No products in the cart.
जलो मत बराबरी करो !
01 तारखेपासून ‘चिन्ह ऑनलाईन गॅलरी’मध्ये रुपाली ठोंबरे या चित्रकर्तीचं ऑनलाईन प्रदर्शन सुरु आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. गॅलरीची लिंक सगळ्या माध्यमात पोहोचवल्यापासून ही उत्तम कल्पना आहे असा प्रतिसाद अनेक जण देत आहे. खरं तर ‘चिन्ह’ची ही ऑनलाईन गॅलरी आधीपासूनच वेबसाईटवर अस्तित्वात आहे. प्रकाश वाघमारे, भगवान चव्हाण यांची ऑनलाईन प्रदर्शनंही या गॅलरीवर झाली आहेत. पण इंग्लिश वेबसाईट सुरु केल्यापासून ‘चिन्ह’ला जो जागतिक प्रतिसाद मिळतोय ते बघून आम्ही ‘ऑनलाईन गॅलरी’ची संकल्पना अधिक प्रभावीपणे मांडण्याचा निर्णय घेतला आणि त्याला प्रतिसादही छान मिळाला.
‘चिन्ह’चा ‘चित्रचर्चा’ नावाचा एक व्हाट्सअप ग्रुप आहे, म्हणजे होता. खरं तर त्याची सुरुवात आम्ही ‘चिन्ह’चा एक अधिकृत ग्रुप म्हणून केली होती पण तिथे होणारी वादावादी लक्षात घेता तो आता ‘चिन्ह’चा अधिकृत ग्रुप नाहीये. पण मी त्या ग्रुपवर सदस्य आणि ऍडमिन म्हणून तिथे आहे. इतर ग्रुपवर ज्या प्रमाणे आम्ही ‘चिन्ह’चे अपडेट्स पोहोचवतो त्याचप्रमाणे अपडेट्स मी या ग्रुपवरही नियमितपणे पोहोचवत असते. काल ‘चिन्ह’च्या ऑनलाईन गॅलरीमध्ये सुरु असणारं ‘डॉट टू डॉट’ हे प्रदर्शनही मी तिथं पोहोचवलं. अनेकांचा उत्तम प्रतिसाद आणि प्रतिक्रिया त्यावर आल्या. एवढं सगळं होत असताना एक प्रतिक्रिया मात्र खटकणारी होती. एक ज्येष्ठ चित्रकार खास पुणेरी खवचट पद्धतीने कमेंट करते झाले, की “कसला अभिनव उपक्रम? ढिगभर ऑनलाईन गॅलरीज आहेत त्यापैकी एक एवढंच.”
खरं तर एरवी मी अशा कमेंट आल्या की दुर्लक्ष करते. शिवाय एखाद्या ज्येष्ठ ( वयाने ) चित्रकाराला आपण उत्तर देऊन दुखावणे माझ्या तत्वात बसत नाही. पण विषय ‘चिन्ह’च्या ऑनलाईन गॅलरीचा असल्याने काही खुलासे करणे गरजेचे आहे. मुळात इतर गॅलरीज जे करतात तसा हा प्रकल्प मुळीच नाही. नीट विचार करून याची आखणी केली गेली आहे. ‘चिन्ह’चा वाचकवर्ग जगभर पसरला आहे. अनेक देशातून लोक ‘चिन्ह आर्ट न्यूज’ हे पोर्टल नियमितपणे वाचत असतात. त्यामध्ये अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया अशा वेगवेगळ्या देशातील लोक वेबसाईटला नियमित भेट देतात. गूगल एनालिसिस जे एखाद्या वेबसाईटवर किती वाचक येतात याची नोंद ठेवते त्यावर तपासले असता ‘चिन्ह आर्ट न्यूज’ या वेबसाईटला सध्या एका आठवड्यात १५ हजार वाचक भेट देत आहेत असे दिसून येते. तर आठवड्याभरात एक वाचक वीस मिनिटे एवढा वेळ वेबसाईटवर मुशाफिरी करत असतो.
लक्षात घ्या ‘चिन्ह’ हे आर्ट न्यूज पोर्टल आहे. यावर फक्त दृश्यकला संबंधी विषयांची चर्चा होते. या विषयाला लोक किती महत्व देतात हे आपण सर्व जाणतो. काळ असा आहे की वाचक बॉलिवूड, राजकारण यावरच्या भिकार खबरा चवीने वाचतात. मात्र तेच वाचक चित्रकलाविषयक मजकूर असेल तर वाचण्याची तसदी न घेता पुढे निघून जातात. अशा काळात ‘चिन्ह’ला मिळणार हा वाचन प्रतिसाद आश्चर्यकारक आहे. ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक आणि आमची टीम यांचे सातत्याचे प्रयत्न यामागे आहेत. फेसबुक या यत्र, तत्र, सर्वत्र पोहोचलेल्या सोशल मीडिया साईटवर एका आठवड्यात युझर सुमारे ३३ तास वेळ देतो. फेसबुकचा जगभरचा आवाका आणि ‘चिन्ह’चा मर्यादित आवाका याची तुलना होऊ शकत नाही पण जो वेळ वाचक ‘चिन्ह’ वेबसाईटला देतो तो खूप महत्वाचा आहे. इंटरनेटच्या जंजाळावर करोडोंमध्ये असलेल्या कन्टेन्ट वेबसाईटमधून वाचकाला आपल्या पोर्टलवर खेचणं सोपं नाहीये, तेही कुठलाही भिकार मजकूर न देता! ते आम्हाला साध्य होत आहे याचा आम्हाला आनंदच आहे.
हे सर्व आकडे केवळ ‘चिन्ह आर्ट न्यूज’च्या मराठी वेबसाईटचे आहेत. ‘चिन्ह’ची इंग्रजी आवृत्ती अजून पूर्ण स्वरूपात यायची आहे. आत्ताच आम्ही जे इंग्रजी लेख देतो त्यांना मिळणारा प्रतिसाद खूप चांगला आहे. ‘चिन्ह’चे दर्जेदार लेख सुंदरम टागोर आर्ट गॅलरीसारख्या महत्वाच्या व्यासपीठावरून शेअर होत आहेत. जगभरातले अमराठी वाचक ‘चिन्ह’शी जोडले जात आहेत. ‘चिन्ह’च्या इंग्रजी व्हाट्सअप अपडेट ग्रुपला जगभरातील कला रसिक जोडले जात आहेत. यावरून ‘चिन्ह’चा आवाका वाचकांच्या लक्षात यावा.
हे माझं उत्तर केवळ त्या ज्येष्ठ चित्रकाराला नाही तर तमाम चित्रकला क्षेत्रातील वाचकांना आहे. जे ‘चिन्ह’च्या उपक्रमांना नाक मुरडतात. खरं तर त्यांनाही ‘चिन्ह’च्या व्यासपीठावर आपल्याला स्थान मिळावे अशी सुप्त इच्छा असते. ‘चिन्ह’बद्दल आज गॉसिप करणारे अनेक जण ‘चिन्ह’च्या अंकात लिहिता यावं म्हणून धडपड करणारे होते. अर्थात ही तक्रार नाही तर एक उत्तर आहे. ट्रकच्या मागे एक ओळ असते ना “जलो मत बराबरी करो” असंच उत्तर मी गॉसिप करणाऱ्यांना देईन.
राहिला प्रश्न ऑनलाईन आर्ट गॅलरीचा तर ही गॅलरी कलाकारांना जगभरातील व्यासपीठ मिळावे म्हणून सुरु करण्यात आली आहे. रुपाली ठोंबरे यांच्या पहिल्या प्रदर्शनाला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्याचेही एनालिसिस आम्हाला वाटलं तर आम्ही जरूर जाहीर करू. ‘चिन्ह’ची ऑनलाईन गॅलरी जरी सशुल्क असली तरी अपवादात्मक परिस्थितीत काही कलाकारांना ती मोफतही उपलब्ध असेल. ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी अनेक चित्रकारांना मदत केली आहेच तेही परतफेडीची कुठलीही अपेक्षा न ठेवता. गॉसिप करणाऱ्या अनेकांना त्यांनी संधीही दिली आहे. त्यामुळे चित्रकला क्षेत्राच्या भल्यासाठी काम करणे सुरूच राहील. शेवटी गॉसिप करणाऱ्यासाठी एक शेर अर्ज करून थांबते ….
जलते रहो तुम
हम पर आंच तक ना आएगी
तुम खाक हो जाओगे
हम पर राख तक ना आयेगी.
******
– कनक वाईकर,
चिन्ह आर्ट न्यूज
‘चिन्ह ऑनलाईन आर्ट गॅलरी’मधील लेटेस्ट प्रदर्शन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
DOT TO DOT
Related
Please login to join discussion