No products in the cart.
३०० फुटी गटार सव्वा कोटीत ?
काही महिन्यापूर्वी कुणीतरी संतापून हे फोटो ‘चिन्ह’ला पाठवले होते. ज्यांनी ते पाठवले होते त्यांचं म्हणणं असं होतं की ‘पहा जेजेत काय चाललंय ते ! हे गटार जेमतेम पावणे तीनशे ते तीनशे फुटाचं आहे आणि खोल फक्त १८ इंचाचं, पण या गटाराला चक्क सुमारे सव्वा कोटी खर्च आलाय. हा सरळ सरळ भ्रष्टाचार आहे याच्यावर तुम्ही का लिहीत नाहीत ?’
ते फोटो पाहूनच खरं तर आम्ही खरोखरंच थक्क झालो. त्यावर काहीतरी लिहायचं असं ठरवलं देखील पण कालांतराने व्हाट्सअपमध्ये ते फोटो मागे गेले ते गेलेच. त्यावर लिहायचे देखील राहून गेले. पण मध्यंतरी एका लेखात त्याचा उल्लेख केला होता. आपण फक्त एवढंच करु शकतो. ज्यांनी यात काही करायचं असतं ते डोळयांवर कातडं ओढून बसलेत.
१६६ वर्षाचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या कला महाविद्यालयात शिकणाऱ्या सुमारे २५० पेक्षा जास्त विद्यार्थिनींना साधी स्वच्छतागृहाची प्राथमिक सोय देखील नाही त्या जेजेचा अधिष्ठाता पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने तीनशे फुटाचे गटार, तेही केवळ पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी तब्बल सव्वाशे कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च करुन बांधतो, याचं कुणालाच काही वाटत नाही, ही खरोखर शरमेची गोष्ट आहे. त्या गटारावर म्हणे लोखंडी जाळ्या टाकल्या आहेत का तर म्हणे त्यात कचरा पडून गटार भरुन जाऊ नये म्हणून. पण कालच एका विद्यार्थ्यांचा जेजेमधून फोन आला होता. तो सांगत होता. सर ते गटार आता चक्क भरुन वाहतंय. साफ करण्याची तसदी देखील कोणी घेत नाही. यावर काहीतरी लिहा. काय लिहिणार यावर आपण ?
मुनगंटीवारांनी चार पाच वर्षांपूर्वी अर्थसंकल्पात ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ला दहा कोटींची तरतूद केली होती. त्यातलेच म्हणे हे पैसे आहेत. ते अद्याप पूर्णपणे वापरले गेलेले नाहीत. पण हा गटाराचा व्यवहार पचला तर मुनगंटीवारांनी नंतर दिलेल्या दीडशे कोटी रुपयातून सर्व कॅम्पसमध्ये बहुदा सिमेंट काँक्रीटचे रस्ते आणि गटारंच बांधली जातील असे दिसते. तो विद्यार्थीं सांगत होता रस्त्याच्या कामाला बहुदा सुरुवात झालेली दिसते. १६६ वर्षात जेजेमध्ये कधी पाणी तुंबण्याची घटना घडलेली नाही. मग पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कुणा बेअक्कल माणसाच्या मेंदूतून ही कल्पना प्रत्यक्षात आली याची चौकशी शिक्षण सचिव विनय रस्तोगी आता तरी करणार आहेत का ?
आम्ही चित्रकार मंडळी, आम्हाला लाखांवर किती शून्य ते देखील धड सांगता येत नाही. त्यामुळे रस्तोगी साहेबांनीच आता रनींग फुटाला काय भाव पडला ते पाहावं ? गटाराच्या बांधकामात काय चांदी सोनं वापरलं आहे का याचा देखील तपास करावा. नाही का ?
*****
Related
Please login to join discussion