No products in the cart.
अपर्णा देशपांडे यांचे चित्र प्रदर्शन
चित्रकार अपर्णा देशपांडे यांच्या ‘मेलडीज ऑफ नेचर’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी इथे २० ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. अपर्णा देशपांडे यांचे कलाशिक्षण एल. एस. रहेजा कॉलेज ऑफ इंटिरिअर डिझाईन व डेकोरेशन, मुंबई येथे झाले. शालेय जीवनापासून त्यांना असणारी चित्रकलेची आवड व त्यातील दृश्यकलेची विविध रूपे साकारण्याची इच्छा यामुळे त्यांनी या क्षेत्रात रीतसर अभ्यासक्रम पूर्ण करून आपले ध्येय निश्चित केले आणि आपला कलाप्रवास सुरु केला.
कारकिर्दीच्या सुरुवातीस, निसर्गाची विविध ऋतूतील विलोभनीय रूपे व त्यातील सौंदर्य यांचा कलात्मक मेळ साधून त्यांनी चित्रे काढली. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे, आर्ट गॅलरी,कॅम्प, पुणे, गोवा कला अकादमी पणजी, जहांगीर आर्ट गॅलरी , मुंबई, AIFACS नवी दिल्ली, ई-स्केअर पुणे, कमलनयन बजाज आर्ट गॅलरी , मुंबई, साईन कम्युनिटी BDA लंडन, महाराष्ट्र मंडळ लंडन, भारतीय विद्या भवनची MP बिर्ला मिलेनियम आर्ट गॅलरी, लंडन, या ठिकाणी अपर्णा यांनी चित्रे प्रदर्शित केली आहेत.
प्रस्तुत प्रदर्शनातील चित्रे अमूर्त शैलीचा वापर करून साकारलेली आहेत. या चित्रांमध्ये निसर्ग, त्याची मनोहर रूपे, भावना आणि दैवी संकल्पना यांचा मनोरम समन्वय साधला आहे. निसर्गाची विविध रूपे व आकार तसेच प्रसंगी आवश्यक असणाऱ्या प्रतिकात्मक संकल्पना यांचा तंत्रशुद्ध शैलीत समन्वय साधून त्यात मानवी आकार, अनुरूप संकल्पना आणि तत्सम आशय ह्यांचे कलात्मक दर्शन घडते. त्यातील विविध संकल्पना व अनुभूती विलक्षण तसेच कौतुकास्पद आहेत. पुरेसा बोलका व कलात्मक असा हा कलाविष्कार सर्वांशी आपल्या वैशिट्यांमुळे सुसंवाद साधतो व आपल्या वेगळेपणामुळे त्यांची प्रशंसा व दाद मिळवतो.
हे प्रदर्शन सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहील. कला रसिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन अपर्णा देशपांडे यांनी केले आहे.
Related
Please login to join discussion