No products in the cart.
जेजेचा ऐतिहासिक दस्तावेज : ‘जेजे जगी जगले’
आज २ मार्च. ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’चा स्थापना दिवस. हा दिवस दरवर्षी अतिशय उत्सहाने साजरा केला जातो. ज्यांना ज्यांना शक्य आहे ते जेजेचे बहुसंख्य माजी विद्यार्थी या दिवशी हमखास एकमेकांना भेटतात. जेजे स्कूलवर अनेक गंडांतरं आली. अगदी ब्रिटिशांच्या काळापासून. साऱ्यांचाच त्या जागेवर डोळा होता. पण ही सारीच्या सारी गंडांतरं जेजेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी आणि समाजात ज्यांना अत्यंत महत्वाचं स्थान आहे अशांनी अक्षरशः परतवून लावली.
बघता बघता १६६ वर्ष लोटली पण अगदी काल परवापर्यंत ती भीती कायमच होती. आता मात्र ती भीती कायमची दूर झाली आहे. आणि जेजेला भारतातील सर्व श्रेष्ठ ठरू शकेल असा ‘डिनोव्हो’ दर्जा मिळाला आहे. आता मात्र जेजेकडे वाकड्या नजरेनं पाहायची कोणाचीच हिंमत होणार नाही हे निश्चित. या पार्श्वभूमीवरच जेजेमध्ये आजचा कार्यक्रम साजरा होणार आहे. तो साजरा करतांना काही लोकं खूप आनंदित असणार आहेत तर काही अतिशय दुःखी. त्याविषयी नंतरच लिहिणार म्हणतोय.
या निमित्तानं ‘चिन्ह’च्या खूप लांबलेल्या ‘जेजे जगी जगले’ या ग्रंथाविषयी माहिती देणे औचित्यपूर्ण ठरेल.
या ग्रंथाचे काम आता मार्गी लागले आहे. डिझाईनिंग सुरु झाले आहे. मूळ ग्रंथ २०० पानांचाच होता पण आता त्यात तब्बल १०० पानांची भर पडली आहे. प्रकाशना आधीच संपूर्ण आवृत्तीची मागणी नोंदवली गेली असल्यानं किंमतीत वाढ न करता आधी होती त्याच सवलतीत हा ग्रंथ वाचकांना देण्याचं ठरवलं आहे. ( कृपया नव्याने हा ग्रंथ घेऊ इच्छिणाऱ्यांनी मात्र कृपया संपर्क साधू नये ही नम्र विनंती.)
‘जेजे जगी जगले’ या ग्रंथाचं विशेष आकर्षण ठरलेल्या त्याच शीर्षकाच्या सदरात तब्बल ३० आत्मकथनं प्रसिद्ध होणार आहेत. सर्वश्री ऑस्कर पुरस्कार विजेत्या भानू अथैया, वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर, शास्त्रीय गायक दिवंगत पं शरद साठे, ग्रंथसखा – ग्रंथस्नेह वाचक चळवळ चालवणारे शाम जोशी, नृत्यांगना सुचिता भिडे, नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये, सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्टवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण, चित्रपट दिग्दर्शक गिरीश मोहिते, रवी जाधव, महेश लिमये, सेट डिझाइनर नितीन चंद्रकांत देसाई, चित्रपट अभिनेते मनोज जोशी, संदीप कुलकर्णी, रंगमंच अभिनेत्री अमिता खोपकर, सुप्रिया मतकरी, हेमांगी कवी तसेच कवी – लेखक चंद्रशेखर गोखले, साहित्य समीक्षक दीपक घारे या ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ आणि ‘जेजे इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट’ च्या माजी पण आताच्या सेलिब्रिटी विद्यार्थ्यांचा या लेखमालेत समावेश आहे.
या लेखमालेचा आणखीन एक भाग म्हणजे ‘डीन बंगल्यातले दिवस’. या लेखमालेत सदर ऐतिहासिक बंगल्यात वास्तव्य करण्याचं भाग्य लाभलेल्या सुभार्या शंकर पळशीकर, शील बाबुराव सडवेलकर
आणि भारती मंगेश राजाध्यक्ष त्यांची आत्मकथनं प्रसिद्ध होणार आहेत.
या खेरीज तरुण चित्रकार देवदत्त दत्तात्रय पाडेकर याचेही दोन लेख या अंकात प्रसिद्ध होणार आहेत. त्यातल्या एका लेखात त्याने जेजेत शिकतानाच्या आठवणी सांगितल्या आहेत तर दुसऱ्यात जगभर फिरत असताना जेजेची वैशिष्ट्ये, वेगळेपण आणि खासियत कशी सतत जाणवत राहिली या विषयी लिहिले आहे.
तर आशुतोष आपटे या नाटक, लेखन, चित्रपट, डिझाईनिंग इत्यादी क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या अवलियाने जेजेच्याच कॅन्टीनमध्ये राहून कसे दिवस काढले या विषयीचा लिहिलेला लेख ‘चिन्ह’च्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झाला होता. जो त्यावेळी अतिशय गाजला होता. त्या लेखाचा प्रदीर्घ उतरार्ध देखील या लेखात प्रसिद्ध होणार आहे.
‘चिन्ह’च्या सांगोपांग चित्रकला विशेष अंकात गाजलेले शंकर पळशीकर (अरविंद हाटे), बाबुराव सडवेलकर (सुधाकर लवाटे आणि मिनू सडवेलकर), संभाजी कदम (माधुरी पुरंदरे) ,विश्वनाथ सोलापूरकर (माधव इमारते), विश्वास यंदे (मंगेश राजाध्यक्ष) हेही विशेष लेख या ग्रंथात पुन्हा प्रकाशित करण्यात येत आहेत. या खेरीज जेजेचं सुवर्णयुग ज्यांनी पाहिलं त्या चित्रकार बी डी शिरगावकर यांचा एक प्रदीर्घ लेख तसेच ‘रापण’ सारखं जेजेच्या संस्मरणीय आठवणीवर आधारित पुस्तकावर शशिकांत सावंत यांचा एक विशेष लेखही या ग्रंथात प्रकाशित होणार आहे.
या खेरीज जमशेदजीं जीजीभाई यांच्या कर्तृत्वाचा परामर्श घेणारा विश्वास यंदे यांचा ‘चिन्ह’च्या पहिल्या अंकात गाजलेला विशेष लेख तसेच कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांच्या चित्र कारकीर्दीचा परामर्श घेणारा चिंतामणी गोखले यांचा लेखही पुन्हा प्रकाशित करण्यात येणार आहे.
अजूनही या ग्रंथात बरंच काही आहे. पण त्या विषयी नंतर कधीतरी.
*****
Related
Please login to join discussion