No products in the cart.
जहांगीरमध्ये सीमा भार्गव !
दिल्ली कला महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी सीमा भार्गव यांच्या ‘ ए सोलफूल व्हॉयेज: मेल्डिंग मेमरीज विथ व्हिजन्स’ हे चित्र प्रदर्शन, 23 ते 29 मे 2023 दरम्यान मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन पश्चिम नौदल कमांडच्या व्हाईस एडमिरल श्री त्रिपाठी यांच्या पत्नी श्रीमती शशी त्रिपाठी (C इन C ) यांच्या हस्ते होईल.
तंत्रशुद्ध काम आणि तपशील हे सीमा भार्गव यांच्या चित्रांचं वैशिष्टय आहे. सीमा या प्रामुख्याने तैलरंगात काम करतात. लडाख, हिमाचल प्रदेश तेथील निसर्ग सौन्दर्य आणि अध्यात्मिक अनुभूतीसाठी प्रसिद्ध आहेत. प्रस्तुत प्रदर्शनात सीमा यांनी लडाख आणि हिमाचल प्रदेशातील निसर्ग आणि जीवनपद्धती यातून प्रेरणा घेऊन चित्रं तयार केली आहेत. चित्रांच्या मोठ्या आकारामुळे रसिकांना निसर्गातील सौन्दर्याचा दृश्य अनुभव घेता येतो.
त्यांच्या चित्रातील पर्स्पेक्टिव्हचं योग्य भान चित्रांना अधिक आकर्षक करते. रंगछटा, रूपे, पोत यांची समृद्ध टेपेस्ट्री विणून सीमा भार्गव कॅनव्हासवर या परिसरातील रम्य आठवणींना उजाळा देतात. ज्या प्रमाणे साधू मठात डोके टेकवून आपला आदर व्यक्त करतो त्याच प्रमाणे ही चित्रे रसिकांच्या मनात या परिसरातील समृद्ध निसर्गाबद्दल आदर निर्माण करतात. रंग, कुंचला आणि भावनांच्या साहाय्याने तयार केलेली ही चित्रे केवळ डोळ्यांनी न बघता अंतर्मनातून पाहावीत असे आवाहन चित्रकार सीमा भार्गव यांनी केले आहे.
हे प्रदर्शन रसिकांसाठी सकाळी 11:00 ते संध्याकाळी 7:00 पर्यंत खुले आहे.
Related
Please login to join discussion