No products in the cart.
चित्रकारांनो स्पर्धांपासून सावध राहा !
चित्रकला स्पर्धा आयोजित करणे हा अनेक आयोजकांचा पैसे कमावण्याचा एक नवीन फंडा झाला आहे . काही स्पर्धांची पोस्टर्स पाहून हे स्पष्टपणे दिसून येते. चित्रकलेच्या क्षेत्रातील सर्वच स्पर्धांच्या बातम्या आम्ही देत असतो, त्यात आयोजकांचा उद्देश सकारात्मक आहे असेच धरून आम्ही चालतो , पण काही स्पर्धा बघून मात्र कलाकारांना वेळीच सावध करणे गरजेचे वाटते.
चित्रकला स्पर्धा आयोजक वेगवेगळ्या नावाने स्पर्धा आयोजित करत असतात. (मागे एका महाभागाने तर एम.एफ. हुसेन यांच्या नावाने निसर्गचित्र स्पर्धा आयोजित केली होती!) नुकतेच एक पोस्टर आमच्याकडे आले त्या पोस्टरनुसार ‘कुंचला’ या नावाने लँडस्केप स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेची रजिस्ट्रेशन फी तब्बल दोन हजार रुपये आहे. आता या स्पर्धेचं आयोजन पवना लेक इथं करण्यात आलं आहे. दोन दिवसीय आयोजनात जेवण, नाश्ता आणि डी जे नाईट देखील समाविष्ट आहे! हे आयोजन बघून हा एखादा इव्हेंट आहे की लँडस्केप स्पर्धा अशीच शंका आली.
चित्रकलेविषयी काही स्पर्धा आयोजित करत आहात तर एखाद्या ज्येष्ठ चित्रकाराचे मार्गदर्शनपर सत्र ठेवा ना डी जे नाईटसाठी स्पर्धक जातील क्लबमध्ये तुम्ही कशाला तसदी घेता?
या स्पर्धेत बक्षिसंही दिलं जाणार आहेत. प्रथम क्रमांक पाच हजार रुपये द्वितीय क्रमांक तीन हजार रुपये. स्पर्धेचे प्रवेश शुल्क दोन हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला बक्षीस पण दोनच हजार मिळणार आहे बरं का! हे असं आयोजन करून लोक पैसे कमवायचा नवीन फंडा काढत का आहेत ? आधीच चित्रकलेला समाजात फारसे बरे दिवस नाहीत. पण अशा टिनपाट स्पर्धा आयोजनामुळे चित्रकला क्षेत्राची अब्रू वेशीला टांगली जाईल हे निश्चित.
कॉलेजची मुलं ही भरमसाठ फी जमा करून स्पर्धेत भाग घेतात की त्यातून आपल्याला काहीतरी नाव मिळेल! पण विद्यार्थ्यांकडून ही फी तर गोळा केली जातेच पण वर त्यांची चित्रंही आयोजक ताब्यात ठेवतात. या चित्रांचं पुढं काय होत ते ओपन सिक्रेट आहे. मागे जे नाशिक कलानिकेतन चित्रचोरी प्रकरण झालं होत त्यातून हेच दिसून आलं होतं की स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून चित्र जमा केली गेली आणि ती परस्पर विकली गेली.
प्रसिद्ध चित्रकार विक्रांत शितोळे यांना या स्पर्धांबाबत विचारले असता त्यांच्या मते, “विद्यार्थी व होतकरू चित्रकारांनी अशा स्पर्धांना बळी पडू नये. ज्या स्पर्धेची फी आणि पुरस्कार निधी हा सारखाच आहे त्यांचा दर्जा काय असेल याचा विचार करा. कॅम्प, डीजे, बोनफायर, बार्बेक्यू ……. या स्पर्धा आहेत की पिकनिक? हल्ली स्पर्धेच्या नावाखाली निव्वळ धंदा सुरू झालाय. त्यामुळे कलाकार आणि आयोजक यांनी कलेच्या पावित्र्याची जाणीव जपणे गरजेचे आहे.”
त्यामुळे चित्रकारांनो वेळीच सावध व्हा.
Related
Please login to join discussion