No products in the cart.
वसईतील चित्रकार जयंत वसंत पंडित यांचे निधन
वसईतील चित्रकार जयंत वसंत पंडित ( वय ८५ ) यांचे अल्प आजार व वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. तैलचित्र हा त्यांचा आवडता चित्रप्रकार असल्याने त्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. वसईतील तरखड येथे चित्रकार जयंत पंडित राहत होते. पंडित यांनी चित्रकलेत शिक्षण घेतल्यावर शिक्षकी पेशा स्वीकारला. पुढे त्यांनी पोर्ट्रेट, तैलचित्रे आणि कॅलेंडर चित्रे यावर आपले लक्ष केंद्रीत केले होते.
गडकरी रंगायतनमधील तीन रंगकर्मीची तैलचित्रे, वसई परिसरातील २५० पेक्षा अधिक व्यक्तींची पोर्ट्रेट, भाबोळा साईबाबा मंदिर ही त्यांची ठळक कामे आहेत. तसेच सन २००६ मध्ये राजा रवी वर्मा जन्म शताब्दी निमित्ताने ५० चित्रांचे तीन दिवसीय प्रदर्शन त्यांनी भरवले होते. कला अभ्यासकांना त्यांच्या अनेक चित्रांचा प्रबंध लिहिण्यास उपयोग झाला होता. नामांकीत चित्रकार एस.एम. पंडित आणि वसई येथील जागतिक कीर्तीचे चित्रकार रॉबी डिसिल्वा यांचा निकट सहवास त्यांना लाभला होता. वसई विकासिनी संस्थेचे ते कार्यकारिणी सदस्य होते. या संस्थेच्या उभारणीसाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. चित्रकार पंडित यांनी तैलचित्राच्या माध्यमातून भरपूर व्यक्तिचित्रे काढली या तैलचित्रांची निगा कशी राखावी याबाबत त्यांनी उत्तम मार्गदर्शन केल्याचे चित्रकार सुभाष गोंधळे यांनी सांगितले त्यांच्या निधानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नारायण मानकर, चित्रकर सुभाष गोंधळे यांच्यासह वसईकरांनी शोक व्यक्त केला आहे.
Related
Please login to join discussion