No products in the cart.
जेजेतली बक्षिसं आणि विद्यार्थ्यांचा राडा!
‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चं वार्षिक प्रदर्शन उद्यापासून म्हणजे १४ मार्च पासून सुरु होत आहे. विद्यार्थी ज्याची वर्षभर वाट पाहत असतात तेच हे प्रदर्शन. या प्रदर्शनाच्या निमित्तानं आपण वर्षभर केलेलं काम वर्गमित्र, कॉलेजमधले मित्र, पालक आणि कलाक्षेत्रातील निवडक लोकांसमोर दाखवता येतं. त्यावर त्यांची मतं जाणून घेता येतात. आपण नेमके कुठे आहोत हे देखील समजून घेता येतं. म्हणूनच विद्यार्थी या प्रदर्शनाची चातकासारखी वाट पाहत असतात.
या प्रदर्शनाचं आणखीन एक खास आकर्षण असतं ते म्हणजे विद्यार्थ्यांना दिले जाणारे पुरस्कार. या पुरस्कारामुळं कलाक्षेत्रामध्ये थेट प्रवेश मिळू शकतो. म्हणूनच महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांमध्ये या पुरस्काराविषयी चढाओढ लागलेली असते. असं जरी असलं तरी जेजेच्या व्यवस्थापनाला मात्र या पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेत फारसा रस नसावा की काय अशी परिस्थिती सध्या बघायला मिळते आहे.
या प्रदर्शनाचं आणखीन एक खास आकर्षण असतं ते म्हणजे विद्यार्थ्यांना दिले जाणारे पुरस्कार. या पुरस्कारामुळं कलाक्षेत्रामध्ये थेट प्रवेश मिळू शकतो. म्हणूनच महत्वाकांक्षी विद्यार्थ्यांमध्ये या पुरस्काराविषयी चढाओढ लागलेली असते. असं जरी असलं तरी जेजेच्या व्यवस्थापनाला मात्र या पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेत फारसा रस नसावा की काय अशी परिस्थिती सध्या बघायला मिळते आहे.
अगदी गेल्या वर्षीचंच उदाहरण पहा , गेल्या वर्षी म्हणजे २१ – २२ साली जे पुरस्कार जाहीर केले गेले त्यातले असंख्य पुरस्कार उद्या २२ – २३ चे प्रदर्शन सुरु होणार असले तरी अद्यापही दिले गेलेलेच नाहीत. ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ सारख्या १६६ वर्षाची परंपरा असलेल्या कला महाविद्यालयात असे घडू तरी कसे शकते ? असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल पण ही वस्तुस्थिती आहे. एका विद्यार्थिनीला तर गेल्यावर्षी जाहीर झालेले बक्षीस गेल्या आठवड्यात दिले गेले. अन्य बक्षीसं तर अद्यापही दिली गेलेली नाहीत. आता दोन्ही वर्षाची मिळून एकदम दिली जाणार की काय हे कळायला मार्ग नाही.
मुलं बिचारी मुकाटपणे हे सारं सोसत राहतात. विचारणा केली तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत काय होईल याची भीती त्यांच्या मनात असतेच. चार पाच वर्षापूवी एका विद्यार्थिनीने या संदर्भात एका वरिष्ठ शिक्षकांकडे तक्रार केली होती. पण तिला ‘पास व्हायचंय ना ?’ असा प्रश्न ज्येष्ठ शिक्षकांकडून विचारला गेला. ते पारितोषिक रोख रकमेचं होतं आणि ते त्या विद्यार्थिनीला अद्यापही मिळालेलं नाही असंही सांगितलं जातं. खरं खोटं कुणास ठाऊक ?
या संदर्भात अधिक चौकशी केली असता असं कळलं की जी पारितोषिकं देण्यासाठी समाजातल्या ज्या मान्यवर व्यक्ती किंवा संस्था पुढं येतात त्यांना ही पारितोषिकं देण्यासंदर्भात वेळोवेळी प्रदर्शनाआधी जी पत्रं पाठवायला हवी असतात तीच पत्रं वेळच्यावेळी त्यांना पाठवली जात नाहीत, हे या साऱ्या गोंधळामागचं एक प्रमुख कारण आहे.
मग प्रदर्शन जवळ आलं का कुणातरी नव्यानं नोकरीत आलेल्या शिक्षकांच्या हाती हे काम घाईघाईनं सोपवलं जातं आणि मग नव्या शिक्षकांचे फोन संबंधितांना गेले की कळत नकळत देणगीदार किंवा त्या पारितोषिकाची रक्कम देणारे संबंधित हटकून दुखावले जातात. कारण या नव्या शिक्षक मंडळींना अशा दिग्गज मंडळीं, ज्येष्ठ कलावंत यांच्याशी संभाषण करण्याचा कुठलाही पूर्वानुभव नसतो. अशा मंडळींशी आपण सौजन्यपूर्वक बोलायचं असतं, ऋजुतेनं विचारायचं असतं हा पाचपोच त्यांच्यापाशी नसल्यानं संबंधितांशी पुरेसा संवादच होऊ शकत नाही. अगदी उदाहरणच सांगायचं झालं तर भारतीय कलाक्षेत्रात ज्यांना मोठं नाव आहे अशा कुटुंबीयांकडे पूर्व सूचना देखील न देता फोन करून ‘तुम्ही जे जेजेमध्ये बक्षीस देता ते बक्षीस यंदा देणार आहात काय ?’ असा प्रश्न काहीशा उर्मटपणे विचारल्या सारखा वाटावा अशा पद्धतीनं विचारला गेला तर कुठले प्रायोजक बक्षीस देण्याच्या फंदात पडतील ?
एका माजी माहितगार शिक्षकानं असं सांगितलं की, गेले अनेक वर्ष विशेषतः साबळे आल्यापासून प्रायोजकांना वेळच्यावेळी पत्रच जात नाहीत. गेली तरी त्यातला भाषेचा दर्जा अतिशय खालावलेला असतो. इतकंच नाही तर अशा प्रकारच्या प्रायोजकांशी संवाद साधतांना संबंधित शिक्षकांच्या अंगी जी विनयशील वृत्ती असावी लागते, किमानपक्षी अशा व्यक्तींशी संवाद साधतांना जी किमान नम्रता दाखवायला हवी ती देखील जात नसल्याने त्यातले बरेचसे पुरस्कार आता बंद पडण्याच्या अवस्थेला आलेले आहेत. पुरस्कार देण्याच्या या अनियमिततेवर विद्यार्थी देखील आवाज उठवू शकत नाही कारण त्यांना परीक्षेला बसायचं असतं. कुणी विचारलंच तर संबंधित शिक्षकांकडून परीक्षेची आठवण करून देण्याची उदाहरणं पण काही कमी नाहीत.
कोणे एके काळी वार्षिक प्रदर्शनाच्या वेळी दिल्या जाणाऱ्या बक्षिसांची यादी वाचता वाचता निवेदक थकून जातं असत, पण गेल्या आठ दहा वर्षात ती परिस्थिती झपाट्यानं बदलली आहे.
ऑनलाईन ‘चिन्ह’ सुरू झाल्यापासून जेजे संदर्भात आम्ही सातत्यानं बातम्या देत आहोत. अनेक चुकीच्या गोष्टींवर आम्ही कडाडून टीका करत आहोत पण त्यामुळे सुधारणा होण्या ऐवजी परिस्थिती अधिकाधिकच बिघडत जाताना दिसते आहे. यामधून विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यामुळं आम्ही विद्यार्थ्यांची नावं घेणं देखील टाळतो आहोत. पण आता मात्र परिस्थिती अधिकाधिक हाताबाहेर जात असताना दिसते आहे. पण असं असून देखील साबळे आणि त्यांचे गुणी सहकारी त्यावर कुठलीही कारवाई करताना दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अगदी परवाचंच म्हणजे शनिवाराचंच उदाहरण घ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात रात्री दीड वाजता चक्क मारामारी झाली. इतकी की त्यातल्या मार पडलेल्या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये हलवावं लागलं. हा प्रसंग घडला तेव्हा ‘सर्व काही मॅनेज करण्यात पटाईत’ असलेले एक शिक्षक देखील तेथे उपस्थित होते, पण त्या दोन्ही गटाच्या विद्यार्थ्यांना मात्र ते काही मॅनेज करू शकले नाहीत.
जेजेच्या आजवरच्या इतिहासात घडला नसेल असा हा प्रसंग आहे. पण याची खंत जेजेचं व्यवस्थापन सांभाळणाऱ्याना असेल असं मुळीच वाटत नाही. जेजेचा कारभार कुठे चालला आहे हे जाणून घेण्यासाठी एवढी घटना पुरेशी आहे. जो प्रकार घडला आहे तो अतिशय गंभीर आहे. त्याचा सर्व तपशील ‘चिन्ह’पाशी आलेला आहे. विद्यार्थ्यांचे दोन्ही गट आता इरेला पडलेले आहेत या प्रकरणात राजकारण्यांनी जर प्रवेश केला तर हे प्रकरण लगेचच थंडावणार नाही हे निश्चित. मंत्रालयापासून सगळ्यांना मॅनेज करण्यात पटाईत असलेले जेजेतले शिक्षक आता. काय करतात ते पाहायचंय ?
‘चिन्ह’मधून जेजेची जीजी प्रकरणं चव्हाट्यावर आली त्या प्रकरणी मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांना जुजबी कारवाई करायलाच लागली. ( कला संचालनालयाची अवस्था आता फक्त नावापुरतीच राहिली आहे ) जी गंभीर प्रकरणं आम्ही मांडली त्या साऱ्यांवरच मात्र कारवाई झाली नाही कारण मंत्रालयातली काही मंडळी देखील त्याच्याशी संबंधित होती. आता मात्र या प्रकरणाची दखल त्यांना घ्यावीच लागेल कारण जर यात राजकारणी मंडळींनी हस्तक्षेप केला, (आणि तो ते करतीलच असे रंग आहेत ) तर साबळे, काकडे आदी मंडळींची पळता भुई थोडी होणार हे निश्चित.
*******
– सतीश नाईक,
संपादक, चिन्ह
Related
Please login to join discussion