No products in the cart.
वार्षिक परीक्षेवेळी डीनच गैरहजर?
सध्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये सर्व शाखांच्या अंतिम वर्षाच्या वार्षिक परीक्षा सुरु आहेत. पण या परीक्षांचे आयोजन प्रचंड ढिसाळपणे करण्यात येत आहे. त्यावर कडी म्हणजे काल परीक्षेच्या वेळी महाविद्यालयाचे डीनच गैरहजर होते. अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य ज्या परीक्षेवर अवलंबून असते अशा परीक्षेवेळी डीन जर गैरहजर असतील तर परीक्षेमध्ये काही अडथळा आला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एवढेच नाही तर या परीक्षेच्या आयोजनात परीक्षा नियंत्रकाच्या कार्यालयाची योजना नव्हती. त्यामुळे मुंबई विद्यापीठही या ढिसाळ नियोजनाला तेवढेच जबाबदार आहे असे दिसून येते. प्रत्यक्ष डीनच गैरहजर असल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एक दिवस आधी परीक्षा क्रमांक मिळाले. परीक्षेची वेळ सकाळी 10:30 होती. ती परीक्षा एक तास उशिरा म्हणजे 11:35 वाजता सुरु झाली. नेमके त्याच वेळी शिपाई कंत्राटाचा कालावधी संपल्यामुळे महाविद्यालयात शिपाई उपलब्ध नाही.
आणखी एक लक्षात येणारी बाब म्हणजे तृतीय वर्षाच्या महाविद्यालयांतर्गत परीक्षाही (Internal Exams) याच दरम्यान नियोजित आहेत. या काळात अंतिम वर्षाच्या एखाद्या विद्यार्थ्याला एटीकेटी लागू आहे त्याने दोन्ही परीक्षा एकाच कालावधीत कशा द्यायच्या? वास्तविक पाहता विद्यापीठाच्या परीक्षेला महत्व देऊन त्यानुसार दोन्ही वर्षाच्या परीक्षांचे आयोजन करणे गरजेचे होते. असे न करता ढिसाळ आयोजनामुळे परीक्षेचा हा अभूतपूर्व गोंधळ निर्माण झाला आहे असे दिसून येते.
सगळ्यात गंभीर बाब म्हणजे डीन जर कोणतीही पूर्वसूचना न देता नेमके परीक्षेच्या काळातच जर गैरहजर राहत असतील तर महाविद्यालय आणि विद्यार्थी यांचे भविष्य अधांतरी असणार हे निश्चित.
******
Related
Please login to join discussion