No products in the cart.
दोन कलासक्त राजांचं मोठेपण
लेखिका धारा भांड मालुजकर यांनी दुर्वांकुर या दिवाळी अंकात बडोद्याचे महाराज सयाजीराव आणि राजा रवी वर्मा यांच्यावर परिचयात्मक लेख लिहिला आहे. हा केवळ परिचय नसून दोन गुणग्राहक, कलासक्त आणि दानशूर राजांच्या गुणांचा परिचय आहे. एखादी व्यक्ती केवळ राजा आहे म्हणून मोठी नसते तर त्या व्यक्तीतले असामान्य गुण त्या व्यक्तीला जनमानसात स्थान देतात. या आभाळाएवढ्या माणसांचं कर्तृत्व वाचलं की आजच्या राज्यकर्त्यांचा खुजेपणाही कळतो.
बडोद्याचे सयाजीराव महाराज ही दानशूर व्यक्ती. ब्रिटिश पारतंत्र्याच्या काळात त्यांनी आपल्या राज्यात खूप सुधारणा केल्या. महाराज हे कलासक्त होते. पण त्याचबरोबर ते चित्रकलेला सर्व ललितकलांमध्ये श्रेष्ठ मानत असत. त्यामुळे त्यांनी चित्रकलेला खूप उत्तेजन दिलं. आपल्या नव्या महालात त्यांना भारतीय परंपरा आणि संस्कृतीवर आधारित देवतांची चित्रे काढून घ्यायची होती. हे काम ते सहज एखाद्या ब्रिटिश चित्रकाराला देऊ शकले असते, पण तसे न करता त्यांनी अशी व्यक्ती शोधली जी भारतीय संस्कृतीची जाणकार होती. ती व्यक्ती म्हणजे राजा रवी वर्मा. राजा रविवर्मा यांची देवादिकांची चित्रे जनमानसात स्थान मिळवून होती. त्यामुळे हे काम त्यांनाच द्यायचे असे बडोद्याच्या महाराजांनी ठरवले होते. याशिवाय राजा रवी वर्मा यांना सयाजीरावांनी राजाश्रयही दिला होता.

तब्बल दोन वर्षे राजा रवी वर्मा यांनी महालासाठी पेंटिंग्जचे काम केले. त्याआधी त्यांनी भारतभर फिरून पौराणिक चित्रांसाठी अभ्यास केला. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्रावणकोर तसेच मुंबई येथे या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनांना लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत होता. बडोद्याला जेव्हा या चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले तेव्हा प्रदर्शनाच्या जागेबाहेर किती लोक आले हे समजण्यासाठी रांजण आणि खडे ठेवण्यात आले होते. प्रदर्शन पाहून आलेली प्रत्येक व्यक्ती एक एक खडा रांजणात टाकायची.
ही सर्व चित्रे महालात लागण्यापूर्वी बघण्याची प्रचंड उत्सुकता सयाजीरावांना होती. काम बघून त्यांना प्रचंड आनंद झाला पण तो शब्दात व्यक्त करण्यासारखा नव्हता. राजा रविवर्मा यांचे काम बघून महाराज भारावून गेले. या कामाची बिदागी म्हणून त्या काळाचे ५० हजार (आजचे १३ कोटी रुपये) त्यांनी रवी वर्मा याना दिली. शिवाय आयुष्यभर विंडसर न्यूटनचे रंग भेट म्हणून देत राहिले.
इतका कलासक्त राज्यकर्ता आजच्या काळात सापडणे अवघड आहे. महाराजांचं मोठं मन आणि राजा रवी वर्मा यांची कलेप्रती निष्ठा या लेखात वाचायला मिळते. धारा भांड यांनी शब्दातून अक्षरश: तो काळ जिवंत केला आहे. सयाजीराव आणि रवीवर्मा दोघेही राजेच होते. या दोन्ही राजांनी एकमेकांचा किती आदर केला हे या लेखात वाचायला मिळते. लेखातील अनेक प्रसंग डोळ्यात पाणी आणणारे आहेत. असे राज्यकर्ते असतील तर कलाकार कधीच देशोधडीला लागणार नाही. वाचकांना या लेखातून बरंच काही गवसेल. त्या काळाचं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलच पण कलाकार कसा असावा आणि आश्रयदाता (आजच्या भाषेत आर्ट कलेक्टर) कसा असावा हे समजून घेता येईल.
लेखाचं मुद्रितशोधन करताना मात्र काही अक्षम्य चुका झाल्या आहेत. यामुळे काही वाक्यांचा अर्थच बदलला आहे. एवढी एक चूक सोडली तर लेख अतिशय उत्तम आहे. कलारसिकांनी तो वाचायलाच हवा.
दुर्वांकुर दिवाळी अंक
किंमत : २०० रु
*****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion