No products in the cart.
‘काल – आकार’ प्रदर्शनाचं आयोजन !
राहुल वजाळे आणि विक्रम मराठे यांच्या चित्रांचं ‘काल – आकार’ हे चित्र प्रदर्शन गांधी फिल्म फौंडेशन मुंबई येथे दि 26 मे ते 20 जून 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचं संयोजन संजय निकम यांनी केलं आहे. ” काल – आकार.. टाइम फॉर्म शो” या प्रदर्शनात राहुल वजाळे आणि विक्रम मराठे या प्रतिभावंत कलाकारांच्या उल्लेखनीय कलाकृती पाहायला मिळणार आहेत. या प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवार, 26 मे 2023 रोजी सायंकाळी झालं. अभिनव माध्यमांचा वापर करून या कलाकृती चित्रकारांनी तयार केल्या आहेत.
विक्रम मराठे हे चित्रकार, संयोजक, पुरातत्व अभ्यासक आणि म्युझिओलॉजिस्ट आहेत. विक्रम मराठे यांनी त्यांच्या चित्रांना ‘गंज चित्रं’ असं शीर्षक दिलं आहे. ‘गंज’ त्यांच्या कलाकृतीची संकल्पनाही आहे आणि माध्यमही, त्यांच्या मनातले आकार मराठे कागदावर गंजाच्या रूपात साकारतात. लोखंडासारखा कठीणतम वस्तूलाही हतबल करणारा गंज गंजण्याची प्रक्रिया हळूवारपणे अत्यंत सावकाश, प्रदीर्घ काळ चालणारी आहे विनाशाच्या वाटेवरून चालत रहाणारी ही प्रक्रिया आहे. या गंजालाच विक्रम मराठे यांनी माध्यम बनवले आहे. विक्रम मराठे यांच्या चित्रांमधे उत्खनित प्राचीन वसाहतीच्या अवशेषात अडकून राहिलेल्या काळाच्या खुणा दिसतात.
राहुल वजाळे यांची चित्रं अनपेक्षित परिणाम साधतात. अंतर्मनाच्या प्रेरणा आणि नेणीवेला दिलेला प्रतिसाद या गोष्टी चित्रकलेच्या विश्वाला नव्या नाहीत मात्र अशा प्रेरणा आणि प्रतिसादाला संपूर्णपणे शरण जाऊन प्रामाणिक चित्र रंगवणारे कलाकार दुर्मिळ आहेत. राहुल वजाळे त्यापैकी एक. चित्र काढण्याची हाक अंतर्मनातून आल्यावर मात्र राहुल बाहेरच्या जगातील कोणत्याही अडचणींना अभावाला आपल्या आणि रंगाच्या आड येऊ देत नाही. लॉकडाऊनच्या बंदिवासात असताना हाताशी कॅनव्हास आणि रंग नसतानाही राहुल यांनी आपली चित्रकलेची साधना मिळेल त्या साहित्याच्या मदतीने सातत्याने चालू ठेवली होती. ‘काल आकार’ प्रदर्शनातली त्यांची ही चित्रं त्याच कालावधीतली आहेत.
राहुल वजाळे आणि विक्रम मराठे हे दोघेही प्रतिभासंपन्न कलाकार या प्रदर्शनाद्वारे आपली आगळीवेगळी कलात्मक अभिव्यक्ती दाखवतील आणि प्रेक्षकांना काळ आणि आकाराच्या दृश्य प्रवासाला घेऊन जातील यात शंकाच नाही.
हे प्रदर्शन सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत कला रसिकांसाठी खुले आहे.
प्रदर्शनाचा पत्ता :
गांधी फिल्म फाउंडेशन, 19, लॅबर्नम रोड, गावदेवी पोलिस स्टेशनजवळ, मुंबई, 400007
Related
Please login to join discussion