No products in the cart.
खजुराहो महोत्सवात कॉपी
मध्यप्रदेशच्या खजुराहो येथे उस्ताद अल्लाउद्दीन खान सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन झाले आहे. या महोत्सवात मध्यप्रदेशाच्या सांस्कृतिक विभागातर्फे चित्रकाराला रुपंकर पुरस्कार दिला जातो. यावर्षी तो धर्मेंद्र मेवाडे या चित्रकाराच्या कलाकृतीला देण्यात आला. पण प्रत्यक्षात त्याची ही कलाकृती चेन्नईच्या चोलामंडल आर्ट व्हिलेजचे अध्यक्ष एम. सेनातीपती यांच्या मूळ कलाकृतीची कॉपी आहे असे सांगितले जाते. सेनातीपती यांनी १९८० मध्येच ही कलाकृती तयार केली होती. तर धर्मेंद्र मेवाडे याने निवड समितीला ही आपली मूळ कलाकृती असून भोपाळ गॅस दुर्घटनेपासून प्रेरणा घेऊन आपण ती तयार केली असे सांगितले होते.

मार्च २०१९ मध्ये एम. सेनातीपती यांच्या चित्रकला कारकिर्दीवर ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात लेख आला होता. या लेखात मूळ कलाकृतीचा समावेश आहे. आतापर्यंत चित्रकार एखाद्या चित्रकारापासून प्रेरणा घेऊन त्याच्या शैलीचा वापर करून आपली कलाकृती साकार करत होते. आता मात्र जशीच्या तशी कलाकृती कॉपी करून चित्रकार पुरस्कारही मिळवत आहेत. चित्रकला क्षेत्रासाठी ही निंदनीय घटना आहे. जेव्हा शासन कुठलाही चित्रकला क्षेत्रातील पुरस्कार, बक्षीस देते तेव्हा निवड समितीवर चित्रकलेतील तज्ज्ञ मंडळींची निवड करणे गरजेचे आहे, जेणेकरून समितीला नंतर नामुष्कीचा सामना करावा लागणार नाही.

सोशल मीडियामुळे आता प्रत्येक कलाकार, त्याचं काम हे इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे कोणी कोणाची कॉपी केली असेल तर लगेच कळते. चित्रकारांनी देखील या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे.
Related
Please login to join discussion