No products in the cart.
जेजे अभिमत : आंदोलन पेटणार ?
जेजेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय फिरवण्याचा आणि त्या जागी तीन महाविद्यालयांचे मिळून राज्यस्तरीय विद्यापीठ स्थापन करण्यासाठी अभ्यास समिती स्थापित करण्याचा उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा निर्णय जेजेच्या माजी विद्यार्थ्यांना अजिबात आवडलेला नाही आणि तो बदलण्यासाठी एखादे आंदोलन करावे लागले तरी ते करायचे या निर्णयाप्रत ते आले आहेत . त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेता यावा यासाठी आज दि. २ मे रोजी सकाळी ११ वाजता जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टच्या कॅन्टीन शेजारी असंख्य माजी विद्यार्थी भेटणार आहेत .जेजेच्या फाईन आर्ट , अप्लाइड , आणि आर्किटेक अशा तिन्ही महाविद्यालयांच्या असंख्य माजी विद्यार्थ्यांना निमंत्रणे गेली आहेत .
या पहिल्या बैठकीत जेजेच्या तिन्ही महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करण्यासंबंधी निर्णय घेतला जाणार आहे . त्यासाठी कार्यकारिणीही निवडली जाणार आहे . अभिमत विद्यापीठ प्रस्तावाला सरकारने मान्यता द्यावी यासाठी काय करावे ? आंदोलन नेमके कसे असावे ? या विषयावरच प्रामुख्यानं या बैठकीत विचार विनिमय केला जाणार आहे . जेजे संस्कृतीशी ज्यांचा कधीच संबंध आलेला नाही , पण जी मंडळी नाना राजकीय करामती करून कामधंद्यासाठी जेजेच्या परिसरात येऊन स्थिरावली आहेत आणि जेजेच्या आजी विद्यार्थ्यांना खोटेनाटे सांगून भडकवत आहेत त्यांच्या संदर्भात प्रामुख्यानं काय उपाय योजना करावयाची या संदर्भात देखील आजच्या या पहिल्याच बैठकीत विचार विनिमय केला जाणार आहे असं या आंदोलनात पुढाकार घेतलेल्या चित्रकला , लेखन , दिग्दर्शन , मांडणी शिल्प अशा असंख्य क्षेत्रात कार्य केलेल्या आशुतोष आपटे यांनी ‘ चिन्ह ‘ शी बोलताना ठणकावून सांगितलं.
कलावंतांनी केलेली आंदोलनं नेहमीच यशस्वी होतात . या आंदोलनात तर केवळ फाईन आर्टिस्टच नाहीत तर कमर्शियल आर्टिस्ट देखील सहभागी होणार असल्यानं या आंदोलनाच्या निमित्तानं सोशल मीडियावर जे काही प्रसारित होईल ते उच्चशिक्षण मंत्र्यांच्या आणि पर्यायानं चित्रकार मुख्यमंत्री असलेल्या सरकारच्या प्रतिमेला बाधक ठरते किंवा काय त्याकडे आता लक्ष ठेवायचे . या संदर्भात आम्ही घडलेली प्रत्येकच घडामोड टिपण्याचा प्रयत्न करणार आहोत . आम्हाला अवश्य फॉलो करा !
Related
Please login to join discussion