No products in the cart.
बाक्रे चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न
दि १८ डिसेंबर रोजी नागपूर येथे एस. के. बाक्रे मेमोरियल आणि नटराज आर्ट अँड कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रातून कला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्साहात भाग घेतला. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक जे. के. ऍकॅडमी ऑफ आर्टस् अँड डिझाईनच्या ओंकार रहाटे याला मिळाले. सिस्फा नागपूरचा विद्यार्थी विजय कुमरे याला द्वितीय तर जेजे स्कूल ऑफ आर्टच्या सचिन बन्ने याला तृतीय पारितोषिक मिळाले. जे. के. अकॅडमीच्या सूर्या तेवर, ज्ञानेश्वर महाविद्यालय नवरगावच्या कुणाल हर्षे, नटराज आर्ट अँड कल्चरलच्या हिमांशू देवांगण आणि शासकीय कला महाविद्यालय, नागपूरच्या रितू बचाले याना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. प्रसिद्ध चित्रकार बीजय बिस्वाल, चेन्नईचे चित्रकार राजू दुरशेटीवार, बाक्रे मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लिंबेकर, कोषाध्यक्ष सुरेश व्यवहारे यांची पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख उपस्थिती होती.
कलेची भाषा ही भिन्न असते. कलाकाराला वाचन,चिंतन, मनन याबरोबर सराव करणे गरजेचे असते. यातूनच कला बहरते असे मत चित्रकार बीजय बिस्वाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. या कार्यक्रमात बाक्रे मेमोरियल सोसायटीतर्फे गरजू गुणवंत विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद लिंबेकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सदानंद चौधरी यांनी केले.
Related
Please login to join discussion