No products in the cart.
अशोक परांजपे स्मृती पुरस्कार डॉ.सुचेता भिडे-चापेकर यांना जाहीर
डॉ.सुचेता भिडे-चापेकर यांना ज्येष्ठ नाटककार, गीतकार आणि लोकसाहित्याचे संशोधक अशोक परांजपे स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र कला संस्कृती मंचाकडून ही घोषणी करण्यात आली. २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता पुणे येथील नेहरु सांस्कृतिक केंद्रात नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
सुचेता भिडे- चापेकर या जेजे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थीनी आहेत. त्यांचे चित्रकार वडील विश्वनाथ भिडे हे बी. विश्वनाथ या नावाने ते चित्रपटांची पोस्टर्स-बॅनर्स तयार करत असत. झाँसी की रानी, औरत, आये दिन बहार के, धर्मवीर, आदमी सडक का, बॉबी इ. चित्रपटांसाठी त्यांनी साकारलेली भित्तीपत्रकं उत्कृष्ट चित्रकारितेचा नमुना ठरली. मदर इंडिया, मुगले आझम, शोले, शान या सिनेमांचे सुंदर बॅनर्स बी. विश्वनाथ यांनीच साकारले होते.
असा कलेचा संपन्न वारसा लाभलेल्या घरात सुसंस्कृत घरात ६ डिसेंबर, १९४८ रोजी सुचेता यांचा जन्म झाला. मुलीची नृत्यातली गती आणि आवड बघून चित्रकार वडील विश्वनाथ भिडे यांनी त्यांना नृत्य शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. गुरू पार्वतीकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वयाच्या १५व्या वर्षी भरतनाट्यम् चे शिक्षण पूर्ण केले. नृत्यसाधनेबरोबरच मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्ट या कला महाविद्यालयातून त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र आणि भारतभर, तसेच लंडन, पॅरिस, फ्रान्स, जर्मनी, इटली, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, न्यूझीलंड अशा परदेशांमध्ये कार्यक्रम केले. दूरदर्शन, एज्युकेशन मीडिया रिसर्च यांसाठी नृत्यावरील शैक्षणिक मालिका सादर केल्या. १९७४ मध्ये डॉ.अनिलकुमार चापेकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्यावरही त्यांनी नृत्यातील करिअर सुरू ठेवले. ‘कलावर्धिनी’ या आपल्या नृत्यशिक्षण संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे त्या नव्या कलाकारांना आपल्या समर्थ मार्गदर्शनाखाली घडवत आहेत. “नृत्यकलेचे व्यवसायात रूपांतर होता कामा नये. ही कला खोलात जाऊन समजून देण्याची जबाबदारी नृत्य शिक्षकांची आहे,” असे त्या आवर्जून सांगतात.
Related
Please login to join discussion