No products in the cart.
सॅम्युएल आणि सागर कांबळे बजाजमध्ये
चित्रकार सीबी सॅम्युएल आणि सागर कांबळे यांच्या चित्रांचे प्रदर्शन बजाज आर्ट गॅलरी येथे दि १३ ते १८ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सीबी आणि सागर हे दोघे जेजे स्कूल ऑफ आर्टचे माजी विद्यार्थी आहेत. सीबी यांना महाविद्यालयीन जीवनापासून पोर्ट्रेट करण्याची आवड आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रात मानवी आकारांचे चित्रण जास्त प्रमाणात असते. या चित्रणाला ते अध्यात्माचीही जोड देतात. लहानपणापासून चर्चच्या धीरगंभीर, अध्यात्मिक वातावरणाचा मोठा परिणाम सीबी यांच्या भावविश्वावर आहे. त्याचबरोबर चर्चमधल्या अध्यात्मिक वातावरणाचाही प्रभाव सीबी यांच्या चित्रणशैलीवर असल्याने त्यांची चित्रे ही अध्यात्माचा गूढ गंभीर अनुभव आपल्याला देतात. हा केवळ भावानुभवच नसतो तर सीबी यांची चित्रकलेच्या तंत्रावरही जबरदस्त पकड असल्याने तंत्रकुशल दृश्यात्मक अनुभवही रसिकांना सीबी यांच्या चित्रातून मिळतो.
सागर कांबळे हे खास आपल्या कोल्हापूरच्या मराठी मातीतले चित्रकार आहेत. त्यांच्या चित्रातून ग्रामीण जीवनाचे दर्शन आपल्याला होते. मातीशी जुळलेले अस्सल ग्रामीण चित्रण पाहतानाच त्यांच्या समस्यांचंही दर्शन आपल्याला सागर यांच्या चित्रातून होते. सागर यांची स्वतःची अशी खास चित्रशैली तयार झाली आहे. महिलांचे प्रश्न, ग्रामीण परंपरा, शेतकऱ्यांचे प्रश्न अशा विषयावर सागर यांच्या कलाकृती तयार झाल्या आहेत. चित्राकृतीमध्ये वापरलेले निवडुंग, साप यासारखे आकार हे प्रश्न अधिक गंभीरपणे आपल्यासमोर येतात आणि एकप्रकारे प्रत्येक कलाकृती ही त्या त्या समाज घटकाचे आत्मचरित्रच वाटू लागते.
या प्रदर्शनाची वेळ ही सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी खालील निमंत्रण पत्रिका पाहावी.
*****
Related
Please login to join discussion