No products in the cart.
जेजेत डीन आणि प्रभारी डीन दोघंही गैरहजर ?
सध्या जेजेच्या शिक्षकांच्या कलाकृतींचे प्रदर्शन नागपूरच्या कॉलेजमध्ये सुरू आहे. यानंतर हे प्रदर्शन औरंगाबाद कॉलेजलाही भरवण्यात येईल. या दरम्यान प्रिंटमेकिंग वर्कशॉपही आयोजित केले जाणार आहे. जेजेच्या अतिउत्साही डीन साहेबांनी यांनी हा उपक्रम आयोजित केला आहे.
उपक्रम तसा स्तुत्य आहे पण अचानक डीन साहेब एवढे कार्यतत्पर कसे झाले? याचा शोध घेतला असता सूत्रांकडून माहिती समजली ती अशी, जेजे आता लवकरच डिनोव्हो होणार मग डीन साहेबांच्या हातातून जेजे जाऊन फक्त कला संचालनालयच उरणार. तेव्हा जमेल तेवढे ‘अर्थ’पूर्ण प्रकल्प उरकून घ्या आणि संबंधितांचा फायदा करून घ्या असाच खाक्या आहे.
जेजे डिनोव्हो स्टेटसच्या कामासाठी येणाऱ्या पत्रांना केराची टोपली दाखवणाऱ्या डीन साहेबानी या कला प्रदर्शनाच्या कामासाठी मात्र तडकाफडकी जीआर काढला.
महाराष्ट्र फॅकल्टी डेव्हलपमेंट अकॅडमीसोबत (ज्याचे संचालक खुद्द निपुण विनायक आहेत ) जेजे स्कूल ऑफ आर्टने सामंजस्य करार केलेला आहे. या करारानुसार जेजे स्कूल ऑफ आर्टला इतर महाविद्यालयांच्या सदस्यांना कलेच्या अंगाने विकसित करण्याच्या कार्यशाळा घ्यायच्या आहेत. पण असा कुठलाही कार्यक्रम कॉलेजने अजून आयोजित केलेला नाही. या कार्यक्रमात खरं तर जेजे स्कूल ऑफ आर्ट पहिल्या दहा कॉलेजेसमध्ये समाविष्ट आहे पण डीन साहेब असे कार्यक्रम घेण्यात चालढकल करतात असे दिसून येते.
आपला हा ‘अर्थ’पूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी डीन साहेब सध्या नागपुरात आहेत. या काळात जेजे आणि विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. ,आधीच कंत्राटी, हंगामी अशा वेगवेगळ्या नावाने घेतलेल्या शिक्षकांच्या ताब्यात जेजेचे विद्यार्थी काय आणि किती शिकतात ते त्या विश्वनाथालाच ठाऊक. ,पण कुणी आक्षेप घेऊ नये म्हणून डीन साहेबानी आपला चार्ज एका तरतरीत व्यक्तिमत्वाला दिला. पण हे साहेब काल कॉलेजमध्ये हजरच नव्हते असे सूत्रांकडून समजले. हल्ली सरकारी आस्थापनात बायोमेट्रिक सुरू केले आहे ते बरे आहे त्यामुळे संबंधित जबाबदार अधिकारी हे प्रभारी शिक्षक उपस्थित का नव्हते याचं संशोधन करू शकतात.
जून 2023 मध्ये जेजे डिनोव्हो चे सुधारित अभ्यासक्रम एमएफए अभ्यासक्रम सुरू होतील. 2024 मध्ये बीएफए प्रथम वर्षाचे सुधारित अभ्यासक्रम सुरू होतील. तत्पूर्वी जेजेमधून आपले अर्थपूर्ण कार्यक्रम लवकरात लवकर पूर्ण करायचे असा संबंधितांचा डाव दिसतो अशी कुजबुज जेजेच्या परिसरात सुरू आहे.चंद्रकांतदादा या प्रकरणात लक्ष घालणार का ते आता पाहायचं !
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion