No products in the cart.
बहिष्कार कायम तरी परीक्षा सुरु !
विना अनुदानित महाविद्यालयांनी दि ३१ मार्च २०२३ पासून कला महाविद्यालयांच्या परीक्षांवर बहिष्कार टाकला आहे. असे असले तरी कला संचालनालयाने आपल्या नव्या आदेशाने या खेळीवर आपला मास्टरस्ट्रोक टाकला आहे. उच्च शिक्षण खात्याच्या प्रधान सचिवांच्या आदेशांनुसार विना अनुदानित महाविद्यालयांचे विद्यार्थी अनुदानित महाविद्यालयांच्या केंद्रामध्ये आपले प्रवेशपत्र दाखवून परीक्षा देऊ शकतात. अशा आशयाचे एसएमएसही विद्यार्थ्यांना पोहोचले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी अनुदानित महाविद्यालयात आपली परीक्षा देत आहेत. सूत्रांकडून असेही कळते की जर यावर्षी या परीक्षा घेण्यात विना अनुदानित महाविद्यालयांनी सहकार्य दिले नाही तर पुढच्या वर्षीपासून विना अनुदानित महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमास प्रवेश देण्याची परवानगी देण्यात येणार नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शासनातर्फे त्यांचा प्रवेश रीतसर अनुदानित महाविद्यालयात करून देण्यात येईल.
खरं तर शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना एसेमेसवर अनुदानित महाविद्यालयात परीक्षा द्या असे कळवले असले तरी एवढ्याने हा प्रश्न संपत नाही. मुळात या परीक्षेचे आयोजनच ढिसाळ आहे. ३१ मार्च पासून परीक्षा सुरु होत असताना अनेक महाविद्यालयांना उत्तरपत्रिका मिळाल्या नव्हत्या. त्यांना उत्तरपत्रिकेच्या चक्क झेरॉक्स काढून परीक्षा घ्या सांगण्यात आले. आधीच्या विद्यार्थ्यांचे नियोजनच योग्य नसताना पुन्हा विना अनुदानित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांची सोयही झेरॉक्स केलेल्या उत्तरपत्रिकांमधून केली गेली का हा मोठा प्रश्न आहे.
जर अशा प्रकारे परीक्षा घेण्यात येत असतील तर त्या घ्यायच्या तरी कशाला. परीक्षेचं गांभीर्यच इथं नष्ट होत असेल तर विद्यार्थ्यांचं भवितव्य काय असणार आहे? असा प्रश्न कला वर्तुळातून विचारण्यात येत आहे.
महाराष्ट्रात अनुदानित, विना अनुदानित अशा विविध महाविद्यालयातून कला शिक्षण (फौंडेशन, एटीडी, जीडी आर्ट) घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ५६०० एवढी आहे. ३१ महाविद्यालये ही अनुदानित आहेत. इथे जवळपास १५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. विना अनुदानित महाविद्यालयात एकूण ४००० विद्यार्थी शिक्षण घेतात. विना अनुदानित महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेचे फॉर्म भरलेले आहेत. हे सर्व रेकॉर्ड शासनाकडे असते.
तर विना अनुदानित महाविद्यालय संघटनेचे अध्यक्ष भारत बारोटे यांनी मात्र आमचा परीक्षेवरील बहिष्कार- जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत सुरूच राहील असे सांगितले आहे. आणि यावर्षी ज्या मुलांनी बहिष्कारामध्ये सहभाग घेतला आहे, त्यांच्या परीक्षा शासनाला पुन्हा घ्याव्या लागतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
खरं तर विद्यार्थी आपली परीक्षा अन्य केंद्रावरून देऊ शकत असतील तर हा बहिष्कार कितपत यशस्वी झाला हा प्रश्नच आहे. विना अनुदानित महाविद्यालयांना शासन कॉलेज चालवण्याची परवानगी देते. कला संचालनालयाचे काम फक्त निरीक्षकांचे असते. अशा वेळी या अभूतपूर्व समस्येवर तोडगा म्हणून शासनाने परीक्षा केंद्र बदलून मार्ग काढला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.
या सर्व प्रकारामुळे उच्च कला परीक्षा ही चेष्टेचा विषय बनली आहे असे दिसून येते. महाविद्यालये अनुदानासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरत आहेत. तर उच्च शिक्षण खाते, गौरवशाली परंपरा असणारे महाराष्ट्राचे कला संचालनालय कला शिक्षणाच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही अशा थाटात वावरत आहे. त्यामुळे समाजाच्या मनात कलेविषयी आधीच जो उदासीन दृष्टीकोन आहे तो अधिकच उदासीनतेकडे चालला आहे हे निश्चित.
*****
(बातमी मधील फोटो प्रतीकात्मक आणि इंटरनेटवरून साभार. )
Related
Please login to join discussion