No products in the cart.
‘कथिक’चं नवं प्रदर्शन !
‘सायली राजाध्यक्ष सारीज्’ आणि ‘कथिक’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बरसे बुंदीयां’ हे कलाप्रदर्शन ३० जून २०२२ रोजी विलेपार्लेच्या सायली राजाध्यक्ष सारीज् इथं आयोजित करण्यात येत आहे. साड्यांवर मिनिएचर पेंटिंग या लघुत्तम चित्रशैलीद्वारे केलेले काम यात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या प्रदर्शनावर कला समीक्षक शर्मिला फडके यांनी फेसबुकवर लिहिलेली एक सुंदर पोस्ट इथं देत आहोत.
“बरसे बुंदीयां” हे मान्सून कला-प्रदर्शन Sayali Rajadhyaksha Sarees आणि Kathik मिळून सादर केलं जात आहे, ते अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळं आहे.
ऋतूंचे सोहळे साजरे करणं हे खास भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य. ’मान्सून’च्या आगमनाने सुरु होणारा पावसाळा हा तर निसर्ग सृजन सोहळा; आकाशातून गरजत, बरसत, झिमझिमत येणाऱ्या पाण्याच्या थेंबांचं, सरींचं स्वागत भारतीय पारंपरिक चित्रकला, काव्य, साहित्य, संगीतात अतीव आनंदानं, उत्साहानं होतं. या प्रत्येक कलेचा आविष्कार ’बरसे बुंदीयां’ मध्ये आहे.
सायली राजाध्यक्ष या माझ्या अत्यंत गुणी, कला-संवेदनशील मैत्रिणीने काळजीपूर्वक विचाराने ’बरसे बुंदीया’ संकल्पनेला आपल्या कलात्मक साड्यांवर ज्या कमाल देखणेपणाने साकारले आहे, त्याकरता तिने जी मेहेनत केली, जो उत्साह, झपाटा दाखवला त्याला दाद द्यावी तितकी कमी. त्याकरता सायलीने भारतीय लघुचित्रशैलीतले बारामास, रागमाला मालिकेतले सुंदर मोटिफ़्स खास डिझाईन करवून घेतले. भारतीय शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम गायिका अश्विनी भिडे यांनी स्वत: तिच्याकरता पारंपरिक, तसेच कुमार गंधर्व, शोभा गुर्टूंच्या बंदिशी निवडल्या, अच्युत पालव यांच्यासारख्या सर्वोत्कृष्ट सुलेखनकाराने त्यावर कला साज चढवला… यानंतर सायली राजाध्यक्ष ब्रॅंडच्या खास वैशिष्ट्य असलेल्या देखण्या लिनन, सिल्क साड्यांवर ’बरसे बुंदीया’चा जो आविष्कार सोहळा साकारला तो नजर खिळवून ठेवण्याइतका मोहक झाला नाही तरच नवल. प्रत्यक्ष पहाल तेव्हा याचा प्रत्यय तुम्हाला येईलच.
’बरसे बुंदीयां’चे आगळेपण एवढ्यावरच संपत नाही. शुभा गोखले यांच्या ’मायाबाझार’ या हॅन्डीक्राफ़्ट कलेक्शनचा समावेश हे सुद्धा ’बरसे बुंदीयां’ कला-प्रदर्शनाचे यावेळचे आकर्षण आहे. शुभाच्या देखण्या, दर्जेदार दागिन्यांबद्दल, अनोख्या कला-वस्तुंबद्दल वेगळे सांगायचीच गरज नाही.
’बरसे बुंदीया’च्या निमित्ताने ’कथिक’ कला-परिवारात शुभा गोखले आणि सायली राजाध्यक्ष या माझ्या दोन अत्यंत प्रिय, कलावंत मैत्रिणींनी पाय ठेवून ’कथिक’ला शब्दश: चार चांद लावले आहेत, यात काहीच शंका नाही.
’बरसे बुंदिया’ हे मान्सून कला-प्रदर्शन सायली राजाध्यक्ष स्टुडिओमध्ये दिनांक ३० जून ते ३ जुलै या कालावधीत भरणार आहे. तुम्हा सर्वांसोबत हा कलात्मक सोहळा साजरा करायचा आहे. नक्की या !
Related
Please login to join discussion