No products in the cart.
नाशकात जागतिक संग्रहालय दिवस सप्ताह !
अभिरक्षक, प्रादेशिक वस्तू संग्रहालय महाराष्ट्र शासन, नाशिक आणि नाशिक सराफ असोसिएशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘जागतिक संग्रहालय दिवस सप्ताह’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचं उदघाटन १८ मे रोजी सकाळी ११ वाजता पार पडलं. नाशिकचे जिल्हाधिकारी नितीनकुमार मुंडावरे आणि सेवानिवृत्त अभिरक्षक श्रीकांत घारपुरे यांची या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. हा उपक्रम बुधवार दि. १८ मे ते मंगळवार दि. २४ मे २०२२ पर्यंत सुरु राहणार आहे. गुरुवार दि. १९ मे रोजी नाशिकचे चित्रकार राजेश सावंत यांचं जलरंग चित्रकला प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं होतं. ऐतिहासिक महत्व असलेल्या नाशिकच्या पेशवेकालीन सरकारवाड्याचं प्रात्यक्षिक चित्रण त्यांनी कॅनव्हासवर केलं. सध्या त्या वाड्यातील छोटा दगडी तलाव पाण्याने भरला नसूनही पूर्वीच्या काळात तो वाडा जसा होता तसं त्याचं हुबेहूब चित्रण कॅनव्हासवर त्यांनी प्रेक्षकांना करून दाखवलं. त्यांच्या या चित्रकला प्रात्यक्षिकाला नाशिककरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
२० तारखेला पूजा गायधनी यांचं हस्ताक्षरकला प्रात्यक्षिक झालं. २१ मे रोजी आनंद ठाकूर यांचं पेशवेकालीन शस्त्रास्त्र प्रात्यक्षिक, २३ मे रोजी सोज्वळ साळी यांचं प्राचीन पटखेळ व्याख्यान आणि प्रात्यक्षिक तसंच २३ मे आणि २४ मे रोजी रोहित सरोदे यांचं प्राचीन लिपी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. २४ मे रोजी या उपक्रमाचा समारोप आयोजित करण्यात आला आहे. या सर्व उपक्रमांची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या निमंत्रण पत्रिकेत पाहता येईल.
Related
Please login to join discussion