No products in the cart.
अक्षरमुद्रा मध्ये रिल्केच्या पत्रांचं रसग्रहण
२००४ साली ग्रंथाली प्रकाशनाने ‘रिल्केची दहा पत्रे’ हा अनिल कुसूरकरांनी केलेला भावानुवाद प्रकाशित केला होता. यंदाच्या अक्षरमुद्रा दिवाळी अंकात हनुमान व्हरमुले यांनी या पुस्तकाचं केलेलं सुंदर आणि नेमकं विश्लेषण प्रकाशित केलं आहे. रिल्के हा जर्मन भाषेतील कवी. रिल्केची कविता ही काहीशी दुर्बोध अंगाने जाणारी असली तरी रिल्केची पत्रे मात्र अतिशय सुस्पष्ट आणि नेमक्या शब्दात लिहिलेली आहेत. रिल्केचा मित्र कप्पूस याला रिल्केने दीर्घ पत्रे लिहिली होती. या पत्रांमध्ये कला म्हणजे काय, कलासाधना कशी करावी, एकूणच जीवनाचा आनंद कसा घ्यावा याबद्दल विवेचन केले आहे. रिल्केने पत्रे त्या काळात लिहिली जेव्हा ती पत्रे वाचणाऱ्यापर्यंत पोहोचतील की नाही याची शाश्वती नव्हती. त्यामुळे ती दीर्घ आहेत. ही पत्रे लिहिली तेव्हा रिल्केलाही माहित नसणार की ती कप्पूसशिवाय इतरही वाचक वाचतील.
चित्रकार किंवा कलेची साधना करणाऱ्या कुठल्याही व्यक्तींसाठी रिल्केची पत्रे दीपस्तंभ ठरू शकतात. रिल्केच्या मते कला निर्मिती ही जगामध्ये आपले स्थान प्रस्थापित करण्यासाठी करत असाल तर ती निर्मिती पोकळ आणि ढोंगी ठरेल. अशा प्रकारच्या कामात मूलभूत आणि विलक्षण दैवी अनुभव देण्याची क्षमता कधीच नसेल. कलेची निर्मिती ही फक्त आपल्या आतल्या आवाजाची हाक ऐकून व्हावी. कलाकार जर अंतर्मुख झाला तरच तो अभूतपूर्व अशी निर्मिती करेल. इतर सर्व प्रयोग हे कारागिरी ठरतील. रिल्केचा सर्वात महत्वाचा विचार म्हणजे टीका, समीक्षेपेक्षा कला आस्वाद महत्वाचा. कलाकाराला नेहमीच निसर्गाच्या निकट जात आलं पाहिजे. निसर्ग जर त्याच्या कलेची प्रेरणा असेल तर निर्मिती सहज घडेल. या प्रवासात जर आपल्याकडून मूलभूत अशी निर्मिती होत नाही हे व्यक्तीच्या लक्षात आलं तर त्याने या सगळ्यापासून दूर जाऊन दुसरं काहीतरी केलं पाहिजे. या सगळ्या लेखात रिल्केच्या प्रत्येक पत्राबद्दल थोडक्यात विवेचन केले असले तरी चित्रकारांसाठी हाच महत्वाचा भाग आहे.
‘रिल्केची दहा पत्रे’ हे छोटेखानी पुस्तक आहे, ते मिळवून वाचणे गरजेचे आहे.(मीही ते आता मिळवून वाचणार आहे.) पण जे पुस्तक वाचू शकत नाहीत, त्यांनी या लेखातून रिल्केच्या विचारांचा संदर्भ घ्यावा.
अनेक दिवाळी अंक हे लेखकांच्या शोधात पुणे मुंबई या परिघातच फिरत असतात. पण अक्षरमुद्रा दिवाळी अंकाने हनुमान व्हरमुले या नवीन लेखकाला संधी दिल्याबद्दल प्रकाशनाचे आभार.
*****
Related
Please login to join discussion