No products in the cart.
सिंधुदुर्गात ‘कल्पक’ प्रदर्शन !
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टचे वार्षिक प्रदर्शन दि ०४ ते ०९ मार्च २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उदघाटन हे जाहिरात तज्ज्ञ सुनील महाडिक आणि विनायक नायक यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन रमेश भाट, प्राचार्य दिलीप धोपेश्वरकर, सदस्य केदार बांदेकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात सादर केलेल्या कामाचे कौतुक उदघाटक आणि जाहिरात तज्ज्ञ विनायक नायक यांनी केले. शिवाय विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज लागली तर वेळोवेळी आपण उपलब्ध असू असे आपल्या भाषणात सांगितले.
सुलेखनकार अच्युत पालव यांनी कॉलेजच्या वाटचालीचे आपण अगदी सुरुवातीच्या काळापासून साक्षीदार आहोत असे सांगितले आणि कॉलेजची वाटचाल दैदिप्यमान राहिली आहे याचा आपल्याला आनंद आहे असे म्हटले.
महाविद्यालयाचे प्राचार्य धोपेश्वरकर यांनी वर्षभरात कॉलेजमध्ये जे विविध उपक्रम राबवण्यात आले त्याची माहिती दिली. कॉलेजने शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा यासाठी अभिनव उपाययोजना केली त्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
यावर्षी महाविद्यालय आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. महाविद्यालयात विद्यार्थी अप्लाइड आर्ट या विषयाचे शिक्षण घेतात. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी हे देश परदेशात कार्यरत आहेत. प्रदर्शनाच्या कालावधीत सुलेखनकार अच्युत पालव यांनी विद्यार्थ्यांना कॅलिग्राफीचे प्रात्यक्षिक दिले. गेले पंचवीस वर्ष सावंतवाडी सारख्या ठिकाणी बांदेकर कॉलेज कला शिक्षण प्रसाराची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहे. कोकण विभागातील अनेक विद्यार्थ्यांच्या कला शिक्षणासाठी हे एकमेव कॉलेज कार्यरत आहे.
महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रा सिद्धेश नेरुरकर यांच्याशी 94202 60903, 02363-275361 या क्रमांकावर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी fineartsawantwadi.org.in या वेबसाईटला भेट द्या.
*******
Related
Please login to join discussion