No products in the cart.
जेजेच्या प्रतिनिधींमध्ये वादावादी ?
सध्या वेगवेगळ्या विषयावरून जेजेच्या विद्यार्थी प्रतिनिधी आणि विद्यार्थी यांच्यामध्ये प्रचंड वाद सुरू आहेत. हे वाद एवढे विकोपाला गेले आहेत की मागच्या आठवड्यात जीएस, एल आर, युआर आणि विद्यार्थी यांच्यामध्ये गट पडून भांडणे झाली. सूत्रांकडून असे कळते की जीएसने परस्पर निर्णय घेऊन दि 19 ते 21 डिसेंबर दरम्यान स्पोर्ट्स विकचे आयोजन केले आहे. हा निर्णय जीएसने एकट्यानेच घेतला आणि अगदी एल आर किंवा यु आर यांनाही या निर्णयाची कल्पना नव्हती अशी चर्चा विद्यार्थ्यांमध्ये सुरू आहे. यामध्ये विद्यार्थी किंवा इतर प्रतिनिधी यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यात आला. कुठलीही तयारी नसताना हा इव्हेंट आयोजित करण्यात आला. आता अनेक विद्यार्थी चिडले आहेत आणि ते या स्पोर्ट्स वीकवर बहिष्कार टाकणार आहेत असे सूत्रांकडून कळते.
दुसरा एक अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे जेजेमध्ये जी शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येते त्याचेही आयोजन परस्पर जीएसने केले आहे. यामध्ये संस्थेच्या प्रमुखांच्या सहमतीने निश्चित झालेली तारीख डावलून विद्यार्थी प्रतिनिधीने आपल्या मर्जीनुसार नवीन नियोजन केले. कुठल्याही सरकारी महाविद्यालयामध्ये नियमाप्रमाणे शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन हे फक्त डीन यांच्या देखरेखीखाली आणि त्यांच्या आदेशानुसारच होऊ शकते. कुठल्याही शैक्षणिक कार्यक्रमाच्या आयोजनात जेजेचे डीन आणि कलादीपचे अध्यक्ष आपली जबाबदारी टाळू शकत नाहीत. ( अजून एक महत्वाचे म्हणजे जेजेमध्ये डिग्री कोर्स असल्यामुळे कलादीपचे अध्यक्ष हे शासकीय नियमानुसार डिग्रीचे शिक्षक असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत डिप्लोमाच्या शिक्षक आहेत.) विद्यार्थी प्रतिनिधीला परस्पर बदल करण्याचा किंवा एखादा इव्हेंट आयोजित करण्याचा हक्क नसतो. असे असताना इथे जो मनमानी कारभार होत आहे त्यामुळे काही दुर्दैवी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
1979-80 मध्ये जेजेची शैक्षणिक सहल नेपाळ येथे गेली होती. यावेळी एका विद्यार्थ्याचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला होता. नेपाळच्या नियमानुसार या घटनेवेळी सदर विद्यार्थ्यांचे शव भारतात आणू दिले जात नव्हते. यावेळी सहलीला गेलेल्या शिक्षकांना प्रचंड धावपळ करावी लागली होती. या घटनेचे उदाहरण समोर असतानाही अशी परस्पर ट्रिप आयोजित केली जात असेल तर ही किती अक्षम्य चूक आहे याची कल्पना डीन यांना नाहीये का? वर्तमानात अशी काही दुर्दैवी घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न इथे उपस्थित होतो.
जेजेसारख्या महत्वाच्या कलासंस्थेमध्ये अशी भांडणे होणे किंवा विद्यार्थी प्रमुखाने मनमानी कारभार करणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे संस्थेच्या प्रमुखांनी वेळीच लक्ष घालून ही वादावादी थांबवावी आणि योग्य नियोजनासह कार्यक्रम आखले जावेत या अपेक्षेत कला शाळा आवारातील विद्यार्थी आहेत असे कळते.
****
Related
Please login to join discussion