No products in the cart.
बी एन गोस्वामी: एका कला-महर्षीचे स्मरण
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या कुमारस्वामी हॉलमध्ये बसायला जागा शिल्लक नव्हती, गर्दी असूनही कमालीची शांतता पसरली होती. वक्त्यांची औपचारिक ओळख करून संचालक त्यांच्या जागी जाऊन बसले. सहा फुटी, सुटाबुटातील राजबिंडे व्यक्तिमत्व पोडियमजवळ उभे राहिले. धीरगंभीर आवाजात एक सुरेख उर्दू शेर हॉलमध्ये शांततेचा भंग करत अलवार पसरला…. गुल्हेर चित्रशैलीवरील व्याख्यानाला सुरुवात झाली! हातात वाचण्यासाठी पेपर नाही आणि बोलताना शब्द जुळवायचा ताण नाही, व्याख्यानाचा एक अखंड झरा वाहू लागला!
प्रोफेसर गोस्वामी, भारतीय कलेच्या इतिहासातील एक आश्वासक, वादातीत अभ्यासपर्व समोर उभे राहून बोलत होतं. त्यांचं व्यक्तिमत्व, अभ्यास, बोलण्याची शैली आणि चित्र वर्णन करायची लकब, बारीकसारीक तपशिलांचा योग्य वेळी उल्लेख, समोरच्याला गुंग करणारा खर्जातील आवाज हे सारंच उपस्थित अभ्यासकांना कमालीचं गुंगवून टाकणार होतं.
१५ ऑगस्ट १९३३ ला ब्रिजिंदर नाथ गोस्वामी म्हणजेच B. N. Goswamy यांचा जन्म झाला. त्यांचे वडील न्यायाधीश होते. १९५६ मध्ये शिक्षण पूर्ण करून B. N. यांनी IAS होऊन भारत सरकारची नोकरी केली. मात्र अभ्यास आणि संशोधनाच्या ओढीनं त्यांनी ही मोठी नोकरी १९५८ मध्येच सोडून दिली. त्यांनी हिमालयातील कांग्रा लघु शैलीचा अभ्यास सुरू केला. A. L. Basham, हरी राम गुप्ता, आर्चर अशा दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा अभ्यास सुरू होता. डॉक्टरेट केल्यानंतर त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटीत कलेचा इतिहास शिकवायला सुरुवात केली आणि तेच त्यांचं कायमचं स्थान होऊन बसलं. या दरम्यान त्यांना परदेशातील अनेक विद्यापीठामधून आमंत्रण येऊ लागली. जगभरात त्यांनी भारतीय चित्रकलेचा अभ्यासपूर्वक प्रसार केला. कलेचा इतिहास किती महत्वाचा आहे आणि त्याला सौंदर्यशास्त्र (Aesthetics) याचीदेखील जोड असणे कसं आवश्यक आहे हे त्यांच्या व्याख्यानातून वारंवार दिसून येत असे. भरपूर अभ्यास, उत्कृष्ट वाणी आणि भारदस्त आवाज यामुळे त्यांची व्याख्याने समोरच्याला खिळवून ठेवत. अनेक म्युझियम्स आणि कॉलेजेस यांच्याशी ते कायमच जोडले गेले. त्यांनी जवळजवळ २६-२७ पुस्तकं लिहिली. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना सन्मानित करायला एक एक गौरव ग्रंथ प्रकाशित केला. भारत सरकारनं त्यांना आधी पद्मश्री आणि नंतर पद्मभूषण पुरस्काराने गौरवलं.
हिमालयातील गुल्हेरच्या नयनसुख या चित्रकारावरील त्यांचं पुस्तक Nainsukh of Guler: A Great Indian Painter From a Small Hill-State अतिशय वाचनीय आहे. भारतातील लघुचित्रकला राजेरजवाडे तसेच संस्थानिक यांच्या आश्रयात होत्या. एकप्रकारे documentation करण्यासाठी नयनसुख यांनी केलेली चित्रे आणि त्यावरील गोस्वामी यांची अभ्यासपूर्ण टिप्पणी कलेच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. अगदी ठराविक विषय निवडून त्यावर सखोल अभ्यास आणि काव्यात्मक भाषेत रसास्वाद केलेलं अजून एक पुस्तक म्हणजे Pahari Masters: Court Painters of Northern India.
त्याचप्रमाणे विशिष्ट कालखंड अभ्यासून त्यातील विविध चित्रशैली आणि त्याची समीक्षा आपल्याला पहायला मिळते. Masters of Indian Painting Vol-1 (1100-1650) & Vol-2 (1650-1900) या भल्या थोरल्या पुस्तकांमधून. Ranga Roopa: Gods. Words. Images हे त्यांचे पुस्तक तर बारकाईने केलेल्या टिपणीचं शिखर आहे. याशिवाय A Sacred Journey: The Kedara Kalpa Series of Pahari Paintings and the Painter Purkhu of Kangra आणि भारतीय शृंगाराच्या कथांचे वर्णन असलेले Nala and Damayanti: A Great Series of Paintings of an Old Indian Romance ही पुस्तके भारतीय साहित्य आणि कलेचा इतिहास यांच्या विश्लेषणाची गोस्वामी यांनी लिहिलेली अप्रतिम प्रकाशनं आहेत.
मुंबईत एशियाटिक सोसायटी आणि छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे त्यांची व्याख्याने आयोजित केली जात असत आणि मी क्वचितच ती चुकवली असतील……. त्यांचा आवाज आणि अभ्यास याचं एक भलं मोठं पर्व आता संपलं !!!! कलेच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचं योगदान आता थांबलं. पण त्यांनी मागे ठेवलेला वारसा अनमोल आहे आणि पुढील अनेक पिढ्यांना उपयुक्त ठरेल असाच आहे.
- डॉ मंजिरी ठाकूर
लेखिका मुंबईस्थित कला इतिहासकार आहेत.
Related
Please login to join discussion