News

चित्रकथी गॅलरीत ‘कलर्स ऑफ लाईफ’ !

मुंबईतील चित्रकथी आर्ट गॅलरी येथे दि 08 मे ते 07 जून 2023 दरम्यान ‘कलर्स ऑफ लाईफ’ या समूह प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या समूह प्रदर्शनात चित्रकार विठ्ठल हिरे, प्रदीप सरकार, आसिफ होसेन, दीपक पाटील आणि पारस परमार यांचा समावेश आहे. या प्रदर्शनाचे संयोजन वास्तू विशारद अनुराधा रायकर यांनी केले आहे.

जलरंग या अवघड माध्यमांवरील विलक्षण पकड हे विठ्ठल हिरे यांचं वैशिष्टय आहे. ग्रामीण आणि नागरी जीवनातील विषयांचं चित्रण हिरे यांनी आकर्षक पद्धतीनं केलं आहे. प्रदीप सरकार यांनी आपल्या चित्रांमध्ये कलेचं पावित्र्य आणि संगीताच्या माध्यमातून साधता येणारं अध्यात्मिक समाधान कॅनव्हासवर चित्रित केलं आहे. विविध कला या मानवी जीवनाला अर्थ मिळवून देतात. या अर्थाचा शोध प्रदीप सरकार यांनी चित्रांच्या माध्यमातून घेतला आहे. आसिफ होसेन यांनी प्रामुख्यानं ऍक्रॅलिक माध्यमात काम केलं आहे. त्यांची चित्रं ही बनारसच्या काठावरील मंदिरांचं पावित्र्य कॅनव्हासवर चित्रित करतात. एखाद्या सुंदर कथेप्रमाणं बारीक तपशिलांसह मंदिर आणि आजूबाजूच्या घटकांचं मोहक चित्रण आसिफ करतात. दीपक पाटील यांची चित्र माध्यमावर हुकूमत असल्यानं एकाच वेळी तेजस्वी आणि मंद रंगांची मोहक जुगलबंदी त्यांनी कॅनव्हासवर साकारली आहे. सोबतच वाळूसारख्या वेगळ्याच माध्यमाचा वापर करून राजस्थानी संस्कृती त्यांनी कॅनव्हासवर चित्रित केली आहे. मनातील भावनांचं अमूर्त चित्रण तेजस्वी रंगांच्या साहाय्यानं पारस परमार यांनी कॅनव्हासवर केलं आहे. रंगांचा योग्य वापर आणि चित्रकलेच्या तंत्रावरची हुकूमत हे पारस यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे.

विलेपार्ल्याच्या ‘चित्रकथी आर्ट गॅलरी’मध्ये हे प्रदर्शन सकाळी 11:00 ते संध्याकाळी 7:00 वाजेपर्यंत रसिकांना पाहता येईल.

प्रदर्शनाचा पत्ता :
चित्रकथी आर्ट गॅलरी, 402, आकृती ओरियन बिल्डिंग,
विलेपार्ले (पूर्व), मुंबई

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.