No products in the cart.
चित्रकार बरवे आणि आरसीएफची मालगाडी !
चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या संदर्भात लिहिलेल्या पोस्टला प्रचंडच प्रतिसाद मिळाला. त्यांच्या निधनाला यंदा सत्तावीस वर्ष पूर्ण झाली, पण बरवे यांना कलाजगत अद्याप विसरलेलं नाही याची पोच पावतीच जणू त्या पोस्टनं आम्हाला दिली. अगदी खरं सांगायचं तर या पोच पावतीनंच आम्हाला खूप मोठं बळ दिलं आहे. त्यामुळे बरवे यांच्यावरचा ग्रंथ आता नक्कीच आम्ही लवकरात लवकर पूर्ण करु याची खात्रीच वाटू लागली आहे.
तसं पाहिलं तर काय होतं त्या पोस्टमध्ये ? बरवे शिवसृष्टी मधल्या ज्या हायवे को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये राहात होते त्या सोसायटीच्या प्रवेशद्वाराचा फोटोच तर आम्ही छापला होता. पण तो खूप पाहिला गेला असावा. इतकंच नाही तर त्यातल्या मजकुरावर देखील भरपूर प्रतिक्रिया व्हाट्सअप आणि फेसबुकवर आल्या.
त्यातली एक प्रतिक्रिया होती शशी अंजनीकर यांची. त्यांनी म्हटलं होतं अजूनही आरसीएफला ती मालगाडी येते जाते. तर दुसऱ्या प्रतिक्रियेत मध्य रेल्वेवर मोटरमन म्हणून काम केलेले, प्रचंड वाचन असलेले आणि नोकरीच्या काळातले आपले सारे दैनंदिन अनुभव अत्यंत ताकदीनं शब्दबद्ध करणारे डोंबिवलीचे गणेश कुलकर्णी यांची. त्यांनी लिहिलं होतं ‘अहो ! ती गाडी आता बंद झाली आहे. लोकांनी बंद करायला लावली, कोळसा आणि इतर खनिजे हवेत उडून प्रदूषण होतं त्यामुळे. आता सारी वाहतूक कंटेनरमधून होते.’
दोन परस्पर विरोधी प्रतिक्रिया आल्यावर मी बरवे यांच्याच इमारतीत राहणाऱ्या माझ्या जेजेमधल्याच साहाध्यायाला फोन केला. त्याचं नाव बिप्लव दत्ता. तो नेमका मुंबईतच होता. त्याला विचारलं तर तो म्हणाला ‘नाही, ती गाडी अजूनही येते जाते, भले तिच्या फेऱ्या कमी झाल्या असतील !’
मग गणेश कुलकर्णी यांना फोन केला तर ते म्हणाले कुर्ल्याकडून आरसीएफला जाणारी गाडी अद्याप चालू असेल. पण वडाळा – वांद्रा जी मालगाडी तिथं जात असे ती मात्र आता बंद झाली आहे. मी अनेकवेळा ती गाडी चालवली आहे. लोकवस्ती जसजशी वाढू लागली तसतशी त्या रेल्वे लाईनवर लोकांची आक्रमणं होऊ लागली. अहो, खाटा टाकून लोकं त्या लाईनवर झोपायचे. अनेक वेळा आम्ही त्यांना उठवून गाडी पुढं न्यायचो. पण नंतर नंतर दादागिरी सुरु झाली. आणि मग हळूहळू गाडीच्या फेऱ्या देखील बंद झाल्या. गणेश कुलकर्णी यांनी दहा मिनिटाच्या संभाषणात त्या गाडीचे जे अनुभव सांगितले ते सारेच भन्नाट होते. ते सारे इथं लिहायचा मोह होतो आहे पण गणेश कुलकर्णी यांनीच ते लिहायला हवेत असं मला मनापासून वाटलं म्हणून तो मोह मी टाळतो आहे.
१९८९ साली ‘चिन्ह’चा जो अंक प्रसिद्ध झाला होता त्यात बरवे यांनी अजरामर केलेली आरसीएफच्या गाडीची ड्रॉईंग आम्ही प्रसिद्ध केली होती. नंतर ‘निवडक चिन्ह’च्या पहिल्या खंडात देखील आम्ही ती प्रसिद्ध केली होती. तीच ड्रॉईंग या पोस्टमध्ये पुन्हा देत आहोत.
*****
( हात जोडून विनंती आहे की ‘चिन्ह’चा १९८९ चा अंक किंवा ‘निवडक चिन्ह’चा पहिला खंड यांची एकही प्रत आता आमच्यापाशी उपलब्ध नाही. त्यामुळे कृपया कुणीही अंक किंवा ग्रंथ मागण्यासाठी फोन करू नये. दोन्हींची एकेकच कार्यालयीन प्रत आमच्यापाशी आहे. ती झेरॉक्सला देखील देता येणार नाही या बद्दल क्षमस्व ! )
Related
Please login to join discussion