No products in the cart.
‘जेजे’ वार्षिक प्रदर्शन पुढं ढकललं…
फेब्रुवारी महिना म्हणजे सोशलचा. जेजे कंपाऊंडमध्ये याच महिन्यात सोशल अर्थात स्नेहसंमेलनं दणक्यात पार पडतात. उद्या पासून म्हणजे २१ फेब्रुवारीपासून ‘जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट’चं ८६ वं वार्षिक प्रदर्शन आणि सोशल आयोजित केलं गेलं आहे. उद्या सायंकाळी ५.३० वा सोशलला सुरुवात होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उदय निरगुडकर हे उपस्थित राहणार आहेत. प्रख्यात कवी अशोक नायगावकर हे या सोशलला सन्माननीय अतिथी म्हणून लाभले आहेत. उद्या सायंकाळी सुरु होणारं हे प्रदर्शन दि. २६ फेब्रुवारीपर्यन्त चालणार आहे. रोज सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० प्रदर्शन पाहण्याची वेळ आहे.
तर तिकडे फाईन आर्टमध्ये मात्र सगळा शुकशुकाटच आहे. कारण तिथलं प्रदर्शन आणि सोशल म्हणे पुढे ढकलण्यात आलं आहे. आता बहुदा ते वार्षिक परीक्षेसोबतच उरकलं जाईल अशी चिन्ह आहेत. असे का घडले ? या संदर्भात चौकशी केल्यावर मिळालेली माहिती चक्रावून टाकणारी होती. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी फाईन आर्टमध्ये झालेला संप. जरी तो आठ दहा दिवसांतच गुंडाळला गेला असला तरी त्यात सहभागी विद्यार्थ्यांचं मनोधेर्य चांगलंच खच्ची झालं.
या संपामुळेच विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडले. पहिला गट होता संप घडवून आणणाऱ्यांचा तर दुसरा गट होता संपाला मनापासून पाठिंबा नसणाऱ्यांचा या विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे की, आपण संप केला खरा पण आपल्याला यातून मिळालं तरी काय ? बहुसंख्य विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या हाती काहीच पडलं नाही आणि कारण नसताना अभ्यासाचे आठ दहा दिवस वाया गेले. इथूनच मतभेदाला सुरुवात झाली आणि ‘कलावेध’ स्पर्धेच्या आयोजनातील भयंकर गोंधळामुळे बहुसंख्य विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अधिष्ठात्यांनी निवडलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना राजीनामा देण्यास भाग पाडलं.
या साऱ्यावर कळस चढवला तो कोरिया बिएनाले प्रदर्शनाने. या प्रदर्शनामुळे तर विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तब्बल तीनपेक्षाही जास्त आठवडे वाया गेले. आधीच शैक्षणिक क्षेत्र उशिरा सुरु झालेले आणि त्यातच या साऱ्या भानगडी त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली असे ही कळते.
आणखीन एक विचित्र कारण या विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून समजले ते असे की, ‘विद्यार्थ्यांना कार्यानुभव मिळावा म्हणून जी शासकीय कामे काही शिक्षक करतात आणि त्यात जे विद्यार्थी कॉलेजच्याच वेळात सहभागी होतात त्यांनी देखील सबमिशन वेळेवर करु शकणार नाही या सबबीखाली वार्षिक प्रदर्शन फेब्रुवारी महिन्यात भरवू नये यासाठी विरोधाची भूमिका घेतली असल्याचे कळते.
एकाच कॅम्पस मधली ही दोन कला महाविद्यालयं. एकीकडे शिस्तबद्ध पद्धतीनं कामकाज चालू आहे तर दुसरीकडे भोंगळ कारभारानं कळस गाठला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या साऱ्या गोंधळाला वृत्तपत्र, वाहिन्या, समाजमाध्यम यावर प्रचंड प्रसिद्धी आणि टीका होऊन देखील कला संचालक मात्र शांत आहेत. कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. आहे ना गंमत ?
******
Related
Please login to join discussion