No products in the cart.
प्रकाश आंबेगावकर जहांगीरमध्ये…
आर्किटेक्ट आणि चित्रकार प्रकाश आंबेगावकर यांचे ‘अर्मोनिया’ हे चित्र प्रदर्शन दि २८ फेब्रुवारी ते ५ मार्च २०२३ दरम्यान जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते यांच्या हस्ते दि २८ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता होईल. प्रमुख पाहुणे म्हणून आर्किटेक्ट चंद्रशेखर कानेटकर, लेखक साईकत बक्षी हे उपस्थित राहतील.
प्रकाश आंबेगावकर हे गेली 40 वर्षे आर्किटेक्ट म्हणून अमेरिकेत काम करत होते. निवृत्तीनंतर ते बडोद्यात स्थायिक झाले. चित्रकलेच्या आवडीमुळे त्यांनी व्यवसाय करत असतानाच चित्रकलेला वाहून घेतले. सध्या ते पूर्णवेळ चित्र काढतात.
त्यांच्या चित्रात, त्यांच्या चेहरा वेगवेगळ्या आत्मविश्वासाने दडलेला दिसतो. त्यांच्या भोवतीचे सधन वलय, सजगता आणि मनाची श्रीमंती या गोष्टी चित्रातून दिसतात. त्याचबरोबर त्यांच्या सर्व चित्रातून त्यांनी अमेरिकेमध्ये जे काही वास्तव्य केले होते, जो व्यवसाय केला होता त्याचे त्यांच्या आयुष्यावर, वर्तनावर पडलेले परिणाम हेही आपल्याला ओळखता येतात.
आंबेगावकर चित्रातून स्वतःला त्रयस्थ नजरेने पाहतात. आर्किटेक्ट म्हणून व्यवसाय करताना जो काटेकोरपणा अंगी बाणवावा लागतो तोच काटेकोरपणा, शिस्त आंबेगावकरांच्या चित्रकृतीतूनही दिसून येते. कामांमधली निपुणता, काटेकोरपणा आणि रंगांची समृद्धी ही त्यांनी चित्राद्वारे आपल्यासमोर फार मेहनतीने उभी केली आहे हेही लक्षात येते. त्यांच्या चित्रातून रंगांची श्रीमंती ( Color wealth) आपल्याशी वेगवेगळ्या पद्धतीने बोलते. त्यांच्या चित्रांच्या विषयात त्यांची जीवन पद्धती आणि त्यातून आलेले विचार यांची समृद्धी जाणवते. त्यांच्या चित्रातील आजूबाजूचा परिसरसुद्धा आपल्याला आनंद आणि उत्साह देऊन जातो.
‘अर्मोनिया’ या प्रस्तुत प्रदर्शनात आंबेगावकरांनी मनुष्य स्वभाव, त्याचे वरवरचे वागणे आणि त्याचे समाजाशी असलेले नाते अशा विषयांचे विवेचन करणाऱ्या चित्रकृती आपल्यासमोर मांडल्या आहेत.
प्रदर्शनाची वेळ ही सकाळी 11 ते संध्याकाळी 7 आहे.
*****
Related
Please login to join discussion