No products in the cart.
वैभव नाईक यांचे ‘ख्याल’ प्रदर्शन
चित्रकार वैभव नाईक यांचे ‘ख्याल’ हे चित्र प्रदर्शन दि २० ते २६ मार्च २०२३ दरम्यान कमलनयन बजाज कलादालन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन २० मार्च २०२३ रोजी बजाज कलादालनात दुपारी ४ वाजता प्रमुख अतिथी, गझल नवाझ भीमराव पांचाळे व ज्येष्ठ चित्रकार विजय आचरेकर यांच्या हस्ते झाले.
प्रस्तुत प्रदर्शनातील वैभव नाईक यांची चित्रे प्रामुख्याने भावनात्मक, व मनोविश्लेषणात्मक अशी आहेत. संवेदनशील तरुण स्त्रीच्या व भावोत्कट तरुणांच्या मनातील विविध भावविकारांचे प्रकटीकरण करतांना त्यांनी चारकोल, ग्रॅफाइट, ऍक्रिलिक रंग, पांढरे खडू, पेस्टल वगैरे माध्यमांचा कलात्मक वापर केला आहे. आपल्या स्वतंत्र शैलीचा त्यांनी वापर केला असून तीव्र निरीक्षण, आकलन, वास्तवातील अनेक अनुभव व दृश्यमानता, तसेच अनेक प्रसंगात अंतर्मनात आढळणारी भावनिक आंदोलने यांचा उत्तम समन्वय त्यांनी साधला आहे. प्रेम, वात्सल्य, उत्सुकता, निरागसता, उत्साह, माया, कुतूहल, उदासीनता व अपेक्षा अशा तऱ्हेच्या अनेक भावनांचे यथार्थ दर्शन त्यांनी आपल्या चित्रमाध्यमातून आपल्या शैलीत साकारले आहे. विविध वातावरणातील हे उत्कट व उत्स्फूर्त भावनिक सादरीकरण कौतुकास्पद आहे. त्यांनी काढलेल्या व प्रदर्शित केलेल्या विविध चित्रांमध्ये हे प्रकर्षांने जाणवते. त्यांच्या चित्रांची शीर्षके ही ‘ शाम, काली काली आँखे, एहसास, ही वाट दूर जाते, मानसी, सलते काही बोच मनी, गम का साया, अशा प्रकारे नाविन्यपूर्ण आणि विषयाला न्याय देणारी आहेत.
प्रस्तुत प्रदर्शन हे सकाळी ११ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत रसिकांना बघण्यासाठी खुले राहील.
****
Related
Please login to join discussion