No products in the cart.
सचिन सगरे यांचे प्रदर्शन
चित्रकार सचिन सगरे यांचे ‘द मिस्टरी कल्ट’ हे चित्र प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे दि ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. सचिन सगरे यांचे हे एकोणिसावे एकल चित्रप्रदर्शन असून त्यांनी आतापर्यंत ३६ समुह प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. तसेच त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला आहे. प्रस्तुत प्रदर्शनातील चित्रे ही त्यांच्या नेहमीच्या सादरीकरणापेक्षा वेगळी असून त्यात ग्रामीण जीवनातील संकल्पनात्मक कलात्मकता, संरचनेतील वैविध्य आणि रंगलेपनातून साकारलेले स्त्रीच्या भाव विश्वातील नानाविध पैलू आहेत. भावपूर्ण अशा मंदिर परिसरातील नेहमी आढळणाऱ्या स्त्रिया, एका अस्पष्ट पण धुसर अशा तऱ्हेच्या वातावरणात दर्शविताना त्यांच्या डोक्यावरील फुलांचे गजरे, हातातील पूजेचे तबक, गंधयुक्त फुले, दीप अशा भावपूर्ण मुद्रा दर्शवितात. सचिन सगरे यांनी पांढरा, लाल, पिवळा, हिरवा, निळा, करडा, गुलाबी, केशरी रंगछटांचा कलात्मक समन्वय साधला आहे. तसेच त्यांच्यामागे त्यांनी मंदिरातील पार्श्वभूमीचे साकारलेले दर्शन कलात्मक आहे. तीन किंवा पाच स्त्रियांचे समूह दाखविताना चित्रकाराने त्यांच्या वैविध्यपूर्ण भावनांचा समन्वय साधून त्याद्वारे एकात्मता साकारली आहे. तसेच त्यांच्या शृंगारिक व तत्सम भावमुद्रांचे सादरीकरण करताना चित्रकाराने एक विशिष्ट मर्यादा पाळली आहे आणि त्यात भडकपणा येऊ न देता कलात्मकी समतोल साधला आहे.
****
Related
Please login to join discussion