News

जेजेच्या माजी विद्यार्थ्यांचे कलाप्रदर्शन

मंगळवार दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी “जेजेआयटीज् असोसिएशन” (JJites Association) चे “जेजेआयटीज् शो २०२३” या समूह कला प्रदर्शनाचे उदघाटन ‘जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई’ येथे झाले. या प्रदर्शनात अजित देसवंडीकर, बर्नाड चॅव्हेज, चंद्रा दोशी, दामोदर आवारे, दीपक थोपटे, हेमा देसाई, जितेंद्र सुतार, रमण चारी, ममता परब, मंगेश चोरगे, डॉ. मीरा सावंत, मिलिंद ठाकूर, निलेश पालव, प्राजक्ता पोंक्षे, प्रकाश भिसे, संघपाल मस्के, डॉ. संजय कुऱ्हे, शिरीष मिठबावकर, सिकंदर मुल्ला, सुमंत शेट्टी, तुषार शिंदे, वैभव गायकवाड, विमला हर्ष या चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. जेजेआयटीज् असोसिएशन ही सर ज. जी. कला महाविद्यालय, मुंबई च्या माजी विद्यार्थ्यांची नोंदणीकृत व अधिकृत माजी विद्यार्थी संघटना आहे. या संस्थेची स्थापना 2004 साली झाली असून आजतागायत संस्थेने अनेक समूह प्रदर्शन, आजी माजी विद्यार्थी कार्यशाळा, चर्चासत्र, व्याख्यान, इत्यादी उपक्रम यशस्वीरीत्या राबवले आहेत.

प्रदर्शनाला उपस्थित कला रसिक.

सदर प्रदर्शनाचे उदघाटन प्रख्यात चित्रकार डॉ. प्रभाकर कोलते, ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष व शिल्पकार श्री. उत्तम पाचारणे, गॅलरी सेव्हन च्या संचालक व चित्रकर्ती  चंद्रा सचदेव यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी कला संचालक महाराष्ट्र राज्य आणि सर ज. जी. कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे, प्रख्यात चित्रकार व बॉम्बे आर्ट सोसायटीचे चेअरमन श्री. अनिल नाईक, मुंबई प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस श्री. संदीप शुक्ला, चित्रकर्ती  ज्योती केरकर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या औचित्याने सर ज. जी. कला महाविद्यालयाचे निवृत्त ज्येष्ठ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. ज्यात माजी अधिष्ठाता श्री. वसंत सोनावणी, माजी विभागप्रमुख श्री. पॉल कोळी, धातुकाम विभाग अध्यापक श्री. विवेकानंद दास, माजी प्र. अधिष्ठाता श्री. मोरेश्वर पवार, टेक्स्टाईल च्या अध्यापिका अलोका बॅनर्जी यांना गौरविण्यात आले.

मागील कोरोनाच्या काळात बंद झालेले प्रदर्शन पुन्हा सुरू झाल्यामुळे सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी डॉ. प्रभाकर कोलते यांनी आपल्या विद्यार्थीदशेत असतानाच्या शिक्षकांच्या आठवणी सांगितल्या आणि आजच्या काळातील “जेजे” ला पुन्हा त्याच दर्जावर नेण्यासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र यायला हवे असे प्रतिपादन केले. चंद्रा सचदेव यांनी अश्या माजी विद्यार्थ्यांच्या समूह प्रदर्शनाची गरज असून याद्वारे आजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल अशी आशा व्यक्त केली व आपल्या जेजेतील आठवणीना उजाळा दिला.

श्री. अनिल नाईक यांनी आपल्या भाषणात चांगला शिक्षक कसा असतो व त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कित्येक पिढ्या घडविल्या जातात ह्याचे विवेचन करून आजच्या काळात, कला क्षेत्रात सक्रिय असलेल्या जेजेच्या माजी विद्यार्थ्यांनी “जेजेआयटीज्” सारख्या माध्यमातून आजी विद्यार्थ्यांसोबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वतःला जोडायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली.

श्री. उत्तम पाचारणे यांनी एकंदरीत जगभरातील सर्वच कला संस्था काहीश्या उदासीन झाल्याची खंत व्यक्त करून, आजच्या विद्यार्थ्यांना समकालीन कला क्षेत्राच्या प्रवाहात आणण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत मांडले.

प्रा. विश्वनाथ साबळे यांनी “जेजेआयटीज्” च्या आजवर झालेल्या उपक्रमांची प्रशंशा केली व या पुढेही प्रत्येक उपक्रमात सर ज. जी. कला महाविद्यालय हे जेजेआयटीज् या माजी विद्यार्थीं संस्थेच्या सोबत राहील अशी ग्वाही दिली.

आपण या क्षेत्रातील नसलो तरी कला क्षेत्राची जाणीव असून, अगदी शालेय जीवनापासून मुलांना कलेचे सक्रिय व अद्ययावत शिक्षण द्यायला हवे जेणे करून भविष्यात अनेक चांगले कलाकार घडतील. या कार्यासाठी आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन उपक्रम करायला हवेत असे मत श्री. संदीप शुक्ला यांनी व्यक्त केले.

जेजेआयटीज् असोसिएशन संस्थेने कात टाकली असून आधुनिक माध्यमांच्या सहाय्याने सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित करण्यासाठी संकेतस्थळावर संपर्क अर्ज उपलब्ध केलेला असून, जेजेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना www.jjites.com या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन श्रीम. काजल गायतोंडे यांनी सूत्रसंचालनात केले.

या प्रदर्शनात ऑइल व एक्रेलीक माध्यमातून साकारलेल्या चित्रांसोबत, मेटल इनमलिंग, मेटल इचिंग, ग्लास आर्ट, ग्राफिक्स इत्यादी माध्यमातील चित्रे व ब्रॉंझ, पाषाण, रेझिन इत्यादी माध्यमातील शिल्पे प्रदर्शित करण्यात आलेली आहेत. एकंदरीत कलेच्या विविध माध्यमातील कलाकृतींची मेजवानी प्रेक्षकांना लाभणार आहे.

सदर प्रदर्शन सोमवार दि. ०३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत स. ११:०० ते सायं. ०७:०० वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहील.

****

चिन्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करून व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
https://chat.whatsapp.com/IgdCKjB4vEsGVz68ljV34n

‘चिन्ह’चे फेसबुक पेज लाईक करा
https://www.facebook.com/ch

Related Posts

1 of 83

Sign In

Register

Reset Password

Please enter your username or email address, you will receive a link to create a new password via email.