No products in the cart.
‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ पुस्तकाचं प्रकाशन
चित्रकार सुहास बहुळकर लिखित ‘बॉम्बे रिव्हायव्हलिस्ट स्कूल’ या पुस्तकाचे प्रकाशन दि ६ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा. आ. रेगे सभागृहात संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे आणि चित्रकार दिलीप रानडे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर ठाणे ग्रंथ संग्रहालयाचे संस्थापक विनायक लक्ष्मण भावे (महाराष्ट्र सारस्वतकार) यांच्या तैलचित्राचे अनावरण सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या तैलचित्राचे चित्रकार हे सुहास बहुळकर आहेत.
‘बॉम्बे रिव्हायवॅलिस्ट स्कूल’ अर्थात ‘कलेतील भारतीयत्वाची चळवळ’ या ग्रंथात बहुळकरांनी बॉम्बे रिव्हायवलिस्ट चळवळीतील चित्रकारांच्या कामांचा आढावा घेतला आहे. या स्कूलची कॅप्टन सॉलोमन यांनी केलेली सुरुवात, तिला मिळालेला जनमानसातील पाठिंबा, चळवळीतील चित्रकारांचे यश याबद्दलचा इतिहास या ग्रंथात वाचायला मिळेल.
बॉम्बे रिव्हायवॅलिस्ट शैलीतील चित्रे बहुळकर जेजेमध्ये विद्यार्थी असताना त्यांना पाहायला मिळाली. तत्कालीन परिस्थितीत आधुनिक चित्रकलेचे वारे वाहू लागल्याने या चित्रांबद्दल जेजेमध्ये फारशी चर्चा होत नसे. पुढे सुहास बहुळकर जेजेमध्ये अधिव्याख्याता असताना तत्कालीन डीन बाबुराव सडवेलकर यांनी त्यांच्याकडे जेजेच्या कपाटात पडून असलेली हजारो चित्रे कालक्रमानुसार निवडून, निवडक चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्याचे काम सोपवले. हे काम करत असताना बॉम्बे रिव्हायलिस्ट स्कूल शैलीतील चित्रांबद्दल बहुळकरांच्या मनात कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली. आणि बहुलकरांच्या दीर्घ अभ्यास आणि संशोधनातून ‘बॉम्बे रिव्हायवॅलिस्ट स्कूल’ हा ग्रंथ आकारास आला.
३०४ पानी सचित्र अशा या ग्रंथाची किंमत ६०० रु असून. राजहंस प्रकाशनातर्फे पहिले तीन महिने हा ग्रंथ सवलतीत ४५० रु किमतीमध्ये उपलब्ध आहे. पुस्तक प्रकाशनाच्या ठिकाणीही हा ग्रंथ विक्रीस उपलब्ध असेल.
अधिकाधिक कलारसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन ठाणे ग्रंथ संग्रहालय, राजहंस प्रकाशन आणि चित्रकार सुहास बहुळकर यांनी केले आहे.
******
Related
Please login to join discussion