No products in the cart.
औरंगाबाद कॉलेजची दैना, दादा जरा लक्ष घाला ना !!!
महाराष्ट्राचे नवे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जेजे कॉलेजची सोय उत्तम लावली,. ज्याप्रकारे जेजे स्कूल ऑफ आर्ट्ला डिनोव्हो स्टेटस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तो निश्चितच कौतुकास्पद निर्णय आहे.दादांनी हे कार्य तर तडीस न्यावंच, पण महाराष्ट्रात इतरही दोन शासकीय कला महाविद्यालयं आहेत त्यांच्याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे विशेषत: औरंगाबादचे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय.
औरंगाबादच्या शासकीय कला महाविद्यालयाने आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहेत कॉलेजला जवळपास 52 वर्षे पूर्ण झालेली आहेत , पण जसजसे कॉलेजचे वय वाढत आहे तशी तशी दैन्यावस्थाही वाढते आहे.
मराठवाड्याचा कला अनुशेष भरून काढणारे महाविद्यालय असा एकेकाळी दबदबा या महाविद्यालयाचा होता. पण आता मात्र या महाविद्यालयाला कोणी वाली नाही की काय अशी अवस्था दिसून येते. समृद्ध अशी लायब्ररी, उत्तमोत्तम कॅमेरे तसेच इतर कलेसाठी आवश्यक असणारे साहित्य असलेले हे शासकीय कला महाविद्यालय होते. मात्र आज वेळ अशी आली आहे की लायब्ररियन नसल्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून या महाविद्यालयाच्या समृद्ध अशा लायब्ररीला टाळे लागले आहे. तर इतर साहित्याची मोडतोड झाली आहे आणि कितीतरी विभाग हे बंदच असतात.
शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय , औरंगाबाद येथे शिकवण्यासाठी पुरेसे शिक्षक नाहीत हा तर महत्त्वाचा प्रश्न आहेच पण त्याचबरोबर संस्थेच्या डीनवर अनेक आरोप आहेत.
1. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे डीन शासकीय कला महाविद्यालय नागपूर येथून बदलीवर औरंगाबाद येथे आलेत , त्यांच्या तेथिल कारभाराला कंटाळून विद्यार्थी व शिक्षक दोन महिने संपावर गेले होते , मग बदलीवर वडजे यांना औरंगाबादच्या महाविद्यालयाकडे पाठवले गेले . हा औरंगाबादच्या कला महाविद्यालयावर अन्याय नाही का? ज्यांना कोणी नको असेल ते औरंगाबाद महाविद्यालयाला देऊन टाकायचे असा सरकारचा कार्यक्रम आहे का?
2. औरंगाबाद कला महाविद्यालयाचे सध्याचे डीन वडजे यांच्या बद्दल मार्च 2022 मध्ये एका विद्यार्थिनीने लैंगिक छळाची तक्रार केली होती. यावर समिती नेमण्यात आल्या नंतरही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. दिव्य मराठी सारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्राने याची बातमी दिली होती पण पुढे काहीच कारवाई झाली नाही. सरकार या प्रश्नामध्ये लक्ष घालणार नाही का ? कारण हा एक गंभीर मुद्दा आहे. जर विद्यार्थिनी तिथे सुरक्षित नसतील तर आगामी काळात नव्याने येणाऱ्या विद्यार्थिनींचे काय होणार हा प्रश्न त्यांच्या पालकांना नक्कीच सतावेल. ह्या असल्या अत्यंत गलिच्छ प्रकारामुळे शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालय औरंगाबादची भरपूर बदनामी झाली आहे. याला कोणाला तरी जबाबदार धरणार की नाही ?
3. आमच्या सूत्रांकडून अशीही माहिती मिळाली आहे की कॉलेजचे एक जबाबदार प्राध्यापक कॉलेजमध्ये घर करून राहतात तिथे तर इंडक्शन कुकर आणि स्वयंपाकाला लागणारी इतर भांडीकुंडी असतात. एक काळ होता गरीब विद्यार्थी चोरून कॉलेजमध्येच राहत असत कारण त्यांच्याजवळ पैसे नसायचे पण आता कॉलेजच्या प्राध्यापकांना किती पगार असतो हे आपण सगळे जाणतोच तेव्हा अशी कुठली गरिबी कॉलेजच्या प्राध्यापकावर आली आहे ज्यामुळे त्याला ही अशी कॉलेजमध्ये राहायची वेळ यावी ? खाजगी आस्थापनांमध्ये घरभाडे भत्ता दिला जातो तसा सरकारी नोकरांना नसतो का ? जर ही कुजबूज खरी असेल तर हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि प्रशासनाने वेळीच यामध्ये लक्ष घालणे गरजेचे आहे अन्यथा कॉलेजचे गांभीर्यच नष्ट होईल.
म्हणूनच चंद्रकांत दादा आता या सगळ्या मुद्द्यांचा एकदा विचार करा आणि या प्रकरणात जरा लक्ष घाला. केवळ जेजेच नाही तर इतर शासकीय कला महाविद्यालयांनाही तुमच्या आस्थापनांमध्ये कार्यक्षम प्रशासनाची गरज आहे. तेव्हा योग्य ती कार्यवाही करा आणि औरंगाबादच्या या वैभवशाली कला महाविद्यालयाला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून द्या ही विनंती.
****
‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD
‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art
‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag
Related
Please login to join discussion