यापासून रोखले जाते. खरं तर चित्रकारांनी अभ्यासासाठी लेणी परिसरात रेखाटने करू नये असा कुठलाही कायदा नाहीये. याच परिसरात अनेक हौशी पर्यटक वाटेल त्या पोझमध्ये अगदी शिल्पांवर चढून फोटोग्राफी करतात. सेल्फी घेतात. त्यांना शासन कुठल्याही प्रकारे रोखत नाही. मात्र चित्रकार जे अशा वारसा स्थळांना आपले दैवत मानतात आणि त्यांच्या जतनाबाबत जागरूक असतात त्यांना मात्र काम करण्यापासून रोखले जाते ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे.
खालील व्हिडिओमध्ये आपण लेणी परिसरात सुरु असलेले फरशी बसविण्याचे काम बघू शकता.
Related
Please login to join discussion