No products in the cart.
‘गायतोंडे’ ग्रंथ आता इंग्रजीतही !
१९७० च्या दशकात जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेताना भिंतीवर लावलेलं चित्रकार गायतोंडे यांचं पेंटिंग पाहून प्रथमदर्शनीच मी अतिशय भारावून गेलो. किंबहुना त्यांच्या प्रेमातच पडलो. तिथून तो जो काही प्रवास सुरु झाला तो प्रवास आजतागायत म्हणजे ४८ वर्ष तसाच चालू आहे. गायतोंडें यांच्या त्या पेंटिंगचा प्रभाव माझ्यावर एवढा पडला होता की त्या दिवसापासून मी देखील गायतोंडे यांच्या सारखीच देवनागरीत सही करू लागलो.
तिथूनच शोध सुरु झाला तो गायतोंडे यांच्या चित्रांचा आणि व्यक्तिमत्वाचा. आज कॉम्प्युटरचं किंवा हातातल्या मोबाईल फोनचं एक बटन दाबलं का तुमच्यावर माहितीचा अक्षरशः भडीमार होतो. तो काळ वेगळा होता. कॉम्प्युटर आपल्याकडे यायचा होता. साहजिकच माहिती मिळवायला लागायची ती वृत्तपत्र, नियतकालिकं किंवा पुस्तकांमधूनच. कॅटलॉग वगैरे तेव्हा तर फारच दुर्मिळ होते. त्यामुळे एकेका संदर्भासाठी प्रचंड पायपीट करायला लागायची.
साहजिकच कुणाही कलावंतांचा शोध घेताना प्रचंड मर्यादा जाणवायच्या. आणि गायतोंडेंसारखा आपल्याच मस्तीत जगणारा कलावंत असेल तर भयंकरच पंचाईत व्हायची. पण त्यांच्या त्या जेजेच्या भिंतीवरच्या चित्रांनी मला इतकं संमोहित केलं होतं की गायतोंडे यांचा शोध घेण्याचा मी चंगच बांधला.
तब्बल ४८ वर्ष झाली या साऱ्याला. पण या इतक्या मोठ्या काळात मी गायतोंडे यांच्या संदर्भात प्रसिद्ध झालेलं प्रत्येक कात्रण जमवलं. त्यात त्यांच्या चित्रप्रदर्शनांची समीक्षणं होती, त्यांच्या मोजक्याच मुलाखती होत्या, त्यांच्या वरचे विविध कलासमीक्षकांनी लिहिलेले लेख देखील होते. हा सारा ऐवज जेमतेम पन्नास – साठ कात्रणांचा होता. (याच्या उलट चित्रकार हुसैन यांच्यावरील कात्रणांची संख्या तब्बल अडीच हजारापेक्षा अधिक भरत होती) ही सारी कात्रणं मी मित्र मंडळींना देखील शेअर करीत होतो. असाच एक कात्रणांचा सेट माझा पॅरिस निवासी मित्र सुनील काळदाते याला एका मित्रानं दिला. त्या कात्रणांचा वापर करुन त्यानं गायतोंडे यांच्या वरची २६ मिनिटाची एक अप्रतिम फिल्म तयार केली जी कलावर्तुळात प्रचंड गाजली. इतकी की नंतर ग्युगेनहॅम म्युझियमने न्यूयार्क आणि इटलीमध्ये झालेल्या गायतोंडे यांच्या सिंहावलोकन प्रदर्शनाची सुरुवात याच फिल्मच्या प्रदर्शनानं आणि सुनील काळदाते याच्या जाहीर मुलाखतीनं केली.
याच कात्रणांच्या साहाय्यानं मी २००१ साली आणि २००७ साली ‘चिन्ह’ या वार्षिकाची ‘गायतोंडे’ विशेष पुरवणी प्रसिद्ध केली. तर २००६ साली ‘चिन्ह’चा एक ‘गायतोंडेच्या शोधात’ हा अंक प्रसिद्ध केला. या तिन्ही अंकाचं केवळ मराठी भाषिकांनीच नव्हे तर अन्य भाषिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं.
गायतोंडे यांच्या संदर्भातली सर्वच संदर्भ साधने उपलब्ध करून दिल्यानंतर तरी कुणीतरी गॅलरी किंवा कुणीतरी प्रकाशन संस्था पुढं येतील आणि गायतोंडे यांच्या वरचे सुंदर ग्रंथ प्रकाशित करतील असं मला वाटलं होतं. पण दुर्देवानं तसं घडलं नाही. अखेरीस २०१६ साली अतिशय प्रयत्नपूर्वक मलाच ‘गायतोंडे’ ग्रंथ प्रकाशित करावा लागला. एक उचलेगिरीचा अश्लाघ्य प्रयत्न झाला. पण तो अल्पजीवीच ठरला. किंबहुना ज्यांनी तो प्रयत्न केला ते त्या प्रयत्नात बदनामच झाले.
आज २०२३ साल चालू आहे. पुढलं वर्ष हे गायतोंडे जन्मशताब्दीचं असणार आहे. अशा वेळी त्यांच्यावर इंग्रजीतून ग्रंथ प्रसिद्ध झाला तर ? असा विचार मनात आला आणि ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या कामाला सुरुवात झाली. ‘चिन्ह’ने प्रसिद्ध केलेल्या मूळ मराठी ‘गायतोंडे’ ग्रंथाचाच हा इंग्रजी अवतार असणार आहे. ०२ नोव्हेंबर २०२३ रोजी म्हणजेच त्यांच्या शंभराव्या जन्मदिनी हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे. एक खूप मोठी टीम या प्रकल्पासाठी काम करते आहे. आणि म्हणूनच त्या संदर्भातले सर्वच अपडेट्स आम्ही इथं वरचेवर देणार आहोत. गायतोंडें यांच्या चित्राची लिलावातली किंमत आता ४८ कोटीच्या घरात पोहोचली आहे. हे सारं वाचून तुम्हाला जर चित्रकार गायतोंडे यांच्या संदर्भात अधिक उत्सुकता वाटू लागली आणि त्यांच्या विषयी जाणून घ्यायला पाहिजे असं वाटू लागलं तर आम्हाला अवश्य फॉलो करा.
हे सारं वाचल्यानंतर मूळ मराठी ‘गायतोंडे’ ग्रंथ वाचण्याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाल्यास नवल नाही. अशा मंडळींनी कृपया फेसबुकवरच्या आमच्या ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या पेजला भेट द्यावी. ‘गायतोंडे’ ग्रंथाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यापासूनच्या सर्वच पोस्ट तिथं वाचावयास मिळतील. आणि त्या वाचून कदाचित हा ग्रंथ विकत घ्यावा असं वाटू लागेल अशा मंडळींनी कृपया ९००४०३४९०३ या आमच्या व्हाट्सअप नंबरवर ‘GAI’ हा मेसेज पाठवून किंमत, सवलत वगैरे माहिती मागवावी. ज्यांना ‘गायतोंडे’ ग्रंथाची जनआवृत्ती हवी असेल त्यांनी कृपया फोटोंमध्ये असलेले माहिती पत्रक वाचावे आणि सवलतीचा फायदा घेऊन ग्रंथ मोफत मागवावा.
******
– सतीश नाईक
संपादक ‘चिन्ह आर्ट न्यूज’
Related
Please login to join discussion