No products in the cart.
कालाबाजार अंक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध !
बरेच दिवसापासून अनेक वाचक, विशेषतः जेजेचे तरुण विद्यार्थी ज्या अंकाची आतुरतेने वाट बघत होते तो कालाबाजार अंक आता ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात वाचनासाठी उपलब्ध झाला आहे. जेजे असो किंवा महाराष्ट्रातील कला शिक्षणाबद्दल आम्ही ज्या बातम्या लेख तळमळीने देतो ते वाचून तरुण पिढी ‘चिन्ह’बरोबर मोठ्या प्रमाणात जोडली गेली आहे. कलाशिक्षणाची जेव्हा चर्चा होते तेव्हा कालाबाजार अंकाचे महत्व कोणी नाकारू शकणार नाही. अर्थात हे कौतुक नाही तर खेद आहे कारण ‘चिन्ह’ला असा अंक प्रकाशित करण्याची वेळ आली ती महाराष्ट्राच्या कलाशिक्षणाचा बाजार मांडला गेल्यामुळेच !
यामध्ये सकारात्मक गोष्ट हीच होती की या अंकामुळे जेजेची डिनोव्हो प्रक्रिया सुरु झाली. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हातात हा अंक पडला ( आता ही कहाणी देखील खूप रंजक आहे पण त्याबद्दल पुढे कधी वाचा ) आणि तावडेंनी या डिनोव्हो प्रक्रियेचा नारळ फोडला ! आगामी वर्षात डिनोव्हो प्रक्रिया पूर्ण होईलच. पण जे लेख वेबसाईट माध्यमातून ‘चिन्ह’वर प्रकाशित झाले ते वाचून अनेक विद्यार्थ्यांनी अंक मिळण्यासंबंधी इच्छा प्रकट केली. पण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत छापील अंक पोहोचणे शक्य नव्हते. त्यामुळे वेबसाईटवर आपण सर्वप्रथम कालाबाजार हा अंक वाचकांसाठी मोफत उपलब्ध करून देत आहोत. काही काळासाठी तुम्ही या अंकातील लेख डाऊनलोडही करू शकता. पण आगामी काळात ते फक्त वेबसाईटवरच वाचता येतील, तेही अर्थातच मोफत ठेवण्याचाच आमचा विचार आहे.
कालाबाजार अंकानंतर इतरही अंक आपण पीडीएफ स्वरूपात वाचकांसाठी वेबसाईटवर ठेवणार आहोत. पण ते ठेवायचे की नाही याचा निर्णय सर्वस्वी वाचकांच्या हातात आहे. ही सगळी तांत्रिक जमवाजमव करताना ‘चिन्ह’ची बरीच आर्थिक शक्ती खर्च होते. त्याचा मोबदला वाचकांनी द्यावा अशी कुठलीच अपेक्षा ‘चिन्ह’ची नाहीये. पण तुम्ही एक मात्र जरूर करा हा अंक जास्तीत जास्त शेअर करून कला रसिक, विद्यार्थी, चित्रकार यांच्यापर्यंत पोहोचवा. तरच आमची मेहनत फळाला येईल. नाहीतर ही ओसाड गावाची पाटीलकी ठरेल. या अंकाला किती प्रतिसाद मिळतो यावरच आम्ही पुढील अंक वेबसाईटवर आणायचे की नाही याचा निर्णय घेणार आहोत. त्यामुळे वाचकांना विनंती की या अंकाला प्रतिसाद भरभरून द्या !
**
या पोस्टबरोबर जी ऍड आहे त्यावर क्लिक करून तुम्ही कालाबाजार अंक मोफत वाचू शकता !
वाचकांसाठी टीप: मोबाईलऐवजी लॅपटॉप किंवा डेक्सटॉपवर वाचनाचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल.
Related
Please login to join discussion