No products in the cart.
गीता खंडेलवाल यांचे प्रदर्शन…
पुण्याच्या झपुर्झा येथे गीता खंडेलवाल यांचे ‘झिनी झिनी’ हे क्विल्ट कलाकृतींचे प्रदर्शन दि १८ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे संयोजक चित्रकार राजू सुतार आहेत. गीता खंडेलवाल या १९७० पासून क्विल्ट माध्यमात आपल्या कलाकृती तयार करतात. त्यांनी क्विल्टची सुरुवात ही आपल्या शालेय जीवनातच शिवणकामाच्या छंदापासून केली. नंतर त्यांचा युरोप आणि अमेरिकेत क्विल्ट पुरवण्याचा व्यवसाय होता. २०१० पासून त्या पूर्णवेळ कलाकार म्हणून क्विल्ट माध्यमात आपल्या कलाकृती तयार करत आहेत.
महाराष्ट्रातील गोधडी बनवण्याच्या परंपरेवर त्यांनी ‘गोधडीज ऑफ महाराष्ट्र, वेस्टर्न इंडिया’ हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. सध्या त्या लहान आकारातील कापडी बाहुल्यांच्या प्रकल्पावर काम करत आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भारतातील महाराजांवर ५५ कापडी बाहुल्या तयार केल्या होत्या. त्यांचे प्रदर्शन भाऊ दाजी लाड म्युझियममध्ये आयोजित करण्यात आले होते.
खंडेलवाल यांच्या बहुतांश कलाकृतीमध्ये रिसायकल केलेल्या कपड्याचा वापर केला जातो. खंडेलवाल यांच्या मते क्विल्ट कलाकृती तयार करताना रंग, पोत, आकार यासारख्या गोष्टींचा विचार करावा लागतो. अनेकदा कुठलीही रचनात्मक बांधणी करता करता कापडाचे तुकडे जोडायला सुरुवात होते आणि पॅटर्न तयार होत जातो. असे करताना रंगांचा समतोल साधाला जावा म्हणून छोट्या तुकड्यांचा तात्कालिक वापर केला जातो आणि एक सुंदर कलाकृती तयार होते.
प्रस्तुत प्रदर्शनातील मुंबई शहर नकाशा, क्विल्ट ऍबस्ट्रॅक्ट या उल्लेखनीय कलाकृती आहेत. या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत आहे. प्रदर्शन सोमवारी बंद असेल याची नोंद घ्यावी.
******
Related
Please login to join discussion