No products in the cart.
नेहरु सेंटरमध्ये सुनील व स्वाती काळे
पाचगणी येथील चित्रकार सुनील काळे आणि स्वाती काळे यांचे ‘व्हॅली अँड फ्लॉवर्स’ हे चित्र प्रदर्शन दि २४ ते ३० जानेवारी दरम्यान नेहरु सेंटरच्या कला दालनात आयोजित करण्यात आले आहे. दि २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन आय.डी. बी आय बँकेचे निवृत्त जनरल मॅनेजर श्री. यु .एम .काळे यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत होणार आहे.
पाचगणी, महाबळेश्वर ही महाराष्ट्राची प्रसिध्द थंड हवेची ठिकाणे व पर्यटन स्थळे सर्वांच्या परिचयाची आहेत. गेली तीस पस्तीस वर्षे ‘पाचगणीतील सौन्दर्य’ या विषयाचा सखोल अभ्यास करून या परिसराला नवनवीन पद्धतीने चित्ररुपात साकारणाऱ्या निसर्ग चित्रकार सुनील काळे व स्वाती काळे यांच्या चित्रांची प्रदर्शने मुंबईकरांनी यापूर्वी पाहिलेली आहेतच. पण या नवीन प्रदर्शनाच्या निमित्ताने पुन्हा पाचगणीचा सुंदर निसर्ग कॅनव्हासवर बघण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
या प्रदर्शनात स्वाती आणि सुनील काळे यांच्या दोनशे कलाकृती समाविष्ट आहेत. या प्रदर्शनात सुनील काळे यांनी पॅनोरामा आकारातील सिडने पॉईंट , केटस पॉईंट , पारसी पाईंट , ऑर्थरसीट पाँईट , टेबललॅन्डच्या पठारावरून दिसणारे कृष्णा नदीचे दृश्य, वाईच्या धोम जलाशयाची वेगवेगळ्या ठिकाणांहून दिसणारी सुंदर चित्रे जलरंगात सादर केलेली आहेत. तर स्वाती काळे यांनी या परिसरातील वनश्री , वनसंपदा , जास्वंद, कॉसमॉस , हॉलीऑक्स , सूर्यफुले व कमळफुले यांची सुंदर चित्रे मोठ्या आकारात तैलरंगात नाईफचा वापर करून साकार केलेली आहेत.
मुंबईत राहून पाचगणी महाबळेश्वरच्या परिसराचा दृश्यअनुभव घेण्याची संधी रसिकानां मिळणार आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन चित्र रसिकांनी ही संधी साधावी व कलाकारांच्या कलाकृतींचा मनसोक्त आस्वाद व आनंद घ्यावा असे आवाहन सुनील आणि स्वाती काळे यांनी केले आहे.
स्थळ : नेहरू सेंटर आर्ट गॅलरी . डॉ. ऍनी बेझंट रोड , वरळी . मुंबई .
वेळ : सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंत .
दि. २४ ते ३० जानेवारी २०२३
Related
Please login to join discussion