No products in the cart.
दत्तात्रय फडके यांचे प्रदर्शन
चित्रकार व डॉक्टर दत्तात्रय फडके यांचे ‘कलरफेस्ट’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे दि २७ डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात त्यांनी कलात्मक शैलीत तयार केलेली विविध फॅब्रिक्स मधील आकर्षक व मनोवेधक चित्रे प्रदर्शित करण्यात अली आहेत. डॉ. दत्तात्रय फडके हे पुणे येथील डॉक्टर असून हिस्टोपॅथोलॉजिस्ट म्हणून बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते स्वयंशिक्षित चित्रकार असून त्यांना फॅब्रिक्स, त्यांचे विविध पोत व रंग, यांचे आकर्षण आहे. बरेच वर्षे ते अमेरिका, इंग्लड येथे स्थायिक होते. त्या दरम्यान त्यांनी साधारणपणे गेल्या १० वर्षांपासून मिशिगन व पेनसिल्वानिया येथील कलादालनातून आपली चित्ररुपे एकल व सामूहिक कला प्रदर्शनात प्रदर्शित केली आहेत.
प्रस्तुत प्रदर्शनातील त्यांची चित्रे ही वेगळ्या शैलीतील आहेत. कापडाचे वेगवेगळ्या आकारांचे व रंगांचे आकर्षक असे अनेक तुकडे हव्या त्या संरचनेतून संकल्पित करून त्यातून वेगवेगळे आकार, निसर्गचित्रे, स्थिर वस्तू आकार आणि अपेक्षित दृष्यपरिणाम त्यांनी कॅनव्हासवर साकारले आहेत. ते तुकडे कलात्मकरीतीने एकत्र जुळवून त्यांना चिकटवून व त्यांची आकर्षक मांडणी साधून त्यास चित्ररचना करावयाची आणि ते विविधलक्षी दृष्यपरिणाम रसिकजनांपुढे सादर करायचा हा त्यांच्या चित्रशैलीचा महत्वपूर्ण घटक आहे. त्यांनी अशा तऱ्हेने निर्मिलेली मूर्त व अमूर्त शैलीतील नानाविध कलारूपे त्यांच्या अद्भुतरम्य कल्पनाशक्तीचे व आकर्षक चित्रशैलीचे द्योतक आहेत.
****
Related
Please login to join discussion