News

#jjisauniversity

 ‘जेजे ही एक दुर्मिळ वास्तू आहे. जेजेला स्वायत्तता मिळायलाच हवी. या आंदोलनात मी स्वतः तुमच्यासोबत आहे’, असं आश्वासन IIM केरळचे तसेच MIT मुंबईचे गव्हर्नर आणि जेजेचे माजी विद्यार्थी ऍडमॅन राज कांबळे यांनी दिलं. #jjisauniversity हा हॅशटॅग देखील त्यांनी या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी सुचवला.

जेजे अनन्य अभिमत विद्यापीठ करण्यासंबंधी चार वर्षांपूर्वी हालचाल सुरू झाली होती. दि. २० मार्च रोजी रत्नागिरीत झालेल्या राज्य कला प्रदर्शन सोहळ्यात शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जे जे स्कूल ऑफ आर्टला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यासंदर्भात घोषणा केली होती, परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी जेजेला राज्यस्तरीय विद्यापीठाचा अभ्यास करून अहवाल देणारी एक समिती देखील स्थापन केली. त्यांनी हा असा अचानक निर्णय बदलल्यामुळं जेजेच्या माजी विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आणि त्यांनी जेजेत सभा घेण्याचे ठरवले. त्या सभेची घोषणा केल्याबरोबर त्या घोषणेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. सोमवार दि. २ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सभेत दीडशे ते दोनशे आजी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. त्या सभेतच सभेचं आंदोलनात रूपांतर झालं. जेजेचे अनेक माजी विद्यार्थी तिथे उपस्थित होते आणि आजी विद्यार्थ्यांना त्यांनी पोटतिडकीने या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तसेच राज्यसरकारच्या या निर्णयाविरोधात लढण्यासाठी प्रवृत्त केले.

यावेळी या आंदोलनासाठी पुढाकार घेणारे लेखक, दिग्दर्शक, मांडणी शिल्पकार आणि चित्रकार आशुतोष आपटे यांनी आपल्या अत्यंत प्रभावी अशा भाषणात अनन्य अभिमत विद्यापीठाचं सोदाहरण विश्लेषण केलं. जगाच्या पाठीवर जेजे सारखं उदाहरण कुठेच नाही. सारी कला एकाच ठिकाणी एकत्रित असणे क्वचितच घडते. ही एकी, ही परंपरा टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. कुठलंच क्षेत्र असं नाही ज्यात जेजेचा विद्यार्थी नाही. अशा सर्व क्षेत्रातील जेजेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन या विरोधात आवाज उठवला तर भविष्यातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी यावेळी सुचवलं. जे जे स्कूल ऑफ आर्ट नावाची १२०० सिसिची मोटार सायकल आहे, ती छान चालते म्हणून तिला ‘राज्यस्तरीय’ या नावाचे आगगाडीचे डबे लावणार का ? असा जाबही त्यांनी विचारला. जेजेला अनन्य अभिमत विद्यापीठाचा दर्जा जरी मिळाला तरी फी वाढेल किंवा अन्य योजना ठप्प होतील हा प्रचार अत्यंत खोटा आहे, जेजेला अनन्य अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळू नये यासाठी हा प्रचार करण्यात येत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला. या आंदोलनाच्या प्रसारासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना अनेक सूचना दिल्या तसेच अनेक कल्पना देखील सुचवल्या.

‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जेव्हा ते जेजेमध्ये शिकण्यासाठी आले म्हणजेच १९८२ सालापासून ते आजतागायत जेजेचा संपूर्ण भूतकाळ त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. जेजेवर किती अत्याचार झाले आहेत, जेजेच्या नावाखाली किती भ्रष्टाचार झाले आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले. झालेले भ्रष्टाचार त्यांनी वृत्तपत्रांमधील बातम्यांच्या आधारे तसेच त्यांच्या ‘कालाबाजार ‘ या अंकाच्या आधारे कसे उघडकीस आणले ते सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. आजी विद्यार्थ्यांना त्यांनी या सर्व प्रकाराविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त केले. मुख्यमंत्रीपदी जेजेचाच एक माजी विद्यार्थी बसला आहे, अशी संधी पुन्हा मिळणं कठीण आहे. आपलं म्हणणं त्यांना कदाचित पटू शकेल. आता नाही तर कधीच नाही ! अशी प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.

या सभेत सर्वश्री मंतोष लाल, रफिक या जाहिरात तज्ज्ञांची देखील भाषणं झाली. सभेचं सूत्रसंचालन सुनील नाईक यांनी केलं. फिल्ममेकर गिरीश मोहिते, प्रोडक्शन डिझायनर शशांक तेरे, जाहिरात क्षेत्रातले गुरुनाथ भडेकर, ब्लडी फास्ट मोबाईल ऍपचे सूत्रधार प्रकाश चित्रकार अजित वहाडणे, प्रेस फोटोग्राफर घनश्याम भडेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या छाया पिळणकर – कोळी इत्यादी विविध क्षेत्रातले काम करणारे जेजेचे माजी विद्यार्थी देखील या सभेला आवर्जून शेवटपर्यंत उपस्थित राहिले होते. जेजे अभिमत विद्यापीठासाठी आता मोठे आंदोलन उभे राहणार हा विश्वास सगळ्यांच्याच चेहऱ्यावर झळकताना दिसत होता.

ही सभा ‘CHINHA Art News’ या यु ट्यूब चॅनलवर लाईव्ह प्रसारित करण्यात आली होती. ज्यांना ती पाहायची असेल ती कृपया या चॅनलला भेट द्यावी !

राज कांबळे
आशुतोष आपटे
सतीश नाईक
रफिक
मंतोष लाल

What's your reaction?

Related Posts

1 of 7