News

ऑक्सिजन पुरवणारं प्रदर्शन

जयंत भीमसेन जोशी हे एक अवलिया कलाकार आहेत. ते भारतरत्न भीमसेन जोशी यांचे सुपुत्र असूनही त्यांची स्वतःची अशी खणखणीत ओळख पुण्यातील कलाक्षेत्रात आहे. अतिशय तरल संवेदनशील मन आणि आधुनिक जाणिवा असणारा हा साधा सरळ माणूस आहे. त्यांच्या संगतीत राहाणे म्हणजे आपले जग समृद्ध होणे असते. साहित्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्यकला, नाटक, चित्रपट, वास्तुशिल्पकला, छायाचित्रकला आणि संरचना यावर ते मर्मदृष्टी देतात. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्या अनुभवात त्यांना भारतातील या सर्व क्षेत्रातील अनेक उत्तुंग शिखरांचे दर्शन झालेले आहे. त्यातूनच त्यांना कलेचा गाभा आकळला आहे. तो ते रसमय मराठीत ओघवता मांडतात. त्यातही ते अभिनिवेश आणि आवेश विरहीत मोकळेपणाने ते तो तुम्हाला उलगडून दाखवतात हा मोठा गुण.

शॉर्ट स्टोरी

त्यांच्या चित्रांचे मूल्यमापन करण्याची माझी पात्रता नाही हे मी जाणतो पण ती चित्रं बघून माझ्या मनावर काय परिणाम होतो ते सांगायचा प्रयत्न करतो. त्यांची चित्र अस्वस्थ करतात. त्यात काही खोल वेदना आणि गहनता जाणवते. आपल्याला ती अंतर्मुख करतात, गंभीर बनवतात आणि मनात खोल डोकावून पाहायला लावतात. त्यातील एक वैशिष्ट्य असे वाटते की ती चित्र विकण्याच्या हेतूने किंवा प्रदर्शनात दाखवायला मांडलेली किंवा रचलेली किंवा मुद्दाम प्रयोग केलेली किंवा कष्टपूर्वक रचलेली वाटत नाहीत.

ड्रेस रिहर्सल

चित्र ‘दाखवणे’ हा तिथं अट्टाहास नसतो तर पहाणाऱ्याला चित्र ‘दिसणे’ हा स्थायीभाव जाणवतो. त्यांच्या चित्रात संगीतातील अमूर्ततेचे दर्शन होते, प्रदर्शन नव्हे. जयंतरावांच्या या कामात त्यांची माणूस म्हणून कळकळ आणि भवतालाविषयी ममत्व जाणवते. सध्याच्या विघातक गोंगाटी वातावरणात ते स्वतःचा सच्चा सूर रंग, रेषा आणि आकारातून शोधत असताना इथे दिसतात. त्यामुळे नीट पाहणाऱ्याला त्यांची चित्र आतून उसळलेल्या तानेसारखी ऐकू येतात.

व्हिस्पर

तर पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावर रुपाली समोरच्या गल्लीत एलिथ ( ELITH ) गॅलरीत त्यांची काही चित्र मांडली आहेत. ही दिनेश संचेती यांची जागाही भन्नाट आहे. दगडांची अनेक रूपे इथे अतिशय कलात्मकरित्या उभी आहेत. हे विविध पोत दृष्टीला आणि स्पर्शाला वेगळी जाणीव करून देतात. हे विक्री केंद्रही आनंद देते.

अशा जागा वाढत्या बकालपणात ऑक्सिजन पुरवतात. म्हणून इथं अवश्य भेट देऊन जा.

दि २० ऑक्टोबर पासून  चित्रकार जयंत जोशी यांचे चित्र  प्रदर्शन एओलिथ आर्ट गॅलरी, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन दोन महिने रसिकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनात जोशी यांच्या अठरा कलाकृतींचा समावेश आहे.  प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी आठ  आहे. 

प्रदर्शनाचा पत्ता :

एओलिथ आर्ट गॅलरी, नं. 917, सिटी कॅपिटल, सर्वे 18, फर्ग्युसन कॉलेज रोड, 

वैशाली हॉटेलसमोर, शिवाजीनगर, पुणे  411004

****

– अतुल पेठे
२४ ऑक्टोबर २०२२

अबसेन्स ऑफ मिनिंग
फ्रेंड

‘चिन्ह’चे मुख्य संपादक सतीश नाईक यांनी जयंत जोशी यांची मुलाखत ‘गच्चीवरील गप्पा’ या कार्यक्रमात घेतली होती. खालील लिंकवर क्लिक करून आवर्जून बघा.

‘चिन्ह’ चे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/C8eaBiY2CjEIqxFvJWmnUD

‘चिन्ह’ चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/chinha.art

‘चिन्ह’चे टेलिग्राम चॅनल खालील लिंकवर क्लिक करून जॉईन करा
https://t.me/ChinhaMag

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.